Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Prasad Kulkarni

Others


1  

Prasad Kulkarni

Others


चव ती च्या हाताची

चव ती च्या हाताची

3 mins 577 3 mins 577

आपण पूर्वीपासून ऐकत आलोय , " तिच्या हाताला चव आहे बरं का " ! हे वाक्य. आता हाताला चव आहे म्हणजे हात चाटून पाहिलेला असतो का ? तर नाही. त्या हातांनी बनवलेला कोणताही पदार्थ चवदार होतो , असा त्याचा अर्थ आहे. पुल नी आपल्या एका पुस्तकात म्हटलय ' आज्जीच्या हातच्या पुरणपोळीची चव आईच्या हाताला येत नाही आणि बायकोच्या हाताला तर नाहीच नाही '. आता यामध्ये तुलना करण्याचा हेतू अजिबात नाही हा एक भाग आणि पुल नी म्हटलय असं लिहिल्यावर आपल्या मनातलं त्यांच्यावर टाकता येतं. असो ,

तर मुद्दा काय हात जितका ज्येष्ठ तितक्या पुरणपोळ्या चविष्ट. आता आजच्या पिढीतील एखादी सून म्हणेल काय तुम्ही हाताच्या चविचं कौतुक सांगताय. आम्हीही करतोच की स्वयंपाक . आमच्या हाताला का चव नाही ? हा प्रश्न अहो ना विचारल्यावर त्यांची काय हिम्मत नाही म्हणण्याची. तर सांगत काय होतो , एक इंच आलं , सव्वा दोन चमचे तमुक आणि पाऊण चमचे अमुक अशा सहित्यानिशी पाककृती ,पाकपारंगत , पाकसिद्धी , एका दिवसात पाकनिपूण अशी पुस्तकं वाचून जर पदार्थ होऊ शकत असता तर तो कुणाच्याही हातचा असो , चविष्टच लागला असता. आपल्या आज्या , पणज्या आणि अगदी आयानी सुद्धा एखाद्या पदार्थाची पाककृती विचारल्यावर अशी मापं नाही सांगितली. लिंबाएवढा गुळ , उगीच जरासं बेसन , छटाकभर अमुक , चवीला साखर , बेताने पीठ अशा साहित्याने बनलेला त्यांच्या हातचा पदार्थ पहिल्या घासातच वा ! झक्कास ! ही दाद उत्स्फूर्तपणे घेऊन जायचा. लोणचं जसं मुरल्यावर आणखी चवदार लागतं तसे हे हात त्या स्वयंपाकात मुरलेले असतात. मग त्या हातांनी वरणाला फोडणी देऊन केलेली साधी डाळीची आमटी सुद्धा खमंगपणाचा स्वाद आणि चव घेऊनच वाफाळलेल्या भातावर अवतरते.  

मला किचन मध्ये लुडबुड करायला तसं आवडतं. गुगल ,युट्यूब वर सोप्या पाककृती पाहून कधीमधी त्या मी बनवतो. पूर्वी आमच्याकडे पावभाजी मी बनवायचो. खाऊन सगळेच मस्त झालीय म्हणायचे. फक्त बायको म्हणायची ' अर्धी तयारी तर मीच करून देते '. तिला समजावत मी म्हणायचो " अगं हो ! पण सगळं एकत्रित करून फायनल आऊटपुट कोण देतं ?" " आता फक्त पाव गरम करायचे राहिलेयत बघ. तेव्हढं फक्त करून टाक की झालं ". तर सांगायचा मुद्दा काय , मी पावभाजी फारच चविष्ट बनवतो हा माझा पक्का समज त्या दिवशी धुळीला मिळाला ज्या दिवशी मी बायकोच्या हातची पावभाजी खाल्ली. खाणारे आपल्याला किती समजून घेत होते हे तेव्हा कळलं. आणि त्यानंतर मात्र मी पाव गरम करण्यापुरताच पावभाजीशी माझा संबंध ठेवला. घराच्या स्त्री चा हात फिरला की त्या वस्तूला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. मग तो खाण्याचा पदार्थ असो , घराची स्वच्छता असो , बेडवर घालायची चादर असो किंवा आपण विस्कटून ठेवलेलं कपाट असो त्यावर ती चा हात फिरला की त्या गोष्टीला एक नेटकेपणा येतो. अहो एव्हढं कशाला कधी ती ने देवपूजा केली की पूजा झाल्यावर मला देवाऱ्हा पहात रहावासा वाटतो. मनात येतं , आपणही रोज हेच करतो मग आज असं प्रसन्न का वाटतंय बरं ?

मला वाटतं प्रेमापेक्षाही यामागची भावना जास्त जवळची असते. म्हणजे स्वयंपाक बनवताना खाणाऱ्यांनी चार घास जास्त खावेत या भावनेने तो बनलेला असतो. अर्थात कंटाळून केलेलं काहीच चांगलं होत नाही हे तर आपण जाणतोच. परंतू आपला कंटाळा थकवा बाजूला ठेवून सुग्रास स्वयंपाक एक स्त्रीचं करू शकते. आणि अशावेळी खुसपट न काढता दाद मिळाली की ती च अर्ध पोट भरतं. आज उत्कृष्ट शेफ जरी पुरुष असले तरी ती च्या हाताची चव कश्श्या कश्श्यालाच नसते हे मात्र खरं.Rate this content
Log in