STORYMIRROR

Jayshri Dani

Action Inspirational

3  

Jayshri Dani

Action Inspirational

प्रीतीलता

प्रीतीलता

7 mins
187

      काही शस्त्र, क्षणार्धात स्फोट होऊन जाळून खाक करणारा बॉम्ब व पोटॅशियम सायनाईडची एक गोळी मास्टरदा उर्फ सुर्यसेन यांनी त्या आठ जणांच्या हातावर ठेवताच प्रीतीलता उचंबळून उठली. नाहीतरी एकविसाव्या वर्षाला शोभेल असे, आवडेल असे वस्त्र धारण करणे, साज-शृंगार करणे, कळ्या-फुलं माळणे तिला कधी सुचलेच नव्हते. सुचणार कसे? लहानपणापासून ती ब्रिटिश विरोधी कारवाया जे बघत होती. तिच्या अरुंद घरात, छोट्या गावात सतत याच तर चर्चा चालायच्या. इंग्रजांना देशातून हुसकवायचे आहे. त्यांची गुलामगिरी संपुष्टात आणायची आहे. देश पुन्हा आझाद करायचा आहे. 


      आहा स्वतंत्र! त्या स्वतंत्रतेचा मग चहुकडे सुवास पसरेल. पिवळ्या फुलांच्या वेली, तळ्यातील कमलिनी अधिकच जोमात फुलेल. पारापारावर जल्लोष राहील. जो तो मुक्तपणे जगेल. 


      तेव्हाच, तेव्हाच कदाचित ती नखशिखांत शृंगाराने नटली असती. माथ्यावर बिंदी, कपाळावर चंद्रकोर, कानात झुमके, अंगावर कोरी करकरीत बंगाली नववारी, हातात लाल हिरव्या बिल्वरांचा झगझगता चुडा घातला असता. त्यासाठी, त्यासाठीही एकजात साऱ्या ब्रिटिशांना देशाबाहेर हाकलायची तिला घाई झाली होती. ती झोपेत सुध्दा 'चले जाव' 'चले जाव' बडबडत रहायची. अहं कुणी स्वप्नसखा नव्हताच संपर्कात तर येणारच कुठून स्वप्नात? प्रीती फक्त देशावर. स्वातंत्र्यावर. ओढ फक्त देशप्रेमाची. देशाला पारतंत्र्यातून मोकळे करण्याची. 


      शाळेत शिकत असताना शाळेतील बालचर संस्थेत जेव्हा रोज ब्रिटिश निष्ठेची शपथ घ्यावी लागे तेव्हा ती अस्वस्थ अस्वस्थ होऊन जाई. पाठ्यपुस्तकातला झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा धडा डोक्यात घुमत राही. तात्या टोपे, अठराशे सत्तावनचा उठाव सरळ डोळ्यासमोर दिसे. म्हणून तर उमलत्या वयात आल्यावर तिचे रक्त जोरकस बंड करू लागले. रणधुमाळी माजवायला सज्ज झाले. 


      क्रांतिकारकांच्या सांकेतिक भाषेतील छोट्या छोट्या चिठ्ठ्या ती शालेय जीवनापासूनच इकडून तिकडे पोहचवायची पण तेव्हढ्याने तिला समाधान लाभत नव्हते. मुक्तीच्या संग्रामात ठोस काही कार्य करायचे होते. जीव पणाला लावायचा होता. म्हणूनच गावात लपून आश्रयाला येणाऱ्या नाम-अनाम क्रांतिवीरांना ती मनातल्या मनात हसायची. अपरिपक्व वयानुसार 'भ्याड' समजायची. 


"हे बघ, जीव जायच्या भीतीने इथे दडून बसलेय", एकदा ती उपरोधाने मैत्रिणीला सांगत असताना सुर्यसेन यांनी ते ऐकले आणि उभ्या जागेवरच तिची पार खरडपट्टी काढली. क्रांतिकारकांच्या जीवनाविषयी, कार्याविषयी सखोल माहिती देत तिची कानउघडणी केली. तेव्हा ती खरोखरचं चमकली. शर्मिन्दा झाली. त्यांची मनापासून माफी मागत त्यांच्या कार्यात हातभार लावायची इच्छा बोलून दाखवली. तिच्या ताठ बाण्याचा, डोळ्यांतील अंगाराचा परिचय तर झालाच होता त्यांना पण तिच्या रंध्रारंध्रात फुरफुरणारे स्वातंत्र्याचे स्फुल्लिंगही जाणवले. स्वातंत्र्यलढ्यात मिळतील तितके हात कमीच होते. त्यांनी क्षणात तिला आपल्या टोळीत सामील करून घेतले.


       अहाहाsss काय सुंदर जग होते ते! छातीवर गोळ्या झेलणारे निधड्या छातीचे एकसे एक वीर. त्यांच्या तेव्हढ्याच शूर बायका. कित्येक स्त्री वीरांगनाही. घरदारावर, वडिलोपार्जित संपत्तीवर, जन्मजात सुखावर, समाधानी संसारावर अलगद पाणी सोडलेले अवलीये. सगळ्यांना एकच आस, एकच कास, एकच ध्यास - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा. इतर कुठलीही अभिलाषा त्यांना स्पर्शू शकत नव्हती. सगळे तळहातावर प्राण घेऊन वावरत होते. त्यामुळे बंगालमधील पहाटोली गावाजवळील रणबाँकुर युरोपियन क्लबच्या बाहेर माजोर ब्रिटिशांनी लावलेला सूचना फलक त्यांनी पाहिला तेव्हा त्या सर्वांचे रक्तच खवळले. फलकावर लिहिले होते - कुत्रे व भारतीयांना प्रवेश वर्ज्य. 

 

       युरोपियन क्लबमध्ये इंग्लीश मेमसाब अन् भारतीयांचे हुद्दे बळकावून बसलेले बडे अधिकारी नेमाने येत. रमीचा डाव मांडत. बिअर-शांम्पेनच्या बाटल्या फेसाळत. त्यांची गोंडस गोबरी मुले विदेशी चॉकलेट्स, फ्रेंच फ्राईजचा आस्वाद घेत रंगीत रंगीत बॉलने एकमेकांशी खेळत. डोक्यावर पिसांची गोल हॅट घातलेल्या निळ्या डोळ्यांच्या अल्लड नवथर गोऱ्या तरुणी खोल गळ्यांचे, लेसचे, फिक्या किंवा गुलाबी रंगाचे झालरवाले झगे परिधान करून व कोपराभर हातात पारदर्शक मोजे घालून आपल्या आवडत्या युवकासोबत मजेत झुलत येई. तेव्हा तर कुणी भारतीय त्यांना काहीच म्हणत नसे किंवा त्याच्या मौजमस्तीत बाधाही आणत नसे. पण हे तुसडे इंग्रज मात्र साध्याभोळ्या भारतीयांना डिवचायची एकही संधी सोडत नसे. त्याच कुरापती दुष्ट मानसिकतेतून त्यांनी मोठ्या अक्षरात चटकन लक्ष जाईल असा तो फलक क्लबबाहेर लावला होता. 


     तो फलक पाहिल्यापासून भावना दुखावलेल्या सुर्यसेन यांच्या अंगाची आग आग होत होती. शब्दाशब्दातून ठिणग्या झरत होत्या. डोळ्यांत निखारे फुलत होते. जणू त्यांचा अवघा देहच तळपती मशाल झाला होता. ब्रिटिशांना भस्मसात करण्यासाठी त्यांनी समूहातील आठ हिरे निवडले. आठही जण म्हणजे अक्षरशः आगीचा लोळ होते. त्यात प्रीतीलता होती. साक्षात ज्वाला.


      प्रीतीलता वड्डेदारने आतापावेतो खूप क्रांतिकारी कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. पण ही जरा वेगळी होती. मोठ्या जोखमीची होती. यात इंग्रजांच्या डेऱ्यात थेट घुसून त्यांचा सुंभा उध्वस्त करायचा होता. पिळही जाळायचा होता. तिला आत्मविश्वास होता ती हे करू शकेल म्हणून. या आधीही मॅट्रिकनंतर तिने अभ्यासाबरोबर गुप्तपणे चळवळीशी संबंधित कार्याला हिरीरीने सुरुवात केली होती. शैशव ओलांडता ओलांडताच तिचा क्रियाकलाप इतका वाढला की ती अलीपुर तुरुंगात बंदिस्त असणारे स्वातंत्र्यसैनिक रामकृष्ण विश्वास यांना अनेकवेळा निर्भयपणे जाऊन भेटली होती. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नकळत त्यांच्याशी वार्तालाप करताना ती सशस्त्र चळवळींकडे ओढल्या गेली. ठोस्याच्या बदल्यात ठोसा, बुक्कीच्या बदल्यात बुक्की, गोळीच्या बदल्यात गोळी तिला पटायला लागले. ती गुप्तपणे चटगाव येथील क्रांतिवीरांना शस्त्र पाठवू लागली.


      प्रीतीलताचे देशाप्रती समर्पण लक्षात घेता सुर्यसेन यांनी तिच्या नेतृत्वात अनेक ब्रिटिश विरोधी मोहीम आखल्यात ज्या तिने स्व हिमतीवर पूर्ण करून दाखवल्यात. ती देशसेवेच्या प्रत्येक कसोटीत खरी उतरत होती. त्यासाठी तिला घरदार सोडून वणवण करावी लागली तरी तमा नव्हती. इंग्रज अधिकाऱ्यांना जेरीस आणताना बरेच महिने ती सुर्यसेन यांच्यासमवेत कलकत्त्याजवळ निवास करणाऱ्या सावित्री नामक निडर स्त्रीकडे अज्ञातवासात मुक्कामी राही. पुढे ही सावित्री सुद्धा इंग्रजांच्या कोपाला बळी पडली होती. परिचित अपरिचित अशा कितीतरी महत्वाच्या लोकांची गोऱ्यांमुळे हानी होत होती. घराघरातील अजाण बालक, बलशाली तरुण, नाजूकसाजूक परंतु कणखर स्त्रिया, सर्व वयोगटातील पुरुष बसल्या जागी आनंदाने आपली आहुती देत होते. या सगळ्यांच्या बलिदानाची किंमत एकच होती आणि ते म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य. स्वातंत्र्य मिळवायचेच होते त्यांना अन्य दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. 


       सगळे जहाल विचारमतवादी क्रांतिकारी पेटून उठले होते. अन्यायकर्त्यांचा चेंदामेंदाच करायचा होता. भल्या मार्गाने नाही सोडत का आमचा देश? मग दिसेल तिथे ठेचायचे, ठेचायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरू होता. 23 सप्टेंबर 1932 ला क्लबवर हल्ला करण्याचे निश्चित झाले. रात्री दहा पंचेचाळची वेळ पक्की झाली. त्यावेळी फिरंग्याची पार्टी ऐन रंगात आलेली असेल. त्यांच्या शुद्धी-अशुद्धीला काही सीमा नसेल. उंची पेय रिचवून ते बेहोशीत झिंगत असेल. मदमस्त ललनांच्या नाच गायन वादनात मग्न असेल. 


गनिमी कावा.

वैऱ्यांवर डाव साधायचा.


"वंदे मातरम" चा उद्घोष करीत प्रीतीलताच्या चमूने समूहाचा निरोप घेतला. सोबत नेत्रसेन सारखे अनुभवी धुरंधर साथीदार होते. प्रीतीलताने क्लबच्या खिडकीत बॉम्ब पेरला. सर्वांनी सावध जागा घेतली. पुढच्या हालचालींवर नजरा रोवल्या. दहा सेकंदातच बॉम्बचा स्फोट झाला. क्लबमध्ये हाहाकार माजला. आग पसरू लागली. जखमी, घाबरलेले इंग्रज स्त्री पुरुष जीव वाचवायला इतस्त धावू लागले. प्रीतीलताच्या सोबत्यांनी सशस्त्र हल्ला चढवला. आक्रमणाची जाणीव होताच इंग्रजांनीही बेछूट गोळीबार सुरू केला. एक, एक साथीदार धारातीर्थी पडू लागला. पण आता शोक करायची, विचार करायची वेळच नव्हती. हल्ला कामयाब झाला होता. इप्सित साधले होते. निघायला हवे होते.


      वतनासाठी कुर्बान झालेल्या जीवलग जोडीदारांकडे ओली नजर टाकत मनोमन त्यांना सलाम करून प्रीतीलता परत फिरली परंतु थोड्या अंतरावरच इंग्रज शिपायाने ताणलेली एक सणसणीत गोळी तिच्या पाठीत शिरली. रक्ताची चिळकांडी उडून ती खाली कोसळली. पण अजून प्राण शाबूत होता. प्रयत्न केले तर पळ काढून सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य होते. जीव वाचलाच तर देशाची अधिक सेवा करण्याचे भाग्य लाभणार होते. रक्तबंबाळ अवस्थेत प्रीतीलताने पाऊल उचलले. ती आगे कूच करणार तेव्हढ्यात बंदूकधारी विदेशी सैन्याकडून आपण चारही बाजूने घेरल्या गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिची अटक अटळ होती.


        अटक झाल्यास सश्रम कारावास, हाल हाल करून मारणे नशिबी लिहिलेच जाणार होते. इंग्रज अहिंसावादी मवाळ कार्यकर्त्यांवर थोडीफार मेहरबानी करत. त्यांना फार त्रास देत नसे पण जहाल झुंजार क्रांतिवीरांना ते जिवंतपणी मरणयातना भोगायला लावत. सहजासहजी मरूही देत नसे. नख ओरबाडणे, कातडी सोलणे, डोळे फोडणे, कानात तप्त सळाखी घालणे, हातपाय तोडणे, जीभ कापणे, लघवी प्यायला लावणे, अळ्या-किड्यांचे भोजन खाऊ घालणे असे शेकडो घृणास्पद क्रूर प्रकार ते करत. तरीही स्वातंत्र्याने प्रेरित स्वातंत्र्यसैनिक बधत नसे. त्यांच्या अर्धमेल्या मुखातून भारतमाता की जय असा अखंड जयघोष सुरूच राही. तेव्हा चीड येऊन इंग्रज सरकार त्यांना फासावर लटकवे. 


      मरण तर निश्चितच होते. इंग्रज अधिकारी कुठलेतरी उघड किंवा छुपे कलम लावून तिची विटंबना करत जीव घेणार यात काहीही वाद नव्हता. अर्थात भीती मरणाची नव्हतीच. फक्त ते कसे स्वीकारायचे हा प्रश्न होता. खरेतर तोही प्रश्न नव्हता. सगळे ठरलेलेच होते. मनीमानसी जाहीर होते. क्षणाचाही विलंब न करता प्रीतीलताने मुठीतील पोटॅशियम सायनाईडची गोळी जिभेवर ठेवली. एखादी नदी वहावी तसा जळजळीत विषारी द्राव झपाट्याने तिच्या घशातून पोटात शिरला. छातीत चमक उठली. पोट भाजून निघाले आणि हसऱ्या प्रीतीलताची क्षणार्धात मान कलली. निमिषात घडलेले हे नाट्य उमजायला इंग्रज अधिकाऱ्यांना वेळ लागला. 


      ते प्रीतीलताला विद्वेषाने हलवत असताना, जागवत असताना तिच्या डोळ्यातील मिटणाऱ्या बाहुल्यांपुढे शुभ्र वस्त्रांकीत भारतमाता झळकत होती. भारतमातेच्या हातापायातील शृंखला खळाखळा गळून पडल्या होत्या. भारतमाता गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त झाली होती. शांतीदूताचे प्रतीक असणारे शेकडो पांढरे सफेद गुबगुबीत कबुतर हवेत उंच उडत होते. सगळीकडे हर्षोल्हास पसरला होता. आनंदीआनंद झाला होता. तिरंगा मानाने लहरत होता. हेच, हेच तर स्वप्न पहात मोठी झाली होती प्रीतीलता. 


       एकवीस पूर्ण होईल गं, आता तुझा विवाह करायला हवा माँ राहून राहून म्हणायची. कारकुनीत आयुष्य गेलेले वडीलही जावई बघायला तरसायचे. तिच्या सोळा शृंगारासाठी सख्या आसुसायच्या. ते आठवून तिने अंगाखालची माती कपाळावर लावली. ओहो याहून अधिक काय असणार सोळा शृंगार? ती हसली. इतके सुंदर अनुपम मरण. भारतमातेच्या मुक्तीसाठी आपलेही प्राणपाखरू उंच अस्मानात भरारी घेताना बघून तिनेही समाधानाने शेवटचा श्वास घेतला. स्वातंत्र्याच्या लढ्यात अजून एक कोवळा मोती शहीद झाला.


(प्रीतीलता वड्डेदार यांचे छायाचित्र गुगलवरून साभार घेतले आहे)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action