गेला उजवून...
गेला उजवून...


आत पाऊस, बाहेर पाऊस
होऊन ओला, येतो पाऊस
दावत ऋतू हावरे हिरवे
जातो उजवून कवळी कूस.
खात्रीला कधी लावत कात्री
होऊन वादळ फाडतो छत्री
थेंब टपोरे टाळत आणखी
झिम झिम गाणे होतो रात्री.
तेच बरसणे, तेच भिजणे
ओल वाफसा, हिरवे रुजणे
आवळत गळा दुष्काळाचा
वाचत वाचवी कवळी पाने.
सोसत पोळणे नकारवेडे
पाळणे हलवत झुरतो पाऊस
झोकत कळा दुष्काळाच्या
शब्द होऊन उरतो पाऊस.
उन्हाळयांच्या पेर उरावर
पेरत पुन्हा फुटतो पाऊस
कधी थबकतो मूकबुंध्याशी
बरसण्याची भागवत हौस.