जळकं रान
जळकं रान
आजकाल गोरठलेल्या रानाला
कळेनासं झालंय
का भडकलाय हा वणवा दाहीदिशांना
या वणव्यात वाळल्याबरोबरच ओलंही जळतय
वणवा क्षणाक्षणांनी वाढत राहिला
जळणारं जळतच राहिलं
गोरठलेल्या रानाची राख
केव्हा न् कधी झाली समजलेच नाही ....
क्षणभरात कुठूनतरी
जिवंत झुळझुळणा-या झ-याचा आवाज आला
वणव्यातून चुकून माकून जिवंत राहिलेल्या
झाडांच्या ओठांतून कळत नकळत कुठंलेसे मंत्रध्वनीचे
स्वर कानावर आदळू लागले
त्या जळक्या रानाला आता समजेना झालाय
कसं सामोरे जावू मी
हे माझं जळकं तोंड घेऊन आणि
अर्घवट जळक्या चेहऱ्यानी
या जिवंत झ-यासमोर
आणि कसे ऐकू जातील ते मंत्रध्वनी
कुजलेल्या आणि बुजलेल्यां कानाला
