हरवलेला घरोबा......!
हरवलेला घरोबा......!
सुन्या सुन्या शाळेत माझ्या
जणू बाके ही अबोल झाली
खळाळणार्या वार्याचीही
आता मंद झुळूक आली.....!
वर्हांडे सुने सुने
सुन्न जणू ती शांतता
नकोसा वाटतो आता
माझ्या शाळेत एकांत हा......!
परिपाठाला इवल्या हातांचा
नमस्कार आता दिसत नाही
कुंडीतल्या रोपांच्या कळ्या
आता मात्र खुलत नाहीत........!
हसणारी, बागडणारी
चिडणारी, चिडवणारी
पाखरच मळ्यात नाहीत
सूराविना गीत आता
सूरेल होत नाही.....!
किलबिलाट चिमण्यांचा
आता वाटतो हवाहवासा
नव्या पुस्तकांचा गंध
जणू पुन्हा पुन्हा घ्यावा.......!
सुन्न झाल्या पायर्या त्या
जिथे टेकला बाळांनी माथा
वंदन, नमन, नमस्कार
येतानाही अन् जाता जाता.......!
गुंजणारा तो नाद घंटेचा
अस्वस्थता वाढवितो मनाची
काय सुंदर दिसायची एका
ओळीत बालचमू अामुची........!
बोलका फळा
आज निर्विकार आहे
बोलक्या भिंतींवर
आता कोळ्याचे जाळे आहे........!
बक्षीसांचे हात
आज मात्र शांत
मैदानावरील मातीला
वार्याचीही नाही साथ.......!
रंगमंच स्तब्ध अन्
सभागृह वाटते भकास
काल परवाच जणू गोजिर्यांनी
रंगमंच दणाणला होता झकास...!
सोबती आमुच्या वृक्षांना आज नाहीत
तेही जगणं चिमुरड्यांच होतं सराईत.......!
फुललेल्या बागेला येईल कधी शोभा
ठावूक नाही कधी पाहायला मिळेल
तीच नाती अन् तोच घरोबा.......!
