भारतीय नारी
भारतीय नारी


नारी शक्ती
भारतीय नारी शक्ती
उजळते सारे विश्व
कर्तृत्वाच्या थोरवीने
दौडविती सप्त अश्व ||१||
एक कल्पना आकाशी
कोलंबिया नासातून
ठरे हिंद सौदामिनी
विश्वव्यापी नभातून ||२||
धुरा कन्या शिक्षणाची
क्रांतीज्योत पेटवून
झाल्या विभूषित स्त्रिया
सावित्रीच्या कुशीतून ||३||
समाजाची कन्या सिंधू
स्वावलंबी स्वयंपूर्णा
अनाथांची हीच माता
मूर्तिमंत अन्नपूर्णा ||४||
धन्य धन्य जिजाबाई
शिव प्रेरणेची खाण
शिवशाही वीर माता
हेच स्वराज्य निशाण ||५||
असे चतुरस्त्र भान
नाव ते मणिकर्णिका
भवानीचे रूप जणू
भासे शत्रूस कालिका ||६||
सत्यमेव जयतेचे
चाले कायम धोरण
अन्यायाला फोडे वाचा
स्त्री तेजाची ती किरण ||७||
किती आल्या किती गेल्या
जगी झाल्या या महान
यांच्या तेजापुढे झाले
तारे नभाचे लहान ||८||