ऋतूची चाहूल
ऋतूची चाहूल
आले थंडीचे दिवस
ऊब घेऊ चला,
कुडकुड अंगोअंगी
बहर गुलाबी थंडीला...
दातांवर दात अन्
ततपप होते कशी,
कुडकुडणारी थंडी
गार-गार लागते जशी...
सूर्यदेव शांत झाले
किरण त्यांचे हवेहवेसे,
गरम-गरम खायला
घोट चहाचे प्यावेसे...
चौफेर हिरवेगार
गालिचे पसरले,
मोहमय वातावरण
मन अलगत मोहरले...
आले थंडीचे दिवस
पेटवू शेकोटी आता,
नाचगाणी भोवताली
ऊबीची गोडी चाखता...
अंगी थरथर परि
हवीहवीशी वाटते,
गुलाबी थंडीची
मौज भारी दाटते...