जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
इकडे,तिकडे भरकटू नको
अंतरात डोकावून कर साकार,
उत्तुंग स्वप्ना तूच आहेस
तुझ्या जीवनाचा शिल्पकार...
विश्वास भक्कम मनगटावर
ठाम रहा तू स्वविचारावर,
नको जगाचा विचार मनी तो
नजर रोख तू कर्तृत्वावर...
गाढवाच्या पाठीवर बसता
जाता,येता हसती तुज जने,
गाढवाला उचलून घेता मग
वेडा म्हणूनी हिणवती जीवघेणे.
नको वेंधळा अविचार कसला
मानू नको तू आता हार,
ध्यानी सदा हे तूच आहेस
तुझ्या जीवनाचा शिल्पकार..
बुद्धी मिळाली प्रारब्धाने
प्रयत्नपूर्वक तिला लाव धार,
घे भरारी जाणून तूच आहेस
तुझ्या जीवनाचा शिल्पकार..
