Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sarita Sawant Bhosale

Tragedy

4  

Sarita Sawant Bhosale

Tragedy

दुर्गा

दुर्गा

5 mins
298



    सकाळचा सहाचा गजर वाजला आणि नमिताला नेहमीप्रमाणे जाग आली. आज तर आपण सुट्टी घेतले..एक झोप काढू पंधरा मिनिटांची असं तिच्या मनात आलं खरं पण गजर बंद करून ती ताडकन उठलीच. झोपून कस चालेल..आज तर घटस्थापना आहे. त्यात घरची साफसफाई...मुलांचे ऑनलाईन क्लास...नवऱ्याची काहीतरी स्पेशल फर्माईश असणार ती वेगळी. सुट्टी घेऊन घरी राहा आणि डबल काम करा असं स्वतःशीच म्हणत ती किचनमध्ये गेली. किचनच्या खिडकीतूनच समोरच्या घरातली दुर्गा इतक्या सकाळी सकाळी नवीन साडी वगैरे नेसून, तयार होऊन किचनमध्ये काम करताना दिसली. आज ही पहाटे पाचला उठलेली दिसतेय..हिला बिचारीला कधी सुट्टी असते असा विचार करत ती कामाला लागली. मुलांना उठवून त्यांच्या आंघोळी, नाश्ता, जेवणाची तयारी करून नमिता घटस्थापनेची तयारी करू लागली. देवीला फुलांचा हार करत असतानाच तिला समोरच्या घरातून गोंधळ ऐकू आला.हॉलचा दरवाजा उघडाच असल्याने सगळा स्पष्ट आवाज तिला ऐकायला येत होता. 

   "झाला वाटत नेहमीचा दंगा यांच्या घरात आजपण"- लॅपटॉपवर काम करत असणारा नमिताचा नवरा पुटपुटला.

  "आज घट बसतात ना रे त्यांच्यात...काकांच सोवळं ओवळ काय कमी असतं का?? त्यातून देवीचे ते परमभक्त . त्यात काकूंच्या हातून किंवा दुर्गाच्या हातून चुकून जरी काही चूक झाली किंवा पूजेची एखादी वस्तू ताटात ठेवायची राहिली की झालं यांचं सुरू....आताही तेच झालं असेल". असं म्हणत नमिता स्वतःशीच हसली. सोसायटीमध्ये ती राहायला आली त्याच्या आधीपासूनच समोरच कुटुंब तिथे राहत होत. देवा धर्माच्या बाबतीत काका आणि काकूही खूप कडक. कोणतीच चूक याना खपत नसे. मुलाचं मागच्या चार पाच वर्षात लग्न झालं आणि सुनेच नाव बदलून दुर्गा ठेवलं. यावर तिची संमती घेतली नाही तो भाग वेगळा. सुनेचच काय पण आजवर बायकोला तरी तिची मर्जी कोणत्या गोष्टीत विचारली असावी का हा मोठा प्रश्न आहे. मुलगा उच्चशिक्षित व नोकरीला मोठ्या पदावर पण सून मात्र कमी शिकलेलीच हवी होती कारण फार शिकलेल्या मुली डोक्यावर बसतात म्हणे. स्त्री आहे म्हणजे तिने खाली मान घालून व तोंडाला कुलूप बांधूनच राहावं या विचारसरणीचे काका....तेच विचार पुढे मुलाच्यात उतरले यात काही नवल नाही. लग्नापासून काकूंना स्वतःच्या धाकात ठेवलं..काकूही पतीधर्म व पती परमेश्वर या विचारांच्या आहारी गेलेल्या...त्यांनीही 'तुमचा शब्दच खरा' म्हणत आणि नकळत स्वतःच मन मारत संसार चालवला. 

   आता सून घरात आली तर तिच्याकडूनही हीच अपेक्षा. काळ बदलतो पण स्त्रीला दुय्यम स्थान देण्याची विचारसरणी 'जैसे थे' च. 

   "आवरलं का सगळं...दोघी पण देव अक्कल वाटत असताना चाळण घेऊन उभ्या होत्या का?? आणा लवकर साहित्य" काकांचा मोठा आवाज ऐकून नमिता विचार तंद्रीतून बाहेर आली. नेहमी काका स्वतःच पूजा करायचे त्यामुळे आजही ते सोवळं नेसून घटस्थापनेची पूजा करायलाही स्वतःच बसले होते. मध्येच मंत्र म्हणणं चालू होतं तर मध्येच सुनेवर नाहीतर बायकोवर तोंड टाकण चालूच होत. दुर्गा भुकेल्या मुलाला बाजूला ठेवून त्यांच्या हाताखाली जे लागेल ते देत होती. काकूही थोड्या वेळाने नवीन साडी नेसून काकांच्या बाजूला जाऊन बसल्या.

   काळ्याभोर मातीत नऊ धान्ये मिसळले, वरून पाणी शिंपडलं. घटाला चहू बाजूनी हळदी कुंकु लावून त्यावर नारळ ठेवला. मातीत रुजवलेले धान्य चांगले उगवूदे व सुखा समाधानाने घर नांदू दे अशी प्रार्थना देवाकडे चालू होती. दोन वर्षा आधी दुर्गाच्या पोटात मुलगी आहे हे कळल्यावर तिला गर्भपात करायला लावणारे काका,काकू आज घटातील मातीत रुजवलेले बीजाला अंकुर फुटूदे अशी प्रार्थना करताना पाहून नमिताला हसावं की रडावं कळलं नाही. बॉस एक स्त्री आहे म्हणून रोज तिची अक्कल काढणारा, गैरमार्गाने ती तिथे पोहचली अस म्हंटल्यावर 'कोणत्याही स्त्रीला कमी लेखून तिचा अपमान नका करत जाऊ..तिचा आदरच करत जा' अस सांगताच दुर्गाच्या कानाखाली मारणारा तिचा नवरा आज छान कुर्ता वगैरे घालून देवीसमोर हात जोडून बसला होता. लग्न झाल्यापासून पदोपदी दुर्गाचा अपमान करणारे,तिच्या घरच्यांना घालून पाडून बोलणारे, तिच्यावर हात उचलणारे, वाईट गोष्ट घडली की दुर्गालाच पांढऱ्या पायाची म्हणणारे आज मंदिरातल्या दुर्गा माते समोर लोटांगण घालत होते. घरात सुख,शांती,समृद्धी नांदावी म्हणून तिची आरती करत होते. 

    काकूही या सगळयातुनच गेल्या होत्या पण त्यांनी कधीच विरोध केला नाही उलट हे असंच असतं....बायकांनी नमूनच राहावं लागतं अस म्हणत दुर्गालाच दरडावत राहिल्या. दुर्गानेही सगळ निमूटपणे सहन केलं अस मुळीच नाही.परिस्थिती असह्य झाली तेव्हा तीही गेली होती सगळं सोडुन माहेरी...कुशीत सहा महिनन्याच लेकरू घेऊन. काही महिन्यांनी परत आली तेव्हाही परिस्थिती बदलली नाही. न राहवून एक दिवस नमिताने विचारलं होतं , "का आलीस परत?? का सोडून जात नाहीस कायमच की त्रास होतच नाही तुला?" त्यावर तिने दिलेलं उत्तर अगदी पटलं.

  "किती वेळा सोडून जाणार आणि कुठे जाणार?? जाऊन एकट राहणं, नव्याने आयुष्य सुरू करणे वगैरे सगळं चांगलं आणि योग्यच आहे पण बोलण्या इतपत सोप्प नक्कीच नाही. आणि काय गॅरंटी की कुठे गेलं तरी आपण ज्या सन्मानासाठी पुढे निघालो तो सन्मान पदरी पडेलच. दुर्गेची पूजा फुलांनी,दागिन्यांनी सजवून मंदिरातच...तिच्या समोर हात जोडून, नतमस्तक होऊन लोटांगणं मंदिरातच....घरातल्या स्त्रीला माणूस म्हणून आदर मिळाला तरी खूप होईल. आजच्या काळात दुर्गेने किती मोठी भरारी घेतली, मनापासून स्वप्नांपर्यंत ती कितीही उमलली,फुलली तरी एक स्त्री म्हणून तिला बहाल झालेला बोचरा काटा तिच्या आयुष्यात असतोच...एक आयुष्यभर सलणारी सल तिच्या उरी राहतेच. याचा अर्थ या दुर्गाने सहनच करत राहावं असा नक्कीच नाही..योग्य वेळी चंडीका रूप धारण करून वाईटाचा नाश करण्याची ताकद आहे स्त्री मध्ये आणि ते ती करतेच. "

   दुर्गाचं हे उत्तर नमिताला मनोमन पटलं होतं. स्त्री देवीचं रूप आहे. जन्मजातच तिला ममत्व,माया,प्रेम,दया, सहानुभूती,आदर हे गुण लाभलेले असतात. तिच्याभोवती नात्यांची गुंफण गुंफलेली असते जे तिच्या परिपूर्ण अस्तित्वाचा एक भाग असतात. सगळ्याच जबादाऱ्या सहस्त्रभुजांनी ती लिलया पार पाडते. या गुंत्यातून सहजासहजी तिला पाय मोकळा करता येत नाही आणि याशिवाय ती जगुही शकत नाही. प्रत्येक दुर्गेची हीच कथा आणि व्यथाही असते. मुळातच आदिशक्तीचे रूप असलेली स्त्री रडत नाही की खचत नाही. तिचा लढा तिच्या अस्तित्वासाठी चालूच राहतो शेवटपर्यंत. 

     समोरच्या घरात चालू झालेल्या घंटानादाने नमिता भानावर येते. दुर्गास्थापना पार पडलेली असते व घरातील दुर्गा हात जोडून मंदिरातल्या दुर्गा मातेकडे घराचं सुख सोबतच लढाई जिंकण्यासाठी आंतरिक शक्ती, बळ मागत असते.

..............................................

   कथा सर्वसामान्य घरात आजही अशीच घडते. काही स्त्रिया खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या म्हणून सगळ्याच स्त्रियांना सन्मान मिळाला असं नाही झालं. आजही देवीची पूजा मंदिरातच केली जाते आणि घरातील लक्ष्मीला मात्र मर्यादेची भाषा समजावली जाते.

     कथा आवडल्यास लाईक कॉमेंट्स नक्की करा आणि शेअर करा फक्त नावासहितच. कथावितरण व प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव. निनावी शेअर केल्यास किंवा लेखिकेचे नाव वगळून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

फोटो साभार - गुगल

                         

       

              


Rate this content
Log in