हरे हुरहूर
हरे हुरहूर
कशी अचानक
कातर संध्येला
लागे हुरहूर
माझिया मनाला
शांत जीवनात
नाही खळबळ
तरीही का अशी
मनी सळसळ?
चमके विचार
लख्ख मनामधी
मी नि माझे घर
मी खुराड्यामधी
कितीक बांधव
असती भुकेले
कितीक अपंग
जागी बसलेले
किती निराधार
अश्रू भगिनींचे
अधीर शोधिती
हात मदतीचे
कंकण सेवेचे
बांधले पाहिजे
अश्रू पुसण्यास
गेलेच पाहिजे
आवर्तन असे
विचारांचे होता
हुरहूर गेली
मला न सांगता
