जीवन - रक्षण
जीवन - रक्षण
बीज अंकुरले, झाले इवलेसे रोप।
त्याला देई हवा, पाणी, पीक येईल अमाप॥
रोप सानुले, सानुले; कर त्याची जपणूक।
कधी अंजार- गोंजार , कधी करावे कौतुक ॥
त्याच्या छोटुशा पानांना कधी कर स्पर्श तुझा।
वा-यावादळी सांभाळ, नको होऊ देऊ इजा॥
तुझ्या हातातले पाणी, त्याला अमृतासमान।
कधी पाज रे हाताने, त्याची भागव तहान॥
रोप बहरेल मग, त्याचा होईल विस्तार।
तुझ्या अंगणी शोभेल, फळाफुलांची बहार॥
हेच रोप इवल
ेसे, पुढे वृक्ष बनताना।
फिटो पारणे नेत्रांचे, त्याची ऊंची पाहताना॥
वृक्ष होईल महान, तुझ्या घरट्याची शान।
त्याची कीर्ती दिगंतात ,सर्वांमुखी यशोगान॥
परी आठवेल रोप, जन्मदात्याचे हे देणे।
तुझ्या संस्कार - तीर्थाने, झाले जीवनाचे सोने॥
आज देई त्याला माया, ऊब हातांची रे तुझ्या।
पाणी पाजल्या हातांना, पुढे स्वर्ग वाटे खुजा॥
आज रोपाची इवल्या, भागविता तू तहान।
तुझ्या जीवनी भरेल, सुख आणि समाधान॥