अघोरी
अघोरी
गणपतीपुळेपासून तीन साडेतीन तासांच्या अंतरावर असमोंडी गाव. गावात ब्राम्हणांची पंचवीसेक घरं. बाकी इतर लहान मोठी घरं मिळून चाळीस पन्नास उंबाऱ्यांचं गाव असमोंडी. ब्राम्हणांचं मूळ उत्पन्न आंब्याचं. प्रत्येकाच्या लहान मोठ्या आमराया. गावाला पाण्याचं दुर्भिक्ष्य नव्हतं. शेती भाती करून गावातल्या लोकांना स्वत:पुरतं अन्न मिळत होतं. मग कुणाची नारळाची झाडं, पोफळीची झाडं. मुद्दा काय तर दोन वेळच्या पेजेची आणि डाळ भाताची सोय होईल एव्हढं गावात पिकत होतं.
गावात असलेल्या छोट्यामोठ्या आमरायांमध्ये दोन आमराया मात्र आंब्याच्या झाडांनी भरलेल्या होत्या. त्यातली एक होती यशवंत गिरकर म्हणजेच येशा गिरकराची आणि दुसरी त्याचाच चुलत भाऊ शकुनी गिरकर म्हणजे शक्या गिरकराची. दोघांचाही पिढीजात आंब्यांचा व्यवसाय. शहरात दोघांच्या आंब्याला प्रचंड मागणी असायची. आजवर या आंब्याच्या धंद्यातून दोघांनीही बक्कळ पैसा कमावला होता. येश्या आणि शक्या दोघांचीही गावात टुमदार घरं उभी होती. गिरकर घराण्यात प्रत्येक पिढीत आजवर एकच वंश जन्मला होता. येश्या गिरकराची आई वच्छीची मनापासून इच्छा होती की आपल्याला दुसरा पणतू व्हावा. ती रवळनाथासमोर नाक घासून त्याला विनवायची "देवा महाराजा माझ्या नातवाला अजून एक मूल होऊ दे. दर सोमवारी तुझ्यासमोर तुपाचा दिवा लावीन."
आणि इतक्या वर्षांनी आक्रित घडलं. वच्छीची प्रार्थना रवळनाथाने ऐकली. वच्छीची नातसून पुन्हा एकदा पोटुशी राहिली. वच्छीच्या आनंदाला उधाण आलं. पुढे यथास्थित नऊ महिने सरून यशवंताच्या घरात दुसरा नातू जन्माला आला आणि वच्छी आनंदाने ओरडली "मोनोली मोडली गे बाय" . "रवळनाथा तुझीच कृपा रे महाराजा." यशवंताच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं. पण ही बातमी ऐकून शकुनीचा मात्र प्रचंड जळफळाट झाला. एकतर गेली काही वर्ष शकुनीच्या आमरायांत म्हणावं असं फळ धरत नव्हतं. चुलत भाऊ असूनही दोघांच्या मधून विस्तव जात नव्हता.
बारीकसारीक कारणांनी एकमेकांना शिवीगाळी नित्याचीच. एकामेकांवर टाकलेले कितीतरी कज्जे डिस्ट्रिक्ट कोर्टात कित्येक वर्ष सुरू होते. यशवंताची आमराई मोसमात फळांनी अगदी भरून जायची. शकूनीला ही खदखद होतीच. त्यात भर म्हणून येशाच्या घरात दुसरा पोर जन्माला आला आणि शकूनीच्या सर्वांगाची आग आग झाली. त्याच्या मनात येशाचं तळपट करण्याचे विचार येऊ लागले. आणि राग असह्य होऊन तो तरातरा यशवंताच्या घरासमोर येऊन त्याला अद्वातद्वा बोलू लागला. त्याच्या रागाचा पारा अगदी टोकाला गेला होता. यशवंता काही त्याला घाबरणारा नव्हता. तो बाहेर येऊन म्हणाला "जा जा ! काय करायचं ते कर. मी घाबरत नाही तुला." पण वच्छी मात्र मनातून घाबरून गेली. तिने ओढतच यशवंताला घरात नेला आणि दार बंद करून घेतलं. बराच वेळ शिव्याशाप ओकून शकुनी निघून गेला. सुडाच्या भावनेने तो पेटून उठला होता. आणि त्याने आजूबाजूच्या गावात मांत्रिकाचा शोध सुरू केला. एक दोघं मिळाले पण शक्याला हव्या असलेल्या कामासाठी त्यांनी असमर्थता दाखवली. अखेर शकुनीला एका गावात अबीद म्हणून कुणी जबरदस्त मांत्रिक असल्याची माहिती मिळाली. शकुनी आता अगदी घायकुतीला आला होता. कधी एकदा या येशाला आयुष्यातून उठवतो असं त्याला झालं होतं. त्याने
अबीदला स्पष्टच विचारलं, "या माणसाला आयुष्यातून उठवायचाय, जमणार तुला?"
"लागेल तितका पैसा घे पण हा मोडून पडला पाहिजे".
अबीद म्हणाला "काम होईल मालकानू पण मला अशी एखादी वस्तू लागेल जिचा त्याच्या रक्ताशी, विष्ठेशी, लघाविशी किंवा त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी संपर्क झालेला असेल. आता हे काम जोखमीचं होतं. अबीदने गावातच राहून यशवंतवर पाळत ठेवायला सुरवात केली. आणि काही दिवसातच त्याला तशी संधी मिळाली. त्या दिवशी यशवंत सकाळीच बाजूच्या गावात काही कामासाठी गेला होता. परत फिरेपर्यांत संध्याकाळ होऊन गेली होती. यशवंत भराभरा पाय उचलत होता. त्याला कडकडून लघवी लागली होती. चालणं अगदीच अशक्य झालं तशी जरा आडोसा पाहून त्याने कार्यभाग उरकला आणि मोकळ्या मनाने तो पुढे निघाला. अबीद त्याच्या पाळतीवर होताच. यशवंत दिसेनासा झाल्यावर त्याने ती लघवीमिश्रीत माती अलगद एका कागदात जमा केली आणि दबक्या पावलांनी तो निघून गेला.
काही दिवसातच यशवंताला बारीक बारीक ताप येऊ लागला.&n
bsp;डोक्यात कुणी घण घालतंय असं डोकं दुखू लागलं. तहान भूक लागेनाशी झाली , अशक्तपणा जाणवू लागला . गावातल्या डॉक्टरनी आपल्या परीने उपचार केले पण गुण चार आणे पण येईना. येशा घरात बसल्यामुळे त्याची सगळी कामं , व्यवहार थंडावले. उठून बसण्याची ताकदच राहिली नव्हती त्यामुळे कशातच लक्ष घालण्याची त्याला इच्छा होईना. त्याची बायको मुलं घाबरून गेली. आताच घरात नातू जन्माला आला म्हणून आनंदात असलेलं घर चिंतेने सुकून गेलं. काही दिवसातच येशाच्या शरीराची हाडं दिसू लागली. धिप्पाड तगडा गडी हडकुन गेला. गालफडं बसून हाडाचा सापळा झाला. आता मात्र सगळेच घाबरले. कुणी म्हणालं बाहेरचं काही असेल म्हणून गावातल्या मांत्रिकाला बोलावून आंगारे धुपारे करून झाले ,पण फरक काही पडेना. येशाच्या बायकोच्या डोळ्याचं पाणी खळेना. तिचा एक भाऊ मुंबईत कामाला होता. त्याला पत्र पाठवून सल्ला घेतला. आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे येशाचा थोरला पोरगा आणि बायको त्याला घेऊन मुंबईत आले. मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलात येशाला महिनाभर दाखल करून सगळे रिपोर्ट्स काढले , तपासण्या झाल्या. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते पण वजन मात्र झपाट्याने कमी होत चाललं होतं आणि हॉस्पिटलचं बिल मात्र भरमसाठ वाढत होतं. अखेर निरुपायाने यशवंताला घेऊन सगळे पुन्हा गावी परतले.
शेवटी वच्छी येशाच्या थोरल्या मुलाला म्हणाली "वामन्या मला हे खात्रीने बाहेरचच आहे असं वाटतंय. तू लवकर चांगलासा देवऋषि बघ. नायतर माझा पोर हकनाक जाईल. म्हातारीच्या सांगण्यानुसार येशाच्या पोराने आजूबाजूच्या गावातले बरेच मांत्रिक बोलावले. प्रत्येकजण आल्यावर म्हणायचा "करणी तर झालीय पण करणारा कोणीतरी जबरदस्त माणूस आहे. त्यामुळे हे काम आमच्या ताकदीपलीकडचं आहे. दिवसेंदिवस येशा मरणपंथाला लागल्यासारखा दिसत होता. आणि एक दिवस वामन्याला गावावाल्याकडून एका माणसाचा पत्ता मिळाला. गाणगापुरला असणारा हा एक योगी होता. तप साधना करून त्याने अशा वाईट गोष्टींना नष्ट करण्याची शक्ती प्राप्त केली होती. वामन्याने खूप विनंती करून त्याला आपल्याबरोबरच गावात आणला.
घरात शिरताच योग्याला जाणवलं कुणीतरी जबरदस्त मूठ मारलीय. तो म्हणाला, "मूठ मारणाऱ्याची एकच इच्छा आहे की याने खंगून खंगून मरावं. हे मी थांबवीन. आणि ज्याने हे केलंय त्याची ही संपूर्ण शक्तीच काढून घेईन. मला याचा त्रास होईल कारण यासाठी माझी आजवरची तपश्चर्या मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे आणि त्यासाठी मला पुन्हा तप करावं लागेल."
"माझी अपेक्षा काहीच नाही , फक्त होम हवन करण्यासाठी जो खर्च होईल तेव्हढा करा."
हे ऐकून वच्छीला आनंद झाला. म्हणाली "बाबा रे तू म्हणशील ते करू आम्ही. पण माझा लेक उठून बसला पाहिजे. दुसऱ्याच दिवशी योग्याने होमाची सिद्धता केली. दुपारपर्यंत होम हवन करून त्याने आपली संपूर्ण तपश्चर्या वापरून मृतत्म्यांचा राजा वेताळाला आवाहन केलं. आणि त्याला ही करणी पूर्णपणे नष्ट करून ज्याने हे केलंय त्याची सगळी शक्ती काढून घ्यायला सांगितलं. आणि पुढे आज्ञा केली हे काम झाल्याचा पुरावा मला दाखव. काही वेळ गेला आणि होमाच्या जवळच एक कागदाची पुडी येऊन पडली. ती उघडताच त्यामध्ये कमळाची पानं, काळी बाहुली, टाचणी लावलेलं लिंबू आणि माती होती. योग्याने मंत्रोच्चार करत पुडीतला सगळा ऐवज जाळून नष्ट केला. आणि वच्छीला म्हणाला आता तुमचं अरिष्ट टाळलं. होम संपन्न झाला.
अगदी त्याचवेळी अबीदची सगळी काळी शक्ती पूर्णपणे नष्ट झाली होती. आयुष्याच्या अखेरच्या दिवसात दारोदार भिक मागून, गाववाल्यांचे शिव्याशाप खाऊन जगण्याची आणि अखेर भुकेने तडफडून तडफडून मरण्याची पाळी त्याच्यावर आली. काही दिवसातच यशवंता उठून बसू लागला, हळूहळू हिंडु फिरूही लागला आणि त्यानंतर आणखी वीस वर्षे जगून म्हातारा होऊन मरण पावला.
योगी मात्र हे सगळं निस्तरून फार वर्ष जगला नाही आणि ज्याने हे करायला लावलं तो शकुनी मात्र वेडा होऊन गावभर फिरू लागला. अखेरपर्यंत तो गावभर कपड्यांचीही शुद्ध नसलेल्या अवस्थेत फिरत असायचा. पोरं त्याच्यामागे दगड घेऊन लागायची. सारखं एकच म्हणायचा, "मी केलं मी केलं ! आता तो उठणार नाही".
लोक विचारायचे 'काय केलंस तू?'. ते मात्र त्याला सांगता यायचं नाही.
एका अघोरी सुडापायी किती आयुष्य होरपळून निघाली.