वेदना मनाच्या
वेदना मनाच्या
नीता आणि अजय यांच्या लग्नाला जवळजवळ पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. गरीबीत संसार करताना अनेक अडचणींचा संघर्ष करावा लागला होता.लहानसहान नोकर्या करून घर चालविणे अवघड झाले होते. आर्थिक परीस्थितीला सामोरे जाताना दिवसाची नोकरी करून रात्रीची सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागत होती. त्यामुळे घरभाडे व घरखर्च काटकसर करून केला जात होता. त्याच गरीबीत त्यांना दोन मुले झाली होती. मुले लहान वयात खूप समजदार होती. कोणत्याही खाण्याच्या वस्तूसाठी ते हट्ट करत नव्हते.जणू काही त्यांना आईच्या गर्भात असतानाच आपल्या गरीबीची चाहूल लागली होती की काय? असा प्रश्न पडला होता. गरीबीत ही मुले वाढत होती.खाजगी शाळेत शिकत होती. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत नव्हता कारण लहानसहान आजार ती बिनधास्तपणे त्यांच्या प्रतिकार शक्तीच्या जोरावर व गरीबीच्या चटक्यामुळे सहन करायची. फारतर फार एक दोन रुपयाची मेडीकलची गोळी औषध म्हणून आणावी लागायची. किती तरी वर्षे गरीबीत हे असेच चालायचे.
खाजगी शाळेत शिकत असतांना ते दोघेही हुशार होते. अभ्यासूवृत्ती मुळे ते कधीच नापास होत नव्हते. कधीकधी शाळेच्या फीसाठी दागिने गहाण ठेवावे लागायचे. ते एकदा ठेवले की सोनाराला पैसे परत जात नव्हते त्यामुळे व्याज व मुद्दल एकत्र झाले की दागिने स्वस्तात व मातीमोल भावात सोनार घेत असे. त्यात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किती ग्रामवर किती पैसे येतात तो हिशोबसुद्धा कळत नव्ह्ता. त्यात दागिने संपले. कधीकधी एवढी पैशाची टंचाई भासायची की घरातील टी.वी. गहाण ठेवावा लागायचा. तो सहा महिन्याच्या आत आपण सोडवला नाही तर मातीमोल भावात सोनार घेत होता. काही गुजराथी व मारवाडी सोनार तर ग्राहकाला खूप हैराण करायचे. महाराष्ट्रात राहून मराठी ग्राहकाला धमकी द्यायचे. त्यातच कितीतरी मराठी माणसांचे सोने गेले होते. तशीच परिस्थिती ह्या गरीब कुटुंबाची झाली होती. तेवढ्यावरही ते थांबत नव्हते. घराचे पेपर घेऊन जास्त दराने व्याज आकारून घर स्वस्तात घेतले जात होते.
अशा परिस्थितीत ही मुले वाढवली होती. त्यांच्यासाठी घर, बंगला घेतला होता. जमीन होती सर्व काही वडिलांनी कमविले होते. स्वतःच्या जगण्यासाठी बचत म्हणून दोन-तीन लाख सरकारी बँकेत एफडी करून ठेवले होते. ती भविष्याची व वृद्धापकाळातील तरतूद होती. मुले शिकून शहाणी झाली होती. ताकदीने व शिक्षणाने मोठी झाली होती. त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे दोघांनाही सरकारी नोकरी मिळाली होती. गरीबी त्यांना माहीत होती. त्यामुळे पैशाचे नियोजन त्यांच्याकडे होते. स्वतःच्या पगारातील हिस्सा स्वतःच्या नावावर ठेवत होते. आईवडिलांच्या जीवावर मोठी झालेली मुले आईवडिलांना, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही खर्च करताना आम्हाला विचारा?असे बोलू लागली. त्यात आई वडिलांचे भांडण होत असे. मुलांना आई हवीशी वाटायची बाप नको होता. त्याची मालमत्ता पाहिजे होती; पण घरात तो नकोसा होता. आईवडिलांचे भांडण किरकोळ असायचे: पण मुलांना ते मोठे वाटायचे. ते बापाला जेवण देऊ नको, त्याला पाणी देऊ नको, त्याला अंथरूण टाकून देऊ नको, त्याचे कपडे धुवू नको, असे बोलू लागली. त्यामुळे आईला प्रश्न पडला होता की कुणाचे ऐकायचे? तिला मुले हवी होती, नवरा हवा होता. मुलांच्या भांडणात तिची घुसमट झाली होती. तिला काय करावे? ते कळेना. शेवटी भांडण एवढे विकोपाला गेली की आईवडिलांचा घटस्फोट घेण्याची वेळ आली. दिवस व वार ठरल्यामुळे दोन मुले, आई वडिल व तिच्या मैत्रिणी आल्या. वकिलासोबत बोलणी सुरु झाली. आईवडिलांच्या पंचवीस वर्षाचा केलेला संसार मोडणार होता. आईवडिलांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा जुन्या आठवणी जाग्या करत होता. दोघांच्या मनात ते नकोसे होते: पण शेवटी टोकन म्हणून वकिलास सहा हजार रुपये दिले. मालमत्ता विभागणी बोलणी झाली होती. सहा महिन्यांनी दोघे कायमचे वेगळे होणार होते. दोघे कायम एकमेकांना सोडणार होते. हे पाहून जीवन संपल्याचे दु:ख झाले होते. जगून उपयोग नाही असे वाटू लागले. मुलांना आईवडिलांच्या दु:खाशी व भावनांशी काहीही देणे घेणे नव्हते. त्यांना घर-पैसा मिळणार होता. पण आईचे रडणे थांबत नव्हते. तिचा जीवनसाथी कायमचा तुटणार म्हणून ती सतत रडत होती. बाप रडत होता. हल्ली पिढ्या संवेदनाहीन होत आहेत. नवरा कणखर भूमिकेचा होता. त्वरीत निर्णय बदलला. वकीलाला घटस्फोट घेण्याचा निर्णय थांबवला.
आता परत या निर्णयाने जीवनात आनंद निर्माण झाला. एकदाचे वादळ शांत झाले. मोडणारा संसार थांबला. एकाकीपणा काय असतो ते माहीत झाले. एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजे हे शिकायला मिळाले. शेवटी पती व पत्नी हे म्हातारपणात फार मोठे आधार असतात. ते दोघेही अतूट रहावे. आयुष्यात जीवनसाथी असावा तरच त्या जगण्यात मजा आहे अन्यथा दु:खाशिवाय दुसरे काहीच नाही.
