Prasad Kulkarni

Horror

4.5  

Prasad Kulkarni

Horror

सोमदा

सोमदा

3 mins
537


मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या आमच्या हेड ऑफिसची इमारत ब्रिटिशकालीन होती. बांधकाम अत्यंत मजबूत आणि प्रशस्त होतं. दिवसभर असणारी वर्दळ सायंकाळी शांत होत असे. ऑफिस स्टाफ जसजसा दिवसभराचं काम आटोपून घरी परतायला निघत असे तसंतसा एकेक विभाग शांत होत असे. सगळे गेल्यावर त्या विभागातले लाइट्सही ऑफ केले जायचे. संध्याकाळी सात नंतर फक्त उशीरा कामासाठी बसलेले कर्मचारी किंवा अधिकारी सोडले तर बाकी पूर्ण ऑफिस निर्मनुष्य होऊन जायचं. दिवसभर ऑफिसमध्ये कुठेही बिनधास्त जाणाऱ्या कुणालाही सायंकाळी ते शांत स्तब्ध आणि एक भयाण शांतता घेऊन उभं असलेलं जाणवायचं. आमच्या ऑफिस संदर्भात अनेक दंतकथा प्रचलित होत्या. पूर्वी बरेचसे अधिकारी हे ब्रिटिश होते. तेव्हापासून कुणी म्हणायचं अमावस्येला रात्री उशिरा ऑर्गन वाजल्याचा आवाज येतो , कुणी म्हणायचं कॅश विभागात नाणी मोजल्याचा आवाज येतो किंवा जिन्यावरून चढत जाणाऱ्या बुटांचा आवाज येतो. 

सोमदा हा सुद्धा एका विभागाचा अधिकारी (ऑफिसर) होता. कलकत्त्याहून तो बदली होऊन मुंबईत आला होता. ऑफिसमध्ये सगळे त्याला सोमदाच म्हणायचे. त्याचं कुटुंब मात्र तिकडेच होतं. अधूनमधून तो जायचा त्यांना भेटायला. तशी त्याची मुलंही मोठी होती. मला वाटतं मी त्याला प्रथम पाहिलं तेव्हाच तो पंचावन्न वर्षांचा तरी असावा. त्याच्या दोन गोष्टी आवडीच्या होत्या , एक म्हणजे ड्रिंक आणि दुसरं ऑफिसचं काम. तो संध्याकाळी उशिरापर्यंत काम करत बसलेला दिसायचा. एखाद्या विभागाची (डिपार्टमेंट) काही कारणाने पार्टी वगैरे असली तर डिनर ला त्यालाही बोलवायचे. सोमदा फार आढेवेढे न घेता पार्टीत सामील व्हायचा. डिनर आटोपून कामाला येऊन बसायचा किंवा घरी जायचा. घरी लवकर जाऊन तरी करणार काय ? एकटा जीव. सोमदा त्याच्या खुर्चीत दिसला नाही की समजायचं बहुतेक कलकत्त्याला गेलाय.

तो दिवस आमच्या ऑफिसमधला दुसऱ्या एका विभागाचा अधिकारी निषाद सावे आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवशी निषाद कामासाठी उशिरापर्यंत बसला होता.

 वॉश रुमला जाताना त्याला सोमदा दिसला. निषादकडेच एकटक पहात होता. सोमदा नेहमीच त्याला त्याच्या आडनावाचा विचित्र उच्चार करून हाक मारायचा. सावेचं सावार करायचा. आताही तो म्हणाला , 

"हे सावार ! तुम गाया नाही घर ?"

निषाद म्हणाला "हो जरा पेंडींग काम होतं ते पूर्ण करत बसलो होतो. तुला किती वेळ आहे अजून ? नाहीतर बाहेर डिनर करूनच गेलो असतो घरी. त्यावर सोमदा होकारार्थी मान हलवत चालबे चालबे okay असं म्हणाला. निषादला जाणवत होतं, आज सोमदा बोलताना एकटक त्याच्याकडे भावनाहीन नजरेने पहात होता. निषादने मनात आलेल्या विचाराकडे दुर्लक्ष केलं . रात्रीचे साडेनऊ पावणेदहा व्हायला आले होते. दोघांनी आपापली टेबलं आवरली आणि बाहेर पडताना निषादने सहजपणे सोमदाचा हात पकडला तर तो बर्फासारखा थंडगार लागला. निषाद गमतीने म्हणाला सुद्धा "सोमदा एकदम ठंडा हो गया है. बहोत दिनसे गया नाही लागता हैं कलकत्ता ?"

सोमदा हसला आणि म्हणाला "क्या सावार ! माजाक करता है. AC ज्यादा हैं ना इसलीये ठांडा हो गाया ."

असा हास्यविनोद करत दोघे ऑफिस बाहेर पडले . मस्त डिनर करून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. निघतानाही हात मिळवल्यानंतर निषादला सोमदाचा हात तसाच थंड लागला. अगदी बार्फासारखा. हॉटेलमध्येही AC होतच. त्यामुळे असेल असा विचार करत निषादने तो विचार झटकून टाकला. त्याने घड्याळाकडे नजर टाकली तर रात्रीचे बारा वाजले होते. निषाद घरी पोहोचला तेव्हा दोन वाजायला आले होते. कपडे बदलून त्याने बिछान्यावर अंग टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने लवकर उठण्याचा प्रश्न नव्हता. दोन मिनिटातच तो गाढ झोपी गेला.

सारखी मोबाईलची रींग वाजल्याचं कानावर पडत होतं. डोळ्यावर प्रचंड झोप होती. रींगच्या आवाजाने वैतागून निषादने अर्धवट झोपेच्या डोळ्यांनी घड्याळ पाहिलं. सकाळचे नऊ वाजले होते. चरफडत त्याने फोन उचलला. आणि येणारी जांभई आवरत तो म्हणाला ..

"हॅलो ! कोण बोलतंय ?"

पलीकडून आवाज आला , "अरे मी आतिश. एक वाईट बातमी सांगायची होती तुला."

निषादने झोपेतच म्हटलं. "हं बोल !"

"अरे आपला सोमदा गेला." आतिश म्हणाला

"गेला कलकत्त्याला ? कालच मी त्याला म्हटलं होतं. अरे पण तू सकाळी सकाळी हे सांगून माझी झोप का खराब करतोयस साल्या ?" निषाद वैतागून म्हणाला.

"अरे ऐक ऐक ! गेला म्हणजे वारला. काल रात्री ऑफिसमध्येच त्याच्या टेबलवर काम करताना त्याला सिव्हीयर अटॅक आला असावा. आजूबाजूला कुणीच नव्हतं. कोणीतरी झोपला की काय म्हणून हात लावला तर तिथेच कोसळला. गेलेलाच होता. रात्री नऊ साडेनऊची गोष्ट."

आतिश बोलत होता पण निषादला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याची झोप कधीच उडून गेली होती. सर्वांग घामाने डबडबलं होतं. आपल्याला चक्कर येईल की काय असं वाटतं होतं.

त्याच्या मनात सारखा एकच प्रश्न उभा रहात होता.....

माझ्याबरोबर काल रात्री डिनरला आला होता तो.......?


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror