सरमिसळ दुसरी
सरमिसळ दुसरी


माझा एक मित्र आहे. तो ना लाईटली काहीच घेत नाही आणि कुणालाच घेत नाही. कुणी कुणाची टिंगल केली, कुणाला लागेल असं बोललं किंवा अगदी व्हॉट्सऍपवर कुणी काही वेडीवाकडी पोस्ट टाकली की तो त्याची ..........काढतो. त्याचा उद्देश चांगलाच असतो पण याचा त्रास मला होतो. आता कसं? तर हे घडलेलं सगळं तो तावातावाने मला सांगतो, तेव्हा त्याला समाधान वाटतं. अरे पण माझं काय? त्याचा फोन आला ना की मी घड्याळात पाहून घ्यायचा की नाही ते ठरवतो. सांगू का, साधारण एक ते दीड तास मोकळा ठेवावा लागतो. बरं, इथेच सगळं संपत नाही. तो बोलत असताना हं हं असं त्याला ऐकू जाईल इतपत आवाजात हुंकार देत राहावं लागतं. बोलताना जर त्याला हुंकार ऐकू आला नाही तर तो लगेच म्हणतो, "तू ऐकतोयस ना? की मी नंतर फोन करू"? बरं एखादा विषय निघाला की तो त्या विषयात आत घुसतो. अनेक उदाहरणं देऊन तो विषय फुलवणं आणि समोरच्याचा पेशन्सची कसोटी पाहणं त्याला फार आवडतं. अर्थात हे सगळं तो मुद्दाम करत नाही. अनेकदा तोच तोच विषय पुन्हा उगाळला जातो आणि सगळं परत एकदा ऐकावं लागतं. बरं! चल ठेवतो फोन, असं म्हणायला तो बारीकशी फटही ठेवत नाही. दीड एक तास फक्त हं हं !
पण काही वेळा विचार केल्यावर वाटतं की हा मला हे सगळं सांगतो. काय होणार असतं मला सांगून? परंतु कुणाला तरी आपल्याशी बोलल्यावर बरं वाटतं ही जाणीव मनाला आनंद देऊन जाते.
फोनवरून आठवलं, लोकं कशी बोलतात ना? माझ्या ओळखीचे एक गृहस्थ त्यांना फोन केल्यावर मोठ्ठ्याने "हॅलो ! कोण बोलतंय" असं तारस्वरात ओरडतात. किंवा आताच उल्लेखलेला माझा मित्रही फोन उचलून मोठ्ठ्याने "हा बोल प्रसाद" असं म्हणतो. माझे एक व्हॉट्सअप मित्र भेटले असताना मला म्हणाले "मी करावकेवर हिंदी गाणी म्हणतो. त्याबरोबर त्यांच्यासोबतचे दुसरे स्नेही चटकन म्हणाले, "हाे! फार छान आवाज आहे यांचा". आता आजकाल हा किंवा ही फार छान गातात हे कौतुक कुणी फारसं सीरियसली घेत नाही हा भाग वेगळा. पण का कुणास ठाऊक त्यांच्या आवाजातील खंबीरपणा माझ्या मनाला भिडला आणि विनाशकाले विपरीत बुद्धी झाल्यासारखा मी म्हणून गेलो "मग ऐकवा की मलाही". यावर आनंदाने उचंबळून ते लगेच म्हणाले "पाठवतो ऑडियो व्हॉट्सऍपवर".
मी पुढे निघालो आणि रस्त्यातच मोबाईल गुळुप गुळुप असा सारखा वाजत होता. घरी येऊन पहातो तर सात आठ ऑडियो ऐकवायला तयार होते. मी कपडेही न बदलता पहिला ऑडियो लावला... आणि आणि अहो काय सांगू, बाकीचे सगळे डिलीट केले. आता अगदीच वाईट वाटायला नको म्हणून लाईकचा आंगठा पाठवला आणि संपवलं प्रकरण. शांतपणे कपडे बदलून आलो तर पुढचे पाच सहा मेसेज माझी वाट पहात होते.
आवडलं ना ?
Thanks !
त्यावेळी जरा खोकला झाला होता म्हणून...
नुसतं लाईक करू नका, तुमची प्रतिक्रिया सुद्धा द्या. म्हणजे माझा उत्साह वाढेल.
"आणि आमचं काय होईल" ? अर्थात हे मी मनातच म्हट्लं. काय बोलणार सांगा ना यावर ?
पण हे प्रकरण आता थांबणार नव्हतं. ते रोज एक दोन ऑडियो मला पाठवू लागले. हळूहळू मी ही दुर्लक्ष करायला सुरवात केली. शेवटी कंटाळून त्यांनीही माझा नाद सोडला.
त्यांच्या आवाजाचं गुणगान करणाऱ्या त्या मित्राने असा डाव साधून वचपा काढला होता तर. असो !