STORYMIRROR

Mrudula Raje

Fantasy Inspirational

4  

Mrudula Raje

Fantasy Inspirational

जीवन - पुस्तक

जीवन - पुस्तक

1 min
444


जीवनाचे पुस्तक पुन्हा उघडून पाहावेसे वाटले।

पण हातात धरले, आणि मन मुखपृष्ठाशीच थबकले॥


चकचकीत, गुळगुळीत, रंगीत, मुखपृष्ठ पाहून;

चकित झाले मीच, गेले मन पुस्तकाने मोहून॥


आतल्या शुभ्र पानांचा, अनुभवला नवा कोरा सुवास।

पुस्तक उघडून पाहण्याचा लागला मनाला ध्यास॥


अर्पण -पत्रिका केली ,श्री चरणीं सादर  समर्पण।

त्या दयाघनाने दिधले ,मजला हे कृतार्थ जीवन॥


वाचून पाहावी वाटे, अनुक्रमणिका पुस्तकाची ।

जी दाखवेल मजला ,मार्गक्रमणा मम जीवनाची॥


पहिली पाने रंगवली होती, बाळपणाच्या कुंचल्याने।

आई-बाबांनी चितारली होती ज्यात माझ्या जीवनाची स्वप्ने॥


काही रंगली, काही सजली; विरली आता काही।

मायपित्यांच्या ऋणांतून तरीही मुक्तता नाही॥


तारुण्याची रोमांचक पाने,  चाळून पाहताना।

ओठांवर फुटले हंसू ,अन् आठवणी दाटल्या नाना॥


चालताना सप्तपदी जोडीदाराच्या संगे।

जीवनाच्या पानांतून, गहिरा भाव रंगे॥


संसाराची पेलताना अवघड जबाबदारी।

पति-पत्नीच्या प्रेमाची लागली कसोटी न्यारी॥


संपले बालपण माझे, बाळ खेळते माझ्या घरी।

त्या भाग्यविधात्याने वर्षविल्या अमृतसरी॥


हा पुस्तकामधला, प्रसंग अनुभवताना पुन्हा।

नवनिर्मितीची लागली आस, फुटला कलेचा पान्हा॥


हीच, हीच ती वेळ होती ;जीवनस्वप्ने फुलण्याची।

राहून दंग संसारी, मन उधळून जगण्याची॥


पुस्तकातल्या जीवनाचे, हे सर्वाधिक खुलले पृष्ठ।

रंगभारले पाहून जीवन; मन समाधानी, संतुष्ट॥


परी नेत्र होती आतुर, आता पैलतीर गाठण्यासाठी।

फुटतात पंख मनाला, शेवटचे पान वाचण्यासाठी॥


ह्या सुबक पुस्तकाचा, अंतही व्हावा सुरेख, साजरा।

शेवटच्या पानावरी, दरवळावा धुंद - गंधित मोगरा॥


ऋणनिर्देशाचे पान, हे पसायदानाचे गान।

फेडिता समाज-ऋण; जीवन होईल धन्य, महान॥


हे पान अर्पण देवाला, हे जीवन अर्पण त्याला।

हे पुस्तक निर्मून ज्याने ,केले कृतार्थ मम जीवनाला॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy