ग्रामपंचायत निवडणुका
ग्रामपंचायत निवडणुका
ग्रामपंचायत निवडणूका म्हणजे
लोकशाहीच्या हृदयाचा ठेका;
गावोगावी -गल्लोगल्ली असतो
नात्या-गोत्यांपासून धोका.
भावाविरुद्ध भाऊ बापाविरुद्ध
उभा पोरगा असतो ;
पैसा-प्रतिष्ठा-खुर्चीसाठी
हवा तो तोडगा असतो.
गावातील गल्लीबोळात
होते घराघरांची फाळणी;
राग, द्वेष, प्रेम, मत्सराची
माणसांमाणसात फोडणी.
शेजाऱ्याला शेजाऱ्याचा कट्टर
विरोधक मानले जाते;
तर कधीकधी कट्टर विरोधकांशी
स्नेहबंध विणले जाते.
रम-रमा-रमीच्या स्पर्शाने
लागते निवडणुकीला वळण ;
एकेका मतासाठी उमेदवारांची
मतदारांच्या पायावर लोळण.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर
गावागावात होते रणकंदन ;
लोकशाहीच्या मूल्ये-तत्वांना
दुरून बेगडी वंदन.
ग्रामपंचायत ते संसद
सर्वत्र "सेम टू सेम" आहे;
सगळ्यांकडून केला जाणारा
लोकशाहीचा गेम आहे.
