Prasad Kulkarni

Others

2  

Prasad Kulkarni

Others

सरमिसळ भाग ३

सरमिसळ भाग ३

2 mins
252



नमस्कार मित्रहो !                 दि. ९ मे २०२०

सरमिसळ मालिकेच्या तिसऱ्या भागात वाचकहो आपलं स्वागत. 🙏


व्हॉट्सअँप वर शुभेच्छा देण्याची एक गंमतच असते. कसल्याही शुभेच्छा देतात. वटपौर्णिमेच्या , संक्रांतीच्या . एकदा तर एका गृहस्थाने शुभ पितृपक्ष असं, कावळा पानाला चोच लावतोय अशा चित्राखाली लिहून व्हॉट्स ऍप वर पाठवलं होतं. हिंदी , इंग्रजी , मराठी अशा विविध भाषांत लोकं व्हॉट्स ऍप वर तात्विक चर्चा करत असतात. काही महाभाग तर त्यांनी केलेल्या wish ला तुम्ही उत्तर दिलं नाही तर खूप अपसेट होतात , आणि इथेच हे प्रकरण न संपवता जेव्हा कधी ती व्यक्ती भेटेल तेव्हा "काय रे ! 😠 त्या दिवशी पाठवलेल्या माझ्या good morning पोस्टला तू काहीच प्रतिसाद दिला नाहीस" ?. असं ठणकावून विचारतात.


भाषेवरून आठवलं हिंदी बोलताना आपण मुंबईकर अक्षरशः त्या भाषेचा खून करत असतो. समोरच्याला समजण्याइतपत आपण हिंदीचा वापर करतो. मेरेको तेरेको किंवा वयाचा विचार न करता तुमको वगैरे म्हणत बिनधास्त हिंदी फाडत असतो. आणि बोलताना हिंदी शब्द नाही आठवला की तिथे सरळ मराठी शब्द घुसडून वाक्य पूर्ण करतो. माझी आई तर अगम्य हिंदी बोलायची. भाजीवाला किंवा केळीवाला भैयाला भाव विचारायची आणि तो जो भाव सांगेल त्यावर ती पुढे हात करून " ए" एवढंच म्हणायची. म्हणजे त्या ए चा अर्थ एवढा भाव ? काय सांगतोस ? बापरे ? किती महाग ? असा भैय्याने काही समजावा. पण गम्मत म्हणजे ते भय्ये तिच्याशी व्यवस्थित संवाद साधायचे. 


हे झालं हिंदी भाषेचं. दुसरा किस्सा सांगतो .  खूप जुनी गोष्ट आहे. एकदा आम्ही सगळे कुटुंबीय गोव्याला गेलो होतो. मंगेशी हे माझ्या आईच्या माहेरचं कुलदैवत. तिथे गेल्यावर देवकार्य करण्यासाठी तिथल्या अभिषेकी आडनावाच्या गुरुजींना भेटलो. अभिषेक करण्याबाबत बोलणं चाललं होतं. इतक्यात माझी आई मध्येच त्यांना विचारती झाली ,

" आपलं नाव काय" ?

ते म्हणाले , "अभिषेकी ".

पुन्हा काही बोलणं सुरू झालं असताना आईने परत एकदा विचारलं .

" नाव काय आपलं "?

ते अर्थातच म्हणाले "अभिषेकी "

आम्हालाही काहीच कळत नव्हतं आईने काय चालवलय.🤔

थोड्या वेळाने आईने तिसऱ्यांदा त्यांना विचारलं ,

"नाव काय गुरुजी आपलं" ?

गुरुजींनी सगळ्या अक्षरांवर जोर देत म्हट्लं ,

"अ भि षे की ".

म्हणजे गंमत आणि कन्फ्युजन झालं होतं ते अभिषेक आणि अभिषेकी मध्ये .😆 असो !

आईचा विषय आला की तिच्याशी असलेली माझी प्रचंड जवळीक हसता हसता डोळ्यात कधी दाटून येते समजतही नाही.😢


Rate this content
Log in