बोलायला कांहीही बोलतात. (भा. एक)
बोलायला कांहीही बोलतात. (भा. एक)
लोक काय हो बोलायला कांहीही बोलतात
कुणी खोके बोके धोके
तर कोणी डोंगर झाडी ओके बोलतात
आपल्याच बुद्धीचे वाभाडे
आपणच दिमाखात काढतात
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन
हरभऱ्याच्या झाडावर चढतात
सवंग प्रसिद्धीसाठी ताळतंत्र सोडतात
लोक काय हो बोलायला काहीही बोलतात ||
जनावरांचं मन असणारे
वरून माणसाचा बुरखा ओढतात
खाजगीतल्या गोष्टी बेधडकपणे
जाहीर रित्या सांगतात
स्वतःचे झाकून ठेवून
दुसऱ्यांचे वाकून बघतात
लोक काय हो बोलायला काहीही बोलतात ||
जीवनावश्यक गोष्टीवरून विचलित करून
भडक शब्दांनी लोकांना भुलवतात
कोणी धर्मांची कोणी जातींची
आपापली दुकाने चालवतात
महापुरुषांचे अनुयायी स्वतःला म्हणवतात
मात्र पैशांचे पुजारी बनतात
मिळेल तिथून जिरवतात
आश्वासन देऊन मिरवतात
स्वतः दोन-दोन पक्ष बदलणारे
इतरांना निष्ठा शिकवतात
लोक काय हो बोलायला काहीही बोलतात||
