बाप माझा
बाप माझा
बाप माझा
पहाडा सारखा । भक्कम पाठीशी।।
लढतो दुःखाशी । बाप माझा।।१।।
स्वतःच्या घामाने । शेत भिजवितो।।
मोती पिकवतो । बाप माझा।।२।।
जयाच्या कष्टाने । मिळे धान्य राशी।।
प्रसंगी उपाशी । बाप माझा।।३।।
फणसाचा गर । मधूर रसाळ।।
तैसाचि मधाळ । बाप माझा।।४।।
एकटा ओढतो । गाडा संसाराचा।।
गर्वभार त्याचा । नाही त्यासी।।५।।
व्यवहार ज्ञान । अनुभव खाण।।
जगाचे शिक्षण । बाप माझा।।६।।
संकटा पुढती । मानली ना हार।।
हताश, लाचार । कधी नाही ।।७।।
हातामध्ये काम । हरीनाम मुखी।।
असे सदा सुखी । बाप माझा।।८।।
ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।।
तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी।।९।।