अल्लड प्रेम
अल्लड प्रेम
अल्लड प्रेम
अल्लडवयामध्ये झालेल्या प्रेमात कशाचाही विचार न करता आजकालची मुलं लग्न करून टाकतात पण जेव्हा वास्तव परिस्थिती समोर येते तेव्हा हातातली वेळ निघून गेलेली असते आणि आयुष्याची धुळधाण झालेली असते. परतीचे मार्ग सर्व बंद झालेले असतात आणि आयुष्य जगणे कठीण होऊन जाते.
वय दोघांचे सतरा
मिळताच नजरा
चेहरा झाला लाजरा
दिसू लागला खतरा
झाले प्रेमात मग्न
लागलीच केले लग्न
राहिले शिक्षण अपूर्ण
जीवनच केले जिर्ण
जड आहे हाता-तोंडाची मिळवणी
होतेय पूर्व क्षणांची उजळणी
सगळे तेव्हा होते रेलचेल
हे आयुष्य आता कसे झेपेल?
अविरत डोळ्यासमोर प्रश्न
संपले सुखाचे जश्न
नाही घरात तेल-मीठ
कालच संपले गव्हाचे पीठ
येत नाही नळाला पाणी
म्हणे सुखात ठेवीन राणी
नाही घरात लाईट
परिस्थिती एकूणच वाईट
तूच समोर रात्रंदिन
भरता येत नाही स्टोव्हची पीन
घेतल्या आणा-भाका शंभर
का नाही लावला सिलेंडरला नंबर
येत नाही मजला गोल भाकरी
शोध कुठेतरी तू चाकरी
कमवून आण जरा नोट
नुसत्या प्रेमावर कसं भरेल हे पोट
झोपडीत साचलीये घाण
सुखस्वप्नांची ती धुळधाण
कसे आणावे वाणसामान
अवघडले सर्व जीवनमान
संपली दोघांतील सबुरी
करावी लागतेय मजुरी
अल्लड प्रेमाचे भोगताय परिणाम
काळवंडलेय दोघांचे वर्तमान
सौ. शीतल ईशी
मनस्वी कलाकार

