मेघगंधार
मेघगंधार
गर्द मेघांच्या वरातीतून
सजुनी आली पावसाची धार
हिरवाईने नटली धरणी
नववधूचा जसा व्हावा शृंगार
आभाळाची प्रीत अनोखी रीत
बरसे असा धुंवाधार
नदी नाले तुडुंब भरती
दावी प्रेम अपार
गर्द वृक्षांच्या मांडवात
थेंब नाचती नयन चुकार
बेडकांच्या गायनात हरवली
लाजऱ्या पाऊलवाटेची किनार
असा होतो संगम सारा
मोरांचा फुले पिसार
काळजात टिपूनी ठेवावेत
अलगत थंड तुषार
कसे मांडावे शब्दात
हे अलौकिक चमत्कार
नाजूक थेंब करती
अशी काळजाची शिकार
बेडकांचे गळे फुगती
सुर ताल अविष्कार
मांडती प्रीत स्वरात
बांबूंच्या शिखरापार
वळणा वळणाने पाणी
घेते नयनरम्य आकार
डोंगर शिखरे सागर सारे
चिंब भिजती तृप्तीकार
फुलते मनाचे विश्व
होते मन निराकार
भूमीवरती दर्पण बनते
प्रीत घेते आकार
पशु पक्षी फुले
नाहती मेघ मल्हार
असा घडतो संगम
प्रीत भिडे आभाळापार
अधांतरी कसा हा चालतो
प्रीत खेळतो सावळाकार
असाच बरसत रहावा
मेघगंधार मेघगंधार|
