Shraddha Kandalgaonkar

Abstract Tragedy

4.3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract Tragedy

उपरा

उपरा

2 mins
199


निवृत्ती नंतर काही महिन्यात त्यांना ऑफिस मध्ये जाऊन मित्रांना भेटावेसे वाटले.मित्रांनी दिलेली हसून सलामी त्यांना आनंदी देऊन गेली. थोड्या वेळाने सगळे आपापल्या कामात गुंग झाले.आणि त्यांच्या लक्षात आले की तीस वर्षांच्या ह्या सहवासानंतर आता इथे आपण उपरे आहोत.


दहा वर्षात एकदाही आई वडिलांची चौकशी ना करणारा अर्जुन जेव्हा बाबांच्या अंत्यदर्शनसाठी आला.तेव्हा शेजारी, मित्र मंडळी ह्यांनी इतकी चोख आणि प्रेमाने सगळी तयारी केली होती . सहृदयांच्या घोळक्यात आईला मुक्त होऊन रडताना पाहून त्याला एकदम आपण कुणीतरी उपरा आहोत ह्याची जाणीव झाली.


तेवीस वर्ष मुलीला अंगाखांद्यावर खेळवले.तिचे सगळे लाड केले.तिचे ,"माझा बाबा जगात भारी आहे ".हे ऐकताना त्याच्या अंगावर मूठभर मांस चढायचे.पण लग्नानंतर तिने जेव्हा ,"बाबा ,मोहित अगदी तुझ्यासारखा आहे ,जगात भारी." असे म्हंटले तेव्हा त्याला उपरेपणाची जाणीव पोखरत गेली.


देवदासीच्या मुलांना जेव्हा सरकारने इतर मुलांप्रमाणे शाळेत जाण्याची परवानगी दिली.तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला.पण महिन्याभरातच सगळे जण शाळा सोडून घरी बसले.जेव्हा त्यांना विचारण्यात आले ." आम्हाला शिकून मोठे व्हायचे होते शहाणे व्हायचे होते.पण गाजावाजा करत आमच्या अस्तित्वाचे इतके मोठे भांडवल करण्यात आले.त्यामुळे इतर मुलांच्या,शिक्षकांच्या वागण्यात बोलण्यात दिसणारा कुत्सित भाव आम्हाला असह्य झाला. उपरेपणाच्या भावनेने मन उदास करण्यापेक्षा आमच्यातल्याच ज्यांनी जग पाहिले आहे त्यांच्या कडून कसे जगायचे हे शिकून घेऊ. समाजाच्या दृष्टीने उपरे बनून जगण्यापेक्षा आमच्यातल्या आपपरभावाने आम्ही आमच्या मुलांसाठी एक वेगळे जग निर्माण करू ".


उपरेपणाच्या जाणिवेने अब्दुल हवालदिल झाला त्याच्या उदास डोळ्यातील भाव बघून हेरंब पुढे झाला आणि म्हणाला ,अरे. मित्रा निसर्गाच्या ह्या दुनियेत आपण सगळेच उपरे आहोत.त्याच्यात मिळून मिसळून राहतो म्हणून त्याने आपल्याला आपले म्हंटले,पण त्याच्या बरोबर पंगा घेतला तर तो आपल्याला आपली जागा दाखवतो.माणूस सगळीकडे एकच असतो.आपणच त्याला आपले किंवा उपरे करतो.तू निसर्गाशी जवळीक साध आणि मग बघ... सगळे जग तुझे होईल की नाही माहीत नाही ,पण तू मात्र सगळ्यांचा होशील,आणि आपोआप ही उपरेपणाची भावना संपून आपलेपणा निर्माण होईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract