अजुनी
अजुनी
अजूनी तुझाच चेहरा
या भूलवितो मनास
ह्रदयात हेलकावे
उठती तरंग खास
अजूनी तुझ्याच साठी
ये पौर्णिमा भरास
तुजलाच पाहण्याचा
करी चंद्रही प्रयास
अजूनी तुझ्याच पाठी
हा लागतो सुवास
गंधीत पायवाटा
गंधाळला प्रवास
अजूनी तुझीच स्वप्ने
छळतात मज कशास
वरतात लोचनांना
लपतात आसपास
अजूनी तुझ्या स्मृतींशी
घोटाळतात श्वास
गर्दीत आठवांच्या
रेंगाळतात भास
अजूनी तुझी प्रतिक्षा
का सांज ही उदास
आधार होत आहे
जगण्यास क्षण क्षणास.