दाटलेल्या आठवणी!
दाटलेल्या आठवणी!
चिंचेचा डबा उघडताच आंबटचिंब वासानं मन कसं मोहरुन जातं
पण तोंडात पटकन टाकावी अस वाटत नाही हल्ली
आठवत राहत काही ....
शाळेच्या रस्त्यावर दफत्तरासकट उंच उडी मारून फांदी वाकवत ओरबाडलेला कोवळा पाला
कधी कच्च्या तर कधी गारसलेल्या तर कधी पिकलेल्या तोडलेल्या चिंचा …
कच्च्या चिंचोक्यासह खाल्लेल्या चिंचा…
उद्या जाताना तोडाव्या म्हणून झाडावरच शोधून ठेवलेल्या ,,
पण उद्या पुनः कधी न भेटलेल्या चिंचा…
कधी खेळण्यासाठी तर कधी खाण्यासाठी ठेवलेल्या चिंचोक्यासोबत बांगडीच्या काचा, आरशाच्या काचा, रंगीत खडे,रंगबिरंगी कागदाचे कपटे अन बराच काही असलेली खास पेटी ...
वाढत्या पसाऱ्यात हरवलेली पण आठवणीतील छवी मात्र तशीच!!!
चिंचेसोबत बोराच्या आंबटगोड आठवणी...
लालचुटुक बोरांनी गच्च भरलेलं बोराचा झाड फांदीला काठीने हलक मारले कि पडलेला सडा
सावरता सावरता भरलेली पिशवी
भाबी ची एक रुपयातील मनाची मोठठी श्रीमंती कायमची घर करून राहिली
त्या भाबीला आठवत असेल का मी?
असा आता मला विनाकारण पडलेला प्रश्न!!!
चिंचा बोरांच्या सोबत जुळलेल्या ऊस , करवंद, पेरू , जांभुळासारख्या रानमेव्हयाच्या गर्भश्रीमंत आठवणी
श्रावणी शुक्रवारच्या फुटण्याच्या आठवणी ...
शिकवताना मूठ - मूठ वाटलेले फुटाणे…
वाढदिवसाला प्रत्येक वर्गात जाऊन शिक्षकांना दिलेले रावळगाव चॉकलेट
अन सर्वांसमोर मिळालेला खूप मोठी हो असा आशीर्वाद नि तोंडभरून केलेल्या कौतुकानं मिळालेलं बळ !!!
तर कधी शाळेतर्फे मिळालेला अल्पोपहार मैत्रणीसोबत रिंगण करून , कधी बेंचवर बसून घासाघासांची केलेली वाटावाटी करत खाल्लेले डबे!
अवघड विषयांवरील काथ्याकूट ,शिक्षकांच्या आवडत्या नावडत्या गोष्टी आणि भावी वाटचाली विषयी आदर्श चर्चा !
समाजसेवा शिबिरात सोडून जाताना न निघणारा बाबांचा पाय व आई ला सोडून प्रथमच बाहेर राहणायचे दिवस… वाटून घेतलेली कामाची जबाबदारी , स्वतः बनवलेलं जेवण खाल्याने मिळालेली तृप्ती आणि स्वावलंबनाचं पहले पाऊल…
त्या पावला ची खूण आज कुणालाही न पटलेली!!!
आनंदमेळ्यातील विविध वस्तुंचे स्टॉल्स ,
मोठमोठ्या लाईट्स मधून पसरणारा पिवळाधमक प्रकाश आणि हसणारे , खिदळणारे , बागडणारी, मसतखोर, तर काही गंभीर चेहरे आणि आल्हाददायक वातावरण केलेली पहिली कमाई !!!
जरा आता मोठे झालो असा वाटणारा आभास व कॉलेज मधला प्रवेश…
रुंदावणाऱ्या विचारकक्षा , मैत्री ची पसरणारी वर्तुळे , खास मिसळपावच्या कॅन्टीन भेटी...
सहज म्हणून मैत्रीणींबरोबर हॉटेल मध्ये जाणे…
वाढदिवसाला एकमेकींच्या घरी जाणे, गप्पा मारत मारत संध्याकाळचे सात वाजले अस पाहताच गप्पा तश्या च सोडून घरी जाण्यासाठी धडपडणं!!!
कॉलेजच्या शेवटच्या दिवसात प्राध्यापकांपासून ते ग्रुप मधील सर्वांपर्यंत ,
स्लॅम -बुक फिरवणे, कुणी काय काय लिहेलये याचा …
त्याच्यावर मिथ्या विचार करत करत झोपी जाणे!!!
परीक्षेचे धीरगंभीर दिवस सपंताच …
एखादा चित्रपट पाहणे…
रिझल्ट लागताच निरोप संभारंभासाठी काही करता येइल का?
याचा विचार करत करत निरोपाच्या हळव्या क्षणी पत्र लिहू…
संपर्कात राहू… असा म्हणत म्हणत आपापल्या वाटांनी निघून जाणे…
आणि स्वःता ला एस्टॅब्लिश करण्यासाठी सतत धडपडत राहण!!!
संसारातील कुठलाही डबा उघडला कि आठवणी अशाच दाटून येतात…
उरतात त्या केवळ पाऊलखुणा !!! उरतात त्या केवळ पाऊलखुणा !!!

