रावण
रावण
कोण म्हणतो रावण झाला मृत
त्याने टाकली फक्त कात
तो तर आहे अजूनही जीवंत ...
हातावरच्या पोटाला नाही
समाधानाची भूक.
कधीकधी भाग्य देतं
पाठीशी गरीबीचं हूक.
जगण्याच्या वाटा साऱ्या
विरल्या गगनात .
महागाईचा रावण आहे
अजूनही जीवंत ...
अन्न, वस्त्र, आणि निवारा
इतकेच आहे मागणे .
निवडणुकीचे वारे वाहता
कठीण होते सारे मिळणे .
मोल नाही सज्जनांचे
पुढाऱ्यांच्या बाजारात.
आश्वासनांचा रावण
आहे अजूनही जीवंत ...
कुमतीच्या गर्भातुन उदयास
येई कपटी आचरण .
लयास जातो सदाचार,
सुविचार आणि साधे राहणीमान.
दुर्व्यवहार घेउन जाती
मानवास अंधारात .
भ्रष्टाचाराचा रावण आहे
अजूनही जीवंत ...
संयमी बलाढ्य रावणास
छेदूनी गेला रामबाण .
मरणोप्रांत असूर
होऊन गेला पावन .
शत्रूबुद्धीने झाला
विलीन अनंतात.
अहंकारी रावण आहे
अजूनही जीवंत ...
कलयुगी त्यास आपणच
घडवूनी आपणच जाळीतो .
स्वतःला राम म्हणवूनी
अभिमानाने छाती फुगवतो .
जळताना दानव जनास
पाहून खाक झाला राखेत .
गर्विष्ठ मानवात रावण
आहे अजूनही जीवंत