Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

परेश पवार 'शिव'

Inspirational


5.0  

परेश पवार 'शिव'

Inspirational


आठवण

आठवण

2 mins 150 2 mins 150

पश्चिमेकडे झुकायला लागलेल्या सूर्याला पाहत मी किनाऱ्यावर बसलेलो असतो..

गार वारा झुळूक बनून माझ्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतो..

एखाद्या चित्रकाराच्या रंगवलेल्या कॅनव्हाससारखं ते आकाश पाहताना तंद्री लागलेली असते माझी..

इतक्यात कुणाच्यातरी चाहूलीनं मी भानावर येतो.. मला ठाऊक असतं तीच असणार.. पण मी मुद्दाम मागे वळून पाहत नाही..

हलकेच नाजूक बोटांची टकटक उजव्या खांद्यावर होते..

..मी उजवीकडे बघतो तर ती डावीकडे बसून माझ्याकडे बघत हसत असते..

लटक्या रागानेच मी तिच्याकडे पाहतो तेव्हा खोडकर हसत मला वेडावून दाखवते... तोवर सूर्य पाण्यात बुडून विझत आलेला असतो.. आणि तिच्या गालावरच्या खळीतला चंद्रमा हलकेच मला खुणावतो..

नकळत एकमेकांच्या नजरेत हरवून जातो आम्ही दोघं..

त्या संधिप्रकाशात माझ्या अंगभर पसरलेलं तिचं ते चांदणं मी मुक्तपणे लुटत असतो माझ्या डोळ्यांनी.. अगदी डोळ्यांत समुद्र तरळायला लागेपर्यंत..

ती अलगद माझ्या मिठीत शिरते.. अगदी घट्ट मिठी मारते..

काही वेळाने मात्र ती मला बळेच तिथून घेऊन वाळूत चालायला घेऊन जाते.. आमच्या जुन्या जागा दाखवते.. तिथे असं झालं होतं.. तिकडे तसं केलं होतं..

हळूहळू मग मीच दमतो ती मात्र अजिबात दमत नाही..

मी तिथून काढता पाय घेतला तरी ती मात्र मला निघूच देत नाही..

शेवटी माझ्या डोळ्यातलं काहूर बघून ती माझा हात सोडते..आणि फक्त मला जाताना पहात राहते..

जड पावलांनी मी तसाच मागे फिरतो.. एकटाच..

मला माहीत असतं ती लगेच मागे येणार नाही.. म्हणून मीही सवयीनुसारमागे वळून न पाहता घर गाठतो.. 

मनात काहूर घेऊन जेव्हा अंथरूणात पडतो तेव्हा ती येते.. आणि अलगद माझ्या छातीवर डोकं टेकवून माझ्याशेजारी पडून राहते..

बराच वेळ झाल्यावर मला म्हणते, "बोल एकदा मनातलं आणि मोकळा हो रे.."

आणि एखाद्या हट्टी मुलासारखा मीही फक्त मनात बोलतो.. तिच्याशी नाही..

तेव्हा ती चिडते.. आणि रूसते.. पण माझ्या गालावरून ओघळत तिच्या कपाळावर जेव्हा पडतो माझा अश्रू.. तेव्हा मात्र सैल होऊ पाहणारी मिठी अजूनच घट्ट करत मला म्हणते.. "तुला हवं तर असा मोकळा हो.."

त्याच अवस्थेत मी कधी झोपी जातो माझं मलाच कळत नाही.. मध्येच जेव्हा पहाटे जाग येते तेव्हा ती निघून गेलेली असते..

तिची आठवण हल्ली मला अशीच भेटून जाते..

...ती गेल्यावर मी कागद पेन घेऊन लिहायला बसतो.. लिहून होईपर्यंत डोळ्यातल्या समुद्रालाही ओहोटी लागलेली असते..

लिहून झालं की त्या कागदावर सहज बोटं फिरवतो.. आणि डोळे बंद करून एकदा त्याचा वास घेतो..

तेव्हा मला कळतं..

माझ्या कवितेच्या शब्दांना..

अद्याप तिचाच स्पर्श आहे..

आणि अक्षरातील शाईला..

तिच्या आठवणींचा गंध आहे..


Rate this content
Log in

More marathi poem from परेश पवार 'शिव'

Similar marathi poem from Inspirational