अजब न्याय तुझा निर्मिका
अजब न्याय तुझा निर्मिका
अजब न्याय तुझा निर्मिका
स्वप्न रोमँटिक बघायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||0||
का दिलंस मन संवेदनशील असं
ओढ तिची सतत असते
तिच्यापासून अलिप्त राहू कसा
जोड तिची सतत असते
जिंकायचं सामर्थ्य देतोस आणि
खेळात मध्येच हरायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||1||
स्वप्न मात्र गोड दाखवतोस
प्रत्येक क्षण आपला वाटतं
भानावर येतो तेंव्हा कळतं
पत्ता आपला कापला वाटतं
जगण्याची आवड निर्माण होताना
दुःखाने ग्रासून मरायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||2||
प्रत्येक क्षणी वाटतं असं
कधीतरी हे हृदय बहरेल
जिंकेल प्रेम माझं आणि
कधीतरी हे नैराश्य हरेल
डोळ्यात आशेची चमक देऊन
अश्रूंनी डोळे भरायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||3||
दगडाचं हृदय बनवलं असतं
वेदना इतक्या झाल्या नसत्या
प्रेमाच्याही कल्पना इतक्या
मनात माझ्या आल्या नसत्या
हृदयात तिला सामावून माझ्या
का बाजूला सरायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||4||
का तडफड दिलीस मला
हृदय छातीत जोडताना
वेदना होत नाहीत का तुला
क्षणात याला तोडताना
माझ्याच हृदयाचं प्रेत मला
ओंजळीत माझ्या धरायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||5||
पंक्तीवर बसूनही मुखात जसा
घास अन्नाचा जाऊ नए
माझ्यासाठी जागाच नाही
हृदयात तिच्या मी मावू नए
क्रूर तजवीज करून अशी
वेदनेच्या चिखलात तरायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||6||
साऱ्या जगाचं प्रेम देतोस
मग तिच्याकडून वेदना का
जागत नाही तिच्या हृदयी
कधीच माझी संवेदना का
कळत नाही नक्की मला
काय तू मला करायला सांगतोस
हृदय प्रेमाने तुडुंब भरतोस
आणि आयुष्यभर एकटंच जगायला सांगतोस ||7||

