आईस पत्र
आईस पत्र
दिनांक-06-05-2021
रा.मांजरगाव.पोस्ट.म्हाळसाकोरे
ता.निफाड.जि.नाशिक
पिन.422210
तीर्थरुप,
आईच्या सेवेशी,शि.सा.दंडवत.
विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की मी आज तुझ्या आठवणीचे पत्र लिहिणार आहे.पण तू हे पत्र ऐकायला आज तरी नाहीस.नाव तुझे सुंदराबाई नावाप्रमाणेच तू सुंदर होती.पण आयुष्य खडतर होते.अगदी कमी वयात माझा बाप वारल्यानंतर तुझाही सहवास कायमचा संपला.पण तुझ्या आठवणी आजही जीवंत आहेत,बोलक्या आहेत.तुझ्या आठवणी म्हणजे जीवंत इतिहास आहे.एक आमच्या आयुष्यात फार मोठी प्रेरणा आहेत.अगदी तुम्ही पती पत्नी म्हणून दुष्काळात केलेली कामे.गरीबीच एव्ह्ढी होती की त्यात दुष्काळ म्हणजे उपासमार.त्यात कधी फक्त भाकर मिळे तर कधी फक्त रानातली भाजी शिजवून खायचे.त्याच दुष्काळात पोटच्या मुलीचा बळी गेल्याचे भयानक दु:ख.
अशा या लहान वयात आम्हांला दु:ख आणि दुष्काळ काय माहीत असणार?पण तुम्ही दिवसभर मातीच्या कामात भर उन्हाचे चटके सोसून आम्हांला जगवत होते.आजच्या सारखे ओटीभरण,लग्न वाढदिवस ही पद्धत नव्हती.माझा व बहीणीचा जन्म मातीच्या घरात झाला होता.त्यात पावसाळ्यात सारे घर पाण्याने भरायचे.पाणी उपसताना तुम्हांला रात्रीची झोप मिळत नसे.त्यात सुद्धा तुम्ही आम्हांला कोरड्या जागेवर ठेवून झोपी लावायचे. किती काळजी घ्यायची आई म्हणून.माझा बाप गेल्यानंतर तुझ्यावर भयान कष्टाची परिस्थिती ओ
ढ वली.तुला आज आम्ही जे शूज,चपला वापरतो ते कधीच माहीत नव्हते.आयुष्यभर परिस्थिती चप्पल घेण्याइतपत पैसे शिल्लक ठेवू देत नव्हती.अनवाणी पायात तू कडू लिंबाचा पाला बांधून डांबरी रस्त्याचे काम करायची.माझ्यानंतर दोन भावंडे असा आपला परिवार तुला सांभाळणे फार अवघड जाऊ लागले.शेवटी गिरणीतले खाली पडलेले अनेक धान्यांचे पीठ आणून त्याच्या भाकरी करून आम्हांला जगवत होती.धन्य तुझ्या ममतेला ! खरच आई एव्हढे कष्ट असून तू हिम्मत सोडली नाहीस.निरक्षर असून आपल्यासारखे कष्ट नको म्हणून खूप शिकविले.मोठे केलेस.सर्व काही तुझ्यामुळे मिळाले.तुझे उपकार मी विसरू शकत नाही.फिटले पण नाही.सुखाचे दिवस आले आणि तू आम्हांला कायमची सोडून गेलीस.आता जगतो तुझ्या आठवणीवर.तुझ्या कष्टाच्या प्रेरणेवर.पण आई तू आज हवी होती.तुझ्याशिवाय ह्या जगात खरे प्रेम करणारे कुणीच दिसत नाही.मला सर्व काही मिळाले ;पण आई आज तू नाहीस.ती उणीव कायम माझ्या आयुष्यात राहील.
मी परमेश्वराला विनंती करतो माझ्या आईला परत या मानवी देहात येऊ दे.मला सात जन्मी अशीच आई पाहिजे. तुझ्याशिवाय हे सारे वैभव,धन मला कमीच आहे.तूच माझी खरी नश्वर संपत्ती होती.माफ कर आई काही कर्तव्ये आमच्यातून राहिली असतील.'ब 'तू आमच्यासाठी अमर कहाणी आहे.('ब'म्हणजे आई.पूर्वी आईला 'ब'हा 'जिव्हाळ्याचा शब्द' आईसाठी वापरत होते.)
कळावे,
तुझाच मुलगा
संजय