सरमिसळ (भाग चौथा)
सरमिसळ (भाग चौथा)


नमस्कार मित्रहो! दि. १७ मे २०२०
सरमिसळ मालिकेच्या चौथ्या भागात वाचकहो आपलं स्वागत...
तुम्हाला सांगायचं म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्ये म्हणजे गेल्याच वर्षी मी अधिकृतपणे ज्येष्ठ नागरिक या श्रेणीमध्ये सामील झालो.
पण अगदी खरं सांगायचं तर खूप आधीपासूनच लोकांना मी या श्रेणीतलाच आहे असं वाटतंय. आता माझे केस लवकर चंदेरी (हो चंदेरीच! काय म्हणणं आहे तुमचं?) झालेयत हा काही माझा दोष आहे का सांगा मला? शोभतात एखाद्याला. त्यासाठी एखाद्याला ज्येष्ठ नागरिक (म्हणजे म्हातारा) म्हणून हिणवायचं? किती हा जळूपणा. मी साफ दुर्लक्ष करतो झालं. बसमधून प्रवास करतानाही अनेक वेळा माझ्या चेहऱ्याकडे पाहून कळवळून लोकं मला बसायला जागा द्यायचे. तुम्हाला सांगतो, मला त्या मिळालेल्या जागेपेक्षा लोकांच्या नजरेमध्ये दिसणारा माझ्याबद्दलचा कळवळा जास्त अस्वस्थ करायचा. मग मीही बसच्या ब्रेक्स आणि रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे तोल सांभाळणं कठीण होत असूनही दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला ती जागा उदारपणे बहाल करून मनात म्हणायचो, "शांत हो प्रसाद! शांत हो. तू अजून तरुण आहेस. S.C. श्रेणीत अजून तुझा प्रवेश झालेला नाही." आणि गंमत म्हणजे मला खूप शांत वाटू लागायचं. पण काही वेळा अक्षरशः संतापाची तिडीक जाते हो डोक्यात. आता का? तेच सांगतोय ना!
एकदा मी माझ्या मुलाबरोबर आमच्या समोरच असलेल्या स्टेशनरी दुकानात गेलो होतो. दुकानदार ओळखीचा आणि त्यातून मराठी. जाता जाता सांगतो, माझा कल नेहमीच कोणतीही वस्तू महाराष्ट्रीयन आणि त्यातून मराठी माणसांकडून विकत घेण्याकडे असतो. आम्ही दुकानात गेलो. मुलाने त्याला जे हवं होतं ते घेतलं आणि बोटाने दुकानातील अजून काहीतरी दर्शवून तो मला घ्यायला सांगत होता. आता यावर त्या दुकानदाराला मध्ये बोलण्याची काही गरज नव्हती. पण तरीही आपल्या मराठी बाण्याला स्मरून तो पाजी दुकानदार खिदळत माझ्या मुलाला म्हणतो कसा, "वा वा! मज्जा आहे बाबा, आजोबांकडून पाहिजे ते मिळतंय अगदी..." दोन क्षण आम्ही दोघेही अक्षरशः अवाक आणि हतबुद्ध का काय होतात ना तसे झालो. आणि तिसऱ्याच क्षणाला माझा मुलगा महत्प्रयासाने हसू दाबत आणि मी दात-ओठ खात मनातल्या मनात त्या दुकानदाराला पायाखाली दाबत तिरमिरीने निघालो. आता दुकानदाराच्या या कृत्याचा माझ्या मुलाला राग येणं अपेक्षित होतं की नाही. पण तसं न घडता त्याने घरात शिरल्याबरोबर भरभरून येणारं हसू दाबत माझ्या बायकोला आणि त्याच्या ताईला सगळं इत्थंभुत वर्णन करून सांगितलं. आणि यावर तिघंही मनमुराद हसत होते. जात नाही त्या दिवसापासून मी त्या दुकानात. आणि गैरसमजुतीने का असेना माझ्या केलेल्या अपमानाची शिक्षा त्याला मिळालीच. काही दिवसांनी बंद झालं त्याचं दुकान. शेवटी सत्याचाच विजय होतो हेच खरं.
जाता जाता मनात एक विचार येतो, आमच्या लहानपणी आमच्या वडिलांबरोबर इतकं मोकळं वागणं मनात असूनही कधीच जमलं नाही. आजची पिढी खरंच नशिबवान. पण तरीही एक विचार मनात डोकावतो की, ती शिस्त चांगली होती की आज आम्ही मुलांना मित्रासारखं वागवतोय ते बरोबर आहे? असो...
लवकरच भेटू सरमिसळ मालिकेच्या पुढच्या भागात काही नवीन किश्श्यांसह.
तोवर सध्या तरी घरीच राहा, काळजी घ्या आणि आपला जीव वाचवा.
आणि हो! प्रतिक्रिया (चांगल्या-वाईट) पाठवायला विसरू नका. कारण त्यातूनच सरमिसळ अजून चविष्ट होईल.