देश रक्षणाचे वचन
देश रक्षणाचे वचन
काल सीमेवर लढताना शत्रूंशी तो भाऊ मारला गेला,
आज बहिणीला पडला प्रश्र्न बांधू राखी ही कुणाला...
फोन करून म्हणाला होता रक्षाबंधनाला येईन,
ताई तुझ्या हाताने मी नक्की राखी बांधून घेईन...
भेटून सर्वांना निरोप घेऊन गावाकडे निघाला,
अन् शत्रूंनी अचानक हल्ला छावणीवर केला...
वीरश्री संचारली अंगी घेतले शस्त्र हाती,
शत्रूवरती तुटून पडला धाडस विराचे किती...
मातृभूमीच्या रक्षणासाठी नव्हती पर्वा जिवाची,
आई, वडील, बहिण सर्व वाट पाहत होते त्याची...
झेलीत होता गोळ्या छातीवर शत्रूला मारीत हो
ता,
वंदे मातरम्, भारतमातेचा जयजयकार करत होता...
रक्ताने माखलेला देह, वीर धारातीर्थी पडला,
मातृभूमीच्या रक्षणार्थच प्राण त्याने सोडला...
रक्षाबंधनाचा सण वाट पाहत होती बहिण,
आई-वडील होते तयार स्वागताला आनंदानं...
दारी पाहून शव भावाचे टाहो बहिणीने फोडला,
म्हातारे ते आई-बाप धीर त्यांनी सारा सोडला...
तिरंग्यात गुंडाळलेला भावाचा मृतदेह पहाते बहिण,
कशी बांधावी राखी भावाला कसला रक्षाबंधन...
रक्षाबंधनाच्या दिनी हवे वचन तुमचे तिला,
देश रक्षणाचे द्यारे सारे आज वचन या बहिणीला...