End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Prasad Kulkarni

Comedy


3  

Prasad Kulkarni

Comedy


सरमिसळ भाग १

सरमिसळ भाग १

2 mins 323 2 mins 323

भाग १

मी " सरमिसळ " ही विनोदी लेखमालिका सुरू करत आहे.  

मी प्रसाद कुळकर्णी !. तसं नावात काय आहे म्हणा. जरा ठासून सांगितलं तर समोरच्यावर परिणाम होईल असं आपलं मला वाटतं इतकंच. तसं होत नाही हा भाग वेगळा. आपलं व्यक्तिमत्त्व (personality म्हणतात त्याला) ते काय आणि त्याचा परिणाम तरी समोरच्यावर किती होणार नाही का ? असो!  तर सांगत काय होतो , हं ! ते नावाचं जाऊदे. 

मी ना रोज सकाळी चालायला जातो. म्हणजे मला रोज जायचं नसतं . पण बायको खूप मागे लागली की नियमितपणे तिच्या मागून जातो बापडा. हल्ली या क्रियेला वॉक घेणं असं म्हणतात. अहो , काय सांगू ,त्या वॉक ट्रॅक च्या समोरच एका शाळेचं उपहारगृह आहे. तिथून गरमागरम बटाटेवड्यांचा खमंग वास येत असतो. काय कप्पाळ वॉक करणार सांगा ना ?. तरी मन मारून चालत राहतो आपला. तिथे ना वॉक घेणाऱ्यांचे विविध नमुने पाहायला मिळतात. गम्मत म्हणजे उत्स्फूर्तपणे आलेले आणि माझ्यासारखे कुणीतरी जबरदस्तीने आणलेले लगेच ओळखू येतात. त्यांच्या चेहऱ्यावर आल्यापासूनच झोपमोड झाल्याचा त्रस्त ,चिडका आणि कंटाळवाणा भाव दाटून आलेला असतो. ते फार फार तर दोन किंवा तीन फेऱ्या मारून संपूर्ण ट्रक नजरेखाली येईल असा बाक निवडतात आणि स्थानापन्न होतात. मग त्यांची फक्त नजर गोल गोल फिरत असते. बरं ते एकटेच आले असल्यामुळे त्यांना टोकायला कुणीच नसतं हे त्यांचं भाग्य. आमची बायको पुढे गेली तरी आमच्यावर नजर ठेवून असते. असो ! एकदा माझ्या उलट्या दिशेने येणाऱ्या एका वॉक्याने लांबून हात उंचावला. मला वाटलं ओळखीचा असेल कुणीतरी , म्हणून मी ही हसून हात उंचावून हलवला. जवळ आल्यावर कळलं ती वॉकी होती . सगळेच ट्रक सुट मध्ये.  माझ्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत ती पुढे निघून गेली. मग माझ्या लक्षात आलं ती वॉक घेतानाच हाताचा व्यायाम करत होती. नशीब बायको बरोबर नव्हती .  

हल्ली ना मला रात्रीची झोपच येत नाही. आणि हे मी काळजीयुक्त स्वरात बायकोला लगेच सांगितलं , तर ती ही लगेच म्हणाली "आता तुझं वय झालंय. कमीच होणार झोप. उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नकोस". फक्त दोन वाक्यात माझ्या झोपेचा मुद्दा निकालात काढला. नुकतीच माझी साठी झाल्यापासून तिने हा वय झाल्याचा मुद्दा उचलून धरायला सुरुवात केलीय. आता मी कविता वगैरे करत असतो. पण तुम्हाला सांगतो पिकतं तिथे विकत नाही म्हणतात ना ते अगदी खरंय. माझा मुलगा माझी कवितेची वही उघडी दिसली रे दिसली की माझ्या वाऱ्यालाही उभा रहात नाही. त्यामुळे वाचून दाखवायला हक्काची बायकोच मिळते. मी वही घेऊन तिच्या शेजारी येऊन बसलो की ती सावध होते आणि जे काही करत असेल त्यामध्ये अगदी मग्न असल्याचं दाखवून देते. तरीही मी नर्व्हस न होता तिला म्हणतो  "अगं ऐक ना ही कविता". त्यावर ती फक्त 'हं ' एवढंच प्रत्युत्तर देते. म्हणजे त्या हं चा अर्थ असतो वाच एकदा आणि टळ इकडून. माझी मुलगी मात्र व्यवस्थित ऐकुन घेते. आणि लक्षपूर्वक ऐकलंय हे दर्शवण्यासाठी काही सुधारणाही सांगते. (तिचा पेशन्स चांगलाच आहे)

 मला आपलं बरं वाटतं घरातल्या कुणीतरी माझी कविता ऐकल्याचं. सध्या ती ऑस्ट्रेलियाला आहे...... नाही ! नाही ! यात माझ्या कवितांचा काही संबंध नाही. ऑफिसच्या कामासाठी वर्षभर गेलीय. असो !

भेटूया पुढच्या सरमिसळीसह लवकरच.....

सुरवात कशी वाटली जमल्यास कळवा.


Rate this content
Log in

More marathi story from Prasad Kulkarni

Similar marathi story from Comedy