धारा
धारा
अवकाळी जलधारांच्या या थैमानी
मुग्धस्वर आणि मुकी गाणी
गतजन्मीची ओळख आठवुनी
अवचित झरते डोळा पाणी ।।१।।
गंध फुलांचा गेला सांडूनि
षोडशा अवनी गेली मोहोरूनी
वीणा अवचित गेली झंकारुनी
गत आठवांच्या वाजती संवादिनी ।।२।।
मळभ दाटते मनी अंधारुनी
का ताटातुटी ही जीवघेणी
शब्दच्छल ते सारे विसरूनी
त्याच पदपथी भेटावे परतूनी ।।३।।
बांध मनीचा जाई ओसंडूनी
तरल क्षण ते आठवूनी
निरभ्र क्षितीजापाशीचे मिलन स्मरूनी
क्षण सुखाचे मनी गोंदुनी ।।४।।
श्वासश्वासातूनी विरघळे क्षणोक्षणी
विरेल माझे मी पण झणी
आसक्त मनतळी विरक्ती बाणी
तेथेच भेटे मग कृष्णसंजीवनी ।।५।।
