श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
ब्रम्हा विष्णू महेश त्रिमूर्ती
सदैव करती भक्ता इच्छापूर्ती
घेण्या अनुसूयेची परीक्षा
अवतरले त्रिमूर्ती घेण्या भिक्षा
सती पतीव्रतेत मग्न
वाढ भिक्षा आम्हास नग्न
आले यती करण्या सत्व हरण
करतील स्वामी माझे तारण
मनी स्मरले पतीस सोडवण्या द्विधा,
स्तनपान मात्रे मिटवली अतिथी क्षुधा
राहिली भूवरी दत्त मूर्ती
करण्या जनांची कामनापूर्ती
विष्णू हाती असे शंख-चक्र
न करी भक्तांवर कुणी दृष्टी वक्र
महेशा करी त्रिशूल-डमरू
जगदीश पाठीराखा मी का घाबरू
ब्रह्मा हाती कमंडलू-माळा
दत्त ध्यानाचा लागला मज लळा
चार श्वान असती चार वेद
नाही मनी मज कशाचा खेद
गौस्वरूप असे भूमाता
तुजविण मज जगी कोण त्राता
प्रेमळ माऊली माझी दत्ता
असे जगी तुझी सर्वत्र सत्ता
मनोहर तुझे हे स्वरूप
आकर्षी जना वात्सल्य रूप
द्यावा मज तव सेवेचा ठेवा
आयुष्यभराचाच हा मेवा
नसे मज भविष्याची चिंता
असे दत्तगुरु माझा पिता
नष्ट होई नामस्मरणाने पातक
उद्धरी ईश स्वयं जातक
दत्त चरणी लागले ध्यान
झाले एकरूप हे चंचल मन
मी पणाची झाली बोळवण
असो सदैव त्रैमुर्तीचेच स्मरण
जे करती गुरुचरित्र पारायण
होईल त्यांचे सप्तजन्माचे तारण
ठेव सदैव तुझ्या चरणात खास
नसे अन्य मनी हीच आस
किती वर्णू दत्ताची महती
शब्द भांडार कमी पडती ती
🙏श्री गुरुदेव दत्त🙏
सौ. शीतल ईशी
(मनस्वी कलाकार)
