Prasad Kulkarni

Abstract

5.0  

Prasad Kulkarni

Abstract

वाटेवरचे कुणी

वाटेवरचे कुणी

3 mins
944


संदेश आमच्याच सोसायटीतल्या आमच्या बाजूच्या विंग मध्ये राहायचा. संदेश म्हणजे 'संदेश संजू कित्तुर'.  


आम्ही या सोसायटीमध्ये १९९४ साली राहायला आलो. अगदी तेव्हापासून मी त्याला पहातोय. त्यावेळी संदेश आठव्या इयत्तेत होता. घरात तो त्याची धाकटी बहीण , आई - वडील आणि आजी - आजोबा असं सहा जणांचा परिवार. संदेशाची आई गुजराथी होती. वडील फारसे शिकलेले नव्हते. ते ज्या कंपनीत नोकरी करत होते ती अचानक बंद पडली. उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. संदेशची आई बोलण्याचालण्यात एकदम स्मार्ट पण आत्मकेंद्रित स्वभावाची. घरात नेहमीच तिचा शब्द अखेरचा असायचा. संपूर्ण घरावर असलेला तिचा दबदबा जाणवायचा. आजी खूप बडबडी होती पण आजोबा मात्र खूपच शांत स्वभावाचे होते. संदेशच्या वडिलांनी घराचा पूर्ण ताबा आणि जबाबदाऱ्या जाणीवपूर्वक आपल्या पत्नीकडे सोपवला होता , कारण त्यांचा स्वभाव मित्रमंडळ - धमाल आणि आपली रिक्षा एव्हढ्यापुरताच मर्यादित असल्यामुळे घरात त्यांचा पाय ठरतच नव्हता. दोन्ही मुलांना आईचा धाक असला तरी तो आदरयुक्त किंवा प्रेमळ शिस्तीचा नव्हता , तर एखाद्या जेलर सारखा होता. अशा प्रकारच्या धाकामुळे हळुहळु मुलांमध्ये कोडगेपणा नावाची भावना जन्म घ्यायला लागते. नाही म्हणायला संदेशच्या आजोबांचा मात्र त्याच्यावर फार जीव होता. 


ही पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश एवढाच की तो अशा वातावरणात मोठा झाला होता. त्याच्या वागण्या बोलण्यातही आईचा स्मार्टनेस आणि वडिलांचा बेफिकीरपणा या दोन्हीचं मिश्रण जाणवायचं. संदेश हुशार होता. त्याची आकलनशक्ती सगळ्याच बाबतीत चांगली होती. परंतू या हुशारीला जोपासायला आणि तिला योग्य दिशा द्यायला घरात कुणालाच वेळ नव्हता. वडील आपल्या नादात आणि आई आपल्या तोऱ्यात , त्यामुळे त्याच्या कुठल्याही यशाचे भागीदार आजोबा असायचे. आम्ही कधी सोसायटी आवारात भेटलो की नातवाचं कौतुक आम्हालाही सांगायचे.  


संदेशला क्रिकेटची मनापासून आवड होती. सोसायटीतील मुलांना जमवून तो क्रिकेट खेळत असायचा. त्याच्या या आवडीला खतपाणी घालण्यासाठी आजोबांनी कौतुकाने त्याला क्रिकेट शिबिरात प्रवेश घेऊन दिला होता. सोसायटीमध्ये खेळताना मी अनेक वेळा त्याला ओरडलो होतो , कारण तो जवळजवळ दिवसभर क्रिकेट खेळत असायचा.  ओरडल्यावरही तो एका विशिष्ट प्रकारे चिडवल्यासारखा हसायचा. आईचा ओरडा अगदी फारच वाढला की घरी पाळायचा.  


आणि होता होता संदेश दहावीत उत्तीर्ण होऊन अंधेरीच्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये जायला लागला. आता सोसायटीच्या आवारात त्याचं दर्शन सुटीच्या दिवशी किंवा रविवारी होऊ लागलं. हल्ली त्याच्या मनातल्या क्रिकेट प्रेमाची जागा हातातल्या मोबाईलने घेतली होती. कधीही नजरेस पडल्यावर कानात हेड फोन घालून गाणी ऐकताना दिसायचा. संदेशच्या करिअरकडे आजवर कधीच गांभीर्याने न पहाणाऱ्या त्याच्या पालकांनी मोबाईलची सुविधा मात्र तो कॉलेजमध्ये जायला लागल्याबरोबर त्याला उपलब्ध करून दिली होती.  

आणि एक दिवस...


 ती भयंकर बातमी सोसायटीमध्ये येऊन थडकली. त्या बातमीने संपूर्ण बिल्डिंग सुन्न झाली. अंधेरीला रेल्वे रुळ ओलांडताना संदेशला ट्रेनने उडवलं. यावेळीही त्याच्या कानात हेडफोन होते. मोटरमनने अनेक वेळा हॉर्न वाजवला परंतू कानातल्या हेडफोन्सनी तो आवाज कानापर्यंत पोहोचू दिला नाही. ब्रेक मारण्याचा सर्वतोपरी प्रयत्नही त्याने केला पण काहीच उपयोग झाला नाही. चार दिवस हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंज देऊन संदेश या जगातून कायमचा निघून गेला. घरातला एकुलता वयात आलेला मुलगा , आजी - आजोबांचा लाडका नातू निष्काळजीपणाचा बळी ठरला.  


संदेशचं असं जाणं माझ्या मनाला खूप चटका लावून गेलं. आजोबा लाडक्या नातवाच्या जाण्याने खूप एकटे झाले. संदेशचं कौतुक सांगायला आज तोच अस्तित्वात नव्हता. काही काळाने आजी आजोबाही गेले.


आजही बिल्डिंगच्या आवारात मुलांचं क्रिकेट जोरात सुरू असतं , फक्त त्या मुलांमध्ये संदेश मात्र कुठेच दिसत नाही.  


हे सारं पाहून ऐकून असं वाटतं , कुठे चाललीय आजची तरुण पिढी ? वेगवान आयुष्याबरोबर धावताना आपल्या संस्कारांना , संस्कृतीला आणि मूल्यांना विसरून पाश्चात्य संस्कृतीला जवळ करताना त्यामधल्या अंगिकारायला नको त्या गोष्टींना आपण कवटाळतेय . पण मग यामध्ये पालक म्हणून आपणही तितकेच दोषी आहोत का ? आज मुलं घराबाहेर पडल्यावर ती काय करतात यावर आपलं काहीच नियंत्रण नाहीय. त्यांची मोबाईलवर चौकशी करून मोकळे होण्यापेक्षा घरी आल्यावर समोरासमोर संवाद साधण्यात तर आपण कुठे कमी पडत नाही ना त्याचबरोबर मोबाईल सारख्या gadgetला आपण सगळ्यांनीच अक्षरशः द्यायला नको इतकं आपल्या आयुष्यात जवळचं स्थान दिलंय का ? आज शाळेपासून हे gadget जवळ बाळगायची सवय झालेल्या मुलांना ते वापरण्याच्या जबाबदारीचं भान आपण कसं आणून देणार आहोत ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे खरंच आहेत का ?


नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं हे तत्वतः मान्य करतानाच त्यासाठी आपली मानसिकता तितकी प्रगल्भ झालीय का याचा एकदा मनापासून विचार करायला हवाय.  

मनाने कच्च्या , ओबडधोबड आणि अपरिपक्व असणाऱ्या या मडक्यांना लहानपणीच घासून पुसून , योग्य आकार देऊन परिपक्व करण्याचं काम गुरुजनांइतकच आपलंही आहे हे आजच्या स्मार्ट पिढीच्या पालकांनी जाणून घेतलं आणि परस्परांमधला संवाद वाढवला तर मला वाटतं कुटुंब उध्वस्त करणारे हे अपघात कमी होतील. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract