Prasad Kulkarni

Others

2  

Prasad Kulkarni

Others

माय मराठीशी माझे नाते

माय मराठीशी माझे नाते

3 mins
227


माझं मराठीशी नातं जन्मापासून असलं तरी नक्की जुळलं कधी ते मलाही कळलं नाही. माय मराठीच्या नात्यामध्ये मी अलवार बांधला गेलो आणि पूर्णपणे तिच्याशी एकरूप झालो. अर्थात हे सगळं जाणून घेण्यासाठी बरचसं मागे जावं लागेल. म्हणजे साधारण १९७० चं दशक होतं ते. त्यावेळी आम्ही मुंबईच्या दादर या मध्यवर्ती भागात रहात होतो. माझ्या वडिलांना साहित्य, शास्त्रीय- सुगम संगीत, नाटक या गोष्टींची फार आवड होती. वाचनाकडे त्यांचा खूपच ओढा होता. आमच्या लहानशा घरात असलेल्या एका लाकडी कपाटात त्यावेळी तीन-चारशे पुस्तकं होती. यामध्ये अध्यात्म, साहित्य, चरित्र, आत्मचरित्र, कादंबऱ्या अशा विविध साहित्य प्रकारातील मराठी पुस्तकांचा संग्रह होता. माझ्या वडिलांचा व्यासंग अफाट होता. त्यांच्याकडे इंग्रजी भाषेतलीही उत्कृष्ट पुस्तके होती. माझे वडील नेहमी म्हणायचे' इंग्रजी भाषा मला आवडते परंतु मराठी भाषेवर माझं प्रेम आहे'. त्यावेळी मला मात्र फँटम, जादूगार मॅंड्रेक यांच्या इंद्रजाल कॉमिक्सनी भुरळ घातली होती. दर महिन्याच्या ठराविक तारखेला मी अगदी आतुरतेने वडील ऑफिसमधून येण्याची वाट पहात बसायचो. वडिलांनीही माझ्या या वाचनाला कधीच हरकत घेतली नाही. मी काही वाचतोय याचा आनंद त्यांना अधिक होता. परंतु त्याच्याच जोडीने ते मला सोप्या शब्दरचनेची छोट्या छोट्या गोष्टींची मराठी पुस्तकंही आणून द्यायचे. त्यांच्या कपाटातील एका कोपऱ्यात त्यांनी माझ्या पुस्तकांसाठी मला जागा करून दिली होती.  मला कळलंही नाही मी कॉमिक्सच्या तावडीतून अलगद निसटून या वाड्मयाकडे कधी आकर्षित झालो ते. त्या पक्षी-प्राण्यांच्या, राजाराणीच्या, महाभारत-रामायणातील चित्रकथांच्या पुस्तकांनी माझं लहानसं साहित्यिक वाचन विश्व भारून गेलं. माझ्या वडिलांचा पुस्तकांचा व्यासंगही हळूहळू विस्तारत होता. 


तसं पाहिलं तर वाचनाची आवड आमच्या घरात सगळ्यांनाच होती. कित्येकदा आमच्याकडे सामूहिक साहित्य श्रवणाचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे माझी थोरली बहीण किंवा भाऊ वाचायचे आणि आम्ही ऐकायचो. खूप मज्जा यायची. हळूहळू मी याकडे ओढला जाऊ लागलो आणि मलाही वाचायचंय म्हणून हट्ट करू लागलो. हे काहीतरी वेगळं विश्व आहे याची जाणीव होऊन माझ्या वाचन कक्षा रुंदावायला लागल्या होत्या. Ifआतापर्यंत वडिलांचा पुस्तक संग्रह जवळजवळ दीड हजार पुस्तकांचा झाला होता. ही सारी पुस्तकं मला सतत खुणावत होती. आणि मी माय मराठी साहित्याशी पहिला हात मिळवला तो महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्या पुस्तकांनी. पु.लं‌च्या साहित्याने मी अक्षरशः वेडा झालो. काय नव्हतं त्या साहित्यात? उत्स्फूर्त निखळ आनंद देणारा विनोद , वाचताना अचानक स्पर्शून जाणारी नाती , रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक गोष्टी . आयुष्यात प्रत्येक गोष्टींकडे वाकड्या नजरेने न पहाता त्यामधील आनंद शोधावा आणि त्या नजरेने पहावं हे मला पु.लं‌च्या साहित्याने शिकवलं. वाचताना खुदकन हसू येणं किंवा ते वाचलेलं जेव्हा पुन्हा आठवेल तेव्हा तेव्हा चेहऱ्यावर हसू फुटणं म्हणजे काय असतं हे पु.लं‌च्या साहित्यातून मी जाणलं. पुढे अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांनी भुरळ घातली , खूप काही नवीन मिळून जाणिवा रुंदावल्या , विचारशक्ती वाढली पण पु.लं‌च्या साहित्याचं मनावरचं गारूड काही ओसरलं नाही.

  

१९७८ साली कॉलेज संपून माझी एका विदेशी बँकेतली नोकरी नुकतीच सुरू झाली होती. त्याचं काळात हौंशी नाट्यसंस्थेच्या माध्यमातून तीन अंकी नाटक , एकांकिका , अशा अनेक आवडीच्या गोष्टींमध्ये भाग घेऊन मनसोक्त खाज भागवून घेतली. हळुहळु लिखाणात हात घालावा असं मनापासून वाटू लागलं. छोटीशी नाटुकली, आमच्या कार्यक्रमाचं निवेदन अशा छोट्या छोट्या गोष्टीतून माझं लिखाण सुरू झालं. आम्ही बसवलेल्या मराठी वाद्यवृंदातील गीतांची पार्श्वभूमी त्यावेळी गुगलची मदत नसतानाही वाचनातून मिळतं गेली. मी लिहायला सुरवात केली याचा वडिलांना मनापासून आनंद झाला. आपण सजवलेली माय मराठीची पालखी आपला मुलगा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय हा आनंद त्यांच्यासाठी मोठा होता. लहानपणापासून वडिलांनी कधीही जबरदस्ती न करता दिलेल्या प्रोत्साहनातून वाचनाची जी गोडी लागली त्यामुळे माय मराठीची थोरवी समजली. पुढे दिवाळी अंकांमधुनही मी काही व्यक्तिचित्र लिहिली. मी लिहिलेलं कुठे छापून आल्यावर ते वडिलांना वाचून दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात असे. 

 

पुढे माझे वडील वारले पण माझं मराठी भाषेशी घट्ट नातं जुळवून गेले. आज कविता लेखन, वाचन, विविध संकेतस्थळावरील अनेकविध विषयांवरील लिखाण, मराठी संगीत कार्यक्रमाचं संहितालेखन, सुसंवादन अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर माय मराठीच्या अंगाखांद्यावर मनापासून बागडताना जुळलेल्या अतूट नात्यामुळे खूप आनंद मिळतो. जीवन सफल झाल्याचं मनोमन जाणवतं. माय मराठीच्या लिखाणातून मिळणाऱ्या सन्मानचिन्हाकडे अभिमानाने पहाताना मन भरून येतं आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात

    परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी

    माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका

    भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे

    गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापू नका


Rate this content
Log in