परीराणी (बालगीत)
परीराणी (बालगीत)
1 min
56
परीराणी परीराणी
कशी दिसे छान छान
चंद्रावाणी मुखडा गं
तुझा गोरा गोरा पान ||१||
स्वप्नामध्ये आली माझ्या
घरी चांदण्याची परी
ताज चंद्राचा तो शिरी
पंख चमचम करी ||२||
पंखावर बसवून
तिने नेले तारांगणी
गोल मटोल चांदोबा
हसे नाचे नभांगणी ||३||
लपाछपी, गप्पाटप्पा
आकाशात ताऱ्यासंगे
लपे कसा हा चांदोबा
लिंबोणीच्या झाडामागे ||४||
चांदण्यात संथ वारा
गाई गोड गोड गाणी
चांदोबाच्या झोपाळ्यात
जोजविते परीराणी ||५||
इटुकला जीव माझा
गेला दमुन खेळून
घरी आणले स्वप्नात
पंखावर बसवून ||६||