भोवरा
भोवरा
इथे सारंच योग्य किंवा अयोग्य ठरतं
व्यक्तीनुसार, लिंगानुसार, अणि परिस्थीतीनुसार.
नावारूपाला येतं सारंच खोटं दिमाखात
अणि जखमी होतं सत्य
घुसमटत काळोखात.
तिनं स्वतःलाच विचारलेल्या प्रश्नांचे पडसाद
तिच्याच कानावर येऊन पुन्हा आदळतात
कुठे आहे मी?
संशयाच्या भोवर्यात अडकलेल्या स्वतःला
ती पुन्हा वर काढू पहाते पण....
त्याच त्या परिस्थितीचा सामना करताना
हताश झालेली ती विश्वासाने एका खांद्यावर
क्षणभरासाठी डोकं ही टेकवते
बुडताना काठीच्या आधारासाठी आसावलेल्या
अणि नकळत खांद्यावर विसावलेल्या
तिच्या कडे तो पहातच राहतो....
तिचे डोके अलगद वर उचलून तो तिच्या नजरेत नजर मिळवतो.
ती भांबावून जाते त्या नजरेनं
तिचा पुन्हा प्रश्न, हे प्रेम की सहानुभूती?
याच वादळात गरगर फिरून उडू लागतो
तिच्या विचारांचा पाचोळा
अन् त्याला तुडवत तो नेहमीच वाट पहातो
तिच्या होकाराची,कुठल्या तरी अपेक्षेनं...
हो अपेक्षेनंच.
"निरपेक्ष प्रेम केल्याशिवाय माणसाला
प्रीतीचा खरा अर्थ समजत नाही "
अस तिचं वाक्य त्याला खटकतं
तो हसतो, ती पुन्हा दुखावली जाते
अणि अडकते, त्याच संशयाच्या भोवर्यात आता.... कायमची....
