अग्नितांडव
अग्नितांडव
ऐरणीवर घाव हातोड्याचे
हुंकाराने चढवत होते
तप्त तप्त पोलादाला
आकारात मढवत होते
घामाच्या थेंबात उजळले निखारे
जोरात श्वास भरतं भाते
चंद्रमौळी झोपडीत लोहाराच्या
जीवन संघर्षाचे अग्नीतांडव होते
ठिणग्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या
धगधग पसरवत होते
कोळशांच्या रौद्ररूपात
अवजारांचे अलंकार घडते
कौशल्य पणाला लावून
तन मन झटत होते
घाव बसताच डोळे
आघाताने चमकत होते
कर्मदेवतेची पूजा
रात्रंदिवस कष्टाचे होते
घट्टे पडलेल्या हातात
लोखंडाचे जणू सोने होते
ही किमया सर्वांना कळू दे
ध्येयाला तप्त होऊन घडू दे
धावांची गती चढत चढत
आसमंताला गिळू दे
आसमंताला गिळू दे ||
