आनंदाचे सूर मनी
आनंदाचे सूर मनी
चालत गेलो मस्त सकाळी
धूसर धुक्याच्या चादरीतुनी
थंडी होती बोचत तरीही
आनंदाचे सूर मनी
तलम रेशमी पडद्याआडून
खुदकन हसली झाडे लाख
लूट म्हणाली आनंदाला
चल चल पाऊल पुढती टाक
घेत म्हणाली मिठीत मजला
हिरवी हिरवी सुंदर वेल
नको करू निघण्याची घाई
थांब अजून तू थोडा वेळ
फुले म्हणाली मैत्री आपली
बहरत राहो अशी सदा
धुके असो वा धूमाट पाऊस
भेटीवर या नको गदा
रोज येत जा असाच इकडे
आम्हालाही तुझा लळा
आम्हालाही खूप सुखवितो
तुझा गायनी गोड गळा
कानापाशी येत म्हणाला
गुलहौशी तो सुंदर रावा
तुझी रसिकता खूप आवडली
सलाम करीतो माझ्या भावा
खळखळणारी नदी म्हणाली
मार येथल्या सूर जळी
आलास तू की माझीसुद्धा
खुलून जाते मस्त कळी !
