बाप
बाप
कधी कळणार तुला
हात कष्टातले बाळा
बाप तुझ्यासाठी किती
सोसतोय रोज झळा
बाप फोडतो ढेकळं
शेत पिकविण्यासाठी
पैसा जमवितो कसा
तुझ्या त्या शिक्षणासाठी
अंगावर परीधान
वस्त्र जुना फाटलेला
मीठ चटणी भाकरी
खात शेतात राबला
स्वप्न त्याचे ढेकळात
रोज रंगत असते
मिळवून पैसा थोडा
घरदार हो चालते
प्रेम बापाचे कधीही
खूप रागट दिसते
पण रागाच्या आडून
डोळे त्याचे ओलावते
