Prasad Kulkarni

Others

1  

Prasad Kulkarni

Others

सफर आदिवासी गावांची

सफर आदिवासी गावांची

4 mins
592



खूप वर्ष झाली या गोष्टीला. विदेशी बँकेत नोकरी करत असतानाच मला अचानक स्थिर छायाचित्र काढण्याचा नाद लागला. म्हणजे त्याचं झालं असं की १९८० मध्ये आम्ही राजा ट्रॅव्हल्स मधून काश्मीर सहलीला गेलो होतो , त्यावेळी मी प्रथम कॅमेरा हातात धरला. सहलीहून परत आल्यावर जेव्हा फोटो प्रत्यक्ष पुढ्यात आले तेव्हा जाणवायला लागलं , अरे आपल्याला जमतंय की फोटो टिपायला. मी ज्या फोटो स्टुडिओ मधून फोटो डेव्हलप करून घेतले तो ही मला म्हणाला "साहेब छान काढलेयत तुम्ही फोटो ", त्यावेळी धंद्याचा भाग म्हणून बोलला असेल असं वाटून मी त्याचं बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. पण घरी आल्यावर पुन्हा फोटो पाहिले आणि त्याचं बोलणं खरं वाटायला लागलं. आणि मग मी उत्साहाने आणि उतावीळपणे (जो माझ्यात ओतप्रोत भरलेला आहे) याच्या मागे लागलो. .  एकदा एखादी गोष्ट मी मनावर घेतली की त्याच्या संबंधित लोकांना मी खूप पिडतो. त्यानुसार आता नंबर त्या स्टुडिओ वाल्याचा होता. मी एक दिवसाआड त्याच्याकडे जाऊन . स्थिर छायाचित्रणाची माहिती करून घेऊ लागलो. होता होता चर्चा कॅमेऱ्याकडे आली. माझ्याकडे अग्फाचा साधा कॅमेरा होता. या कॅमेऱ्याने व्यावसायिक छायाचित्रण करणं शक्यच नव्हतं. अगदी त्याचवेळी माझ्या ऑफिसमधल्या एका सहकाऱ्याचं लग्न ठरलं. मी सहजच त्याला लग्नाच्या फोटोंबद्दल विचारलं आणि गम्मत म्हणजे तो तयार झाला मला फोटो काढण्याचं कंत्राट देण्यासाठी. तो जमाना ब्लॅक अँड व्हाइट फोटोंचा होता. आता संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी अशी माझी अवस्था होती. त्यातच घरची मंडळी "बघ हं , जमणारय ना तुला नाहीतर मार खायची पाळी येईल" अशा शुभेच्छा देतच होती.( एका अर्थी बरोबरही होतं ते). पण मी मागे हटलो नाही. स्टुडीओवाल्याकडूनच मी रोलीकॉर्डचा सेकंडहॅंड कॅमेरा विकत घेतला , नवीन फ्लाॅशगन घेतली. काही दिवस अक्षरशः त्याचा जीव खाऊन फोटोग्राफीची मूलभूत माहिती जाणून घेतली आणि घरच्या ,मित्रांच्या शुभेच्छा कानाआड करून धडधडत्या छातीने मंगल कार्याचे फोटो टिपले. रिझल्ट्स फारच समाधानकारक होते. मग माझा उत्साह वाढला आणि म्हणतात तसं , त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही.  पुढे मी विविध समारंभाचे, वाढदिवसाचे फोटो काढले. यामध्ये अगदी लहान मुलांचे फोटो काढताना खूप थकायला व्हायचं , परंतू रिझल्ट्स पाहिल्यावर जो आनंद मिळायचा त्याला तोड नाही.  

आणि अचानक एकदा मला फोटोशूट साठी ठाणे जिल्ह्यातील तीन आदिवासी गावात जाण्याचा योग आला. ही साधारण १९८७-८८ सालातली गोष्ट आहे. चालतवाढ , बेरिस्ता आणि आणखी एक गाव होतं. आम्ही तीन दिवस या गावांत राहून या आदिवासींचं जीवन कॅमेऱ्यात पकडलं होतं. आपण एकविसाव्या शतकाकडे जाण्याच्या गोष्टी करतो आणि मुंबई पासून अक्षरशः दोन अडीचशे किलोमीटरवरील या आदिवासी गावात वर्षभर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. आदिवासी पाड्यांनी वसलेली ही गावं वर्षाचे सहा सात महिने सोडले तर पाण्यासाठी दूर दूर जाऊन मिळालेल्या घडाभर पाण्यात आपल्या लेकरांची तहान कशी भागवत असतील हा विचार कारणही फार कठीण होतं. या आदिवासींच्या मुलांसाठी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेने ही आदिवासी गावं दत्तक घेऊन प्रत्येक गावामध्ये एक वसतिगृह आणि शाळा चालवली होती. या मुलांना अक्षरशः पकडून आणि त्यांच्या आई बापाना खूप समजावून वसतिगृहात आणलं जायचं. थोडे दिवस गेले की गुपचूप काही मुलं पळून घरी जायची. काम न करता पोटाला घालणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. सगळं घर दिवसभर मोलमजुरी करणार तेव्हा रात्रीचे दोन घास (शब्दश:) साऱ्यांच्या पोटात जाणार ही वस्तुस्थिती होती. आम्ही या गावांतल्या वसतिगृहात राहून त्यांच्याबरोबर वावरलो , त्यांच्यात मिसळलो. आपल्याशी फार जवळीक साधत नाहीत ही माणसं. चेहेऱ्यावर एक संशयित भाव असतो त्यांच्या .  एका गावात आम्ही संपूर्ण शरीराच्या चामडीची जाळी झालेला जख्खड म्हातारा आदिवासी पहिला. वय किती असेल हे कळणं शक्यच नव्हतं. त्याच्याशी बोलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बाजूला तिरकमठा ठेवलेला होता. तो वासावरून काही फर्लांगावर हिंस्त्र जनावर आलंय हे सांगू शकत होता. तिरकमठयाने त्याने अनेक शिकारी केल्या होत्या.  

वसतगृहातील काही मुलं मात्र नेटाने शिकत होती. पाच सहा मुलं दहावी पास झाली होती. परंतू याचं पुनर्वसन होणं गरजेचं होतं. संस्था आपल्या परीने प्रयत्न करत होतीच तरीही व्हायला हवं त्या वेगाने हे काम होत नव्हतं. अर्थात चांगले कार्यकर्ते असले तरी पुरेशा आर्थिक मदतीशिवाय हे काहीच शक्य नसतं.

एका गावात आम्ही रात्री उशिरा पोहोचलो. आम्हाला वसतिगृहात नेण्यासाठी काही माणसं टॉर्च घेऊन आली होती. मुक्कामावर पोहोचल्यावर हात पाय धुवून चुलीच्या उबेत गरम भाकरी आणि भोपळ्याचं डांगर खाताना जो आनंद मिळाला त्याचं वर्णन करणं शक्य नाही. अनेकदा वसतिगृहाच्या आसपास वाघ येतात, कुत्रं बकरी उचलून घेऊन जातात. हे त्यांच्या विव्हाळण्यावरून समजतं . असं सांगितल्यावर आम्हाला रात्री काही गाढ झोप लागली नाही. सकाळीच लवकर आम्ही आमचं छायाचित्र घेण्याचं काम सुरू केलं. आदिवासींचं प्रसिद्ध तारपा नृत्य छायाचित्र घेण्यासाठी आमच्यासमोर करण्यात आलं. शब्द काही कळत नसले तरी गाण्यातली लय , वाजवणाऱ्याच्या गालासारखा तारपाचा कमी जास्त होणारा आवाज आणि त्या ठेक्यावर एकमेकांच्या कमरेत हात घालून पदन्यास करणारे आदिवासी पहाताना आपणही त्या नृत्यात गुंगून जातो. गावच्या सरपंचाशी गप्पा मारल्या. अत्यंत हलाखीत जगणाऱ्या या आदिवासींची घरं आणि घरापुढचे रस्ते मात्र अत्यंत स्वच्छ होते. कुठेही बकालपणा जाणवला नाही.  

काय त्या ईश्वराची करणी पाहा , पूर्णपणे निसर्ग सांनिध्यात रहाणाऱ्या या आदिवासी जीवनावर निसर्गाची जराही मेहेरनजर होत नव्हती.  

त्यांच्या नशिबी कायमचीच उपासमार राहणार का ? याचं उत्तर कोण देणार ?

आदिवासी पाड्यांना मागे टाकत आमची एस्टी परत शहराकडे धावत होती


Rate this content
Log in