गांधीजी... गांधीजी
गांधीजी... गांधीजी
गांधीजी...
समाजात आमच्या डोळ्यांसमोर
अनुचित प्रकार घडत असतांना
आम्ही डोळेझाक करतो...
आंधळे होऊन चुपचाप
तिथून काढता पाय घेतो...
आम्ही असलं काही वाईट
कधीच पाहत नाही...
गांधीजी...
आमच्या कामापुरतं
ऐकण्यासाठीच निघतात
आमचे कानावरून हात...
बहीरेपणाचा आव आणल्यामुळे
कुणाच्याही दुःखाचा टाहो
कधीच ओलांडत नाही
आमच्या कानाच्या पडद्याची भिंत...
आणि म्हणूनच
कुणाच्या वेदनांची किंकाळी सुद्धा
कधीच ठोठावत नाही
आमच्या हृदयाचं दार...
गांधीजी...
आम्ही स्वतःवर झालेल्या
अन्यायाची सुद्धा
कुठेच करत नाही वाच्छता...
आणि खरे बोलण्यासाठी
कधीच देत नाही ओठांना त्रास...
आम्ही मुके होऊन जातो
पुतळ्यासारखे...
गांधीजी...
आम्ही असेच जगतो आता...
तुमच्या विचारांचा...
तुमच्या शिकवणीचा...
आमच्या सोयीनुसार अर्थ लावून...
