बळीची इडापिडा
बळीची इडापिडा
प्रसारमाध्यमांनो, तुम्हाला
जे दाखवायचं ते दाखवा;
पण आम्हा शेतकऱ्यांचं
"रडगाणं"ही दाखवा
'कोट'दाखवा, 'बोट'दाखवा,
रिजर्व बँकेची 'नोट' ही दाखवा,
पण उपाशी आमच्या लेकराचं
खंगलेलं 'पोट' ही दाखवा
'अमेरिका' दाखवा,'चीन' दाखवा,
विदेशवारीची विविध 'ठिकाणं' ही दाखवा;
पण दुष्काळाच्या भांडवलावर
चालणार व्यवस्थेचं'दुकानं'ही दाखवा
'चर्चा'दाखवा, 'रोखठोक'दाखवा
जाणिवा मेलेले 'प्रेक्षक'ही दाखवा,
पण आमच्या कर्जमाफीचा
घास गिळणारे'भक्षक'ही दाखवा
'राम' दाखवा, 'रहीम'दाखवा
धर्मकलहासाठी फुंकलेले'कान'ही दाखवा,
पण पाण्याच्या थेंबाथेंबासाठी
तहानलेलं आमचं 'रान'ही दाखवा
'नीरव'दाखवा,'मल्ल्या'दाखवा
बँकेतून लुटलेल्या 'रकमा'ही दाखवा,
पण खोट्या मलमपट्टीने आमच्या
पिचडलेल्या 'जखमा'ही दाखवा
'राफेल'दाखवा, 'बोफोर्स' दाखवा
पीकविम्याचे 'घोटाळे'ही दाखवा,
पण राजकीय अनास्थेपोटी
झालेले आमचे'वाटोळे'ही दाखवा
'नेते'दाखवा 'खादी'दाखवा
डोक्यातील स्वार्थाचा 'किडा'ही दाखवा,
पण शिवरायांच्या महाराष्ट्रातील
बळीची 'इडा-पिडा'ही दाखवा
