Shraddha Kandalgaonkar

Classics Inspirational

4.5  

Shraddha Kandalgaonkar

Classics Inspirational

एका स्वप्नाची गोष्ट

एका स्वप्नाची गोष्ट

6 mins
353


माधवराव आज जरा जास्तच खुशीत होते.सकाळ पासून गुणगुणत पण होते.तीन तीनदा आरशात बघत होते.त्यांची ती धावपळ बघत नीता ताई गालातल्या गालात हसत होत्या." मी जरा बाहेर जाऊन बघतो ग ,अजून कसे आले नाही आहे सगळे.""अहो फार लांब नका जाऊ परत दमाल तुम्ही." "आता विसर दमणे आणि थकणे आता फक्त रमणे." असे म्हणून जोरजोरात हसत ते तिथून निघून गेले. नीता ताई हलकेच बागेतल्या झोपल्यावर टेकल्या.त्यांच्या आयुष्याचा सिनेमा त्यांच्या नजरेसमोरून ७०mm मध्ये दिसायला लागला.

माधव ,सुरेश आणि सुलभा तिघे भावंडं आई वडिलांबरोबर सोलापूरला राहत होते. साठ पाचष्टीचा काळ होता तो त्यामुळे तुटपुंजा पगार सुद्धा रोजची सुख मिळवून देत असे.मोठा सुरेश त्यानंतर सुलभा आणि शेंडेफळ माधव अशी ही बहीण भावंडं एकमेकाबरोबर छान वेळ घालवत असत.लहान गावाची छोटी छोटी स्वप्न .दिवस सहज निघून चालले होते.सुरेश जेव्हा पंधरा वर्षांचा होता तेव्हा अचानक नानांची म्हणजेच त्याच्या वडिलांची नोकरी गेली. प्रायव्हेट कंपनीत असल्यामुळे पेन्शन नव्हते.मालकाच्या कृपेने चार पैसे मिळाले.घरी आल्यावर नाना आणि आई पुढे काय ह्या विवंचनेत असतानाच मुलं शाळेतून घरी आली .आई दादाला परीक्षेत खूप चांगले गुण मिळाले शाळेतून पहिला आला तो .असे सांगत माधवाने उड्या मारायला सुरुवात केली.नानांनी दादाच्या डोक्यावर थोपटल्यासरखे केले आणि बाहेर जाऊन ओटीवर बसले. मुले एकदम शांत झाली.परिस्थिती कळल्यावर सुरेश एकदम चिडला,अन् ताडताड नानाना आणि आईला बोलला न जेवता बाहेर जाऊन झोपला.

खरं तर त्याचे हे असे चिडणे त्यालाही फार लागले.पण भविष्याचा विचार आल्यावर तो तसाच आडमुठ्या सारखा बसून राहिला.नानांनी खूप विचार केला त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याला वकील व्हायचे होते आणि त्यासाठी पुढील शिक्षण महत्वाचे होते.नानाचे एक मित्र पुण्यात राहायचे त्यांच्या कडे त्यांनी शब्द टाकला.

तोही हो म्हणाला,पण रोज वाडा झाडायचा आणि विहिरीतून पाणी आणून द्यायचे काकूंना वाण सामान भाजी आणून द्यायची .त्या बदल्यात मी त्याला रोज दहा पैसे देईन.आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईन.सुरेशला खर तर हे पटले नव्हते पण इलाज नव्हता त्यामुळे त्याने मंजुरी दिली. निघताना नानांना त्याने सांगितले की ,"पुण्याला सोडायला येवू नका.ह्या पुढचे आयुष्य जर मला एकट्याने काढायचे आहे तर आज पासूनच सुरुवात करतो.मागे वळूनही न पाहता सुरेश निघून गेला.

काकूंकडे काम केल्यावर कधीतरी त्या त्याला पोळी भाजी द्यायच्या.पण नाहीतर रोज एका खानावळीत तो जेवायला जायचा.तिथल्या त्या सुक्या पोळ्या आणि पाणीदार तिखट भाजी त्याला अजिबात आवडायची नाही.मग त्याने एक दिवस काकांना सांगितले ,आज पासून मी अजून थोडे काम करेन स्वयंपाकात मदत करेन पण मला इथेच खायला मिळेल असे करा.काकांना कौतुक वाटले .मी माझा अभ्यास पूर्ण करेन सगळी काम व्यवस्थित करेन.तेवढे मी जुळवून घेऊन पुढे जाईन सगळ्या परिस्थितीशी .जगाशी सुरेश जुळवून घेत होता पण आई नानांशी नाही.

बाहेर जरी दाखवत नसली तरी ती दोघेही मनातून खचली होती.

सुरेश ची ही तऱ्हा तर सुलभा त्यांच्या मागे आठवी झाल्यापासून लागली होती माझे लग्न करून द्या .फक्त तो श्रीमंत हवा .मला गरिबीचा कंटाळा आला आहे.एका जमिनदाराच्या मुलाचे स्थळ आले आणि नानांचे न ऐकता तिने लग्नाला होकार दिला .जमीनदारांनी नारळ व मुलगी मागितली.आणि नानांनी ती खाल मानेने दिली.

माधव मात्र विचारी ,समंजस होता.त्याने नेटाने अभ्यास केला .मजुरी केली शेतात काम केले शिक्षण पूर्ण झाल्यावर तो सरकारी नोकरीत लागला.आधीपासून ठरवले होते त्याने की चार पैसे जास्त मिळाले नाही तरी चालेल पण सरकारी कायम स्वरुपी नोकरीच करायची.नोकरीत जरा स्थिरावल्यानंतर त्याने आई नानांना मुंबईत आणले.पूर्वीच्या जखमा आता पूर्ण बऱ्या झाल्या होत्या पण व्रण होतेच.त्यामुळे नाना कुणाशी जास्त बोलत नव्हते.आई मात्र भरून पावली होती.आपल्या संस्कारावरचा तिचा उडालेला विश्वास तिच्या मध्ये परत आला होता.

माधव आपल्या पगारातून एक हिस्सा बाजूला काढून बँकेत ठेवत असे.त्याबद्दल विचारले की हसून तो विषय टाळत असे.

लग्नाच्या मागण्या यायला लागल्या अन् पहिल्याच मुलीला त्यांनी पसंत केले. निता गोडबोले, इंटर पर्यंत शिक्षण पण हुशार ,मनमिळावू ,समजूतदार.लग्नानंतर तिने आई नानाची आणि घराची जबाबदारी उचलली आणि शेवटपर्यंत छान निभावली.आई नानांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी नीताच्या डोक्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात तिने दिलेल्या निस्वार्थ प्रेमाची पावती होती.

एक मुलगा अन् एक मुलगी असा छान चौकोनी कुटुंब होते त्यांचे.बाकी कितीही प्रेमळ असले तरी माधवराव आर्थिक गोष्टीत अगदी वेगळे भासायचे.त्यांनी मुलांना प्रत्येक गोष्टींची किंमत आहे हे अगदी लहानपणापासून मनावर बिंबवले होते.त्यामुळे तुम्हाला दिलेल्या खर्चाच्या पैशातून तुम्ही किती आणि कसे वाचवता हे बघून मी तुमचे दर तीन महिन्यांनी पन्नास पैशांनी वाढवून देईन.असे सांगितल्या मुळे मुलेही छान बचत आणि पैशाची किंमत कळून मार्गाला लागले.लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला माधवरावांनी बायकोला आणि मुलांना जवळ बोलावले .

"आज मी तुम्हाला माझे स्वप्न सांगणार आहे,ज्यासाठी मी आयुष्यभर कष्ट केले पैसे साठवले आणि ते पूर्णत्वाला कसे न्यायचे ह्याची खात्री झाल्यावर मी हे सगळे सांगत आहे. निता तुझ्या सारखी समजुतदार बायको मिळाली म्हणून मी देवाचा कायम ऋणी राहीन.तुझ्यासारखी आपली दोन्हीही मुले आहेत.मी आखलेल्या मार्गावर तुम्ही स्वखुशीने मला साथ दिलीत पण तुमच्या डोळ्यातले प्रश्नचिन्ह मला नेहमी अस्वस्थ करत असे.मी माझ्या पागरातला एक हिस्सा काय करतो? कोणाला देतो? ह्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आली आहे .

नानांची नोकरी गेली तेव्हा सुरेश पंधरा,सुलभा दहा आणि मी आठ वर्षांचा होतो.जे झाले ते मला कितपत कळले हे मला माहीत नाही पण नानांनी न केलेल्या चुकीची त्यांनी आयुष्यभर शिक्षा भोगली .हे मात्र नक्की कळले होते.मोठा होत असताना माझ्या मनात अनेक विचार यायचे.आणि मग मी माझा निर्णय घेतला.खूप मेहनतीने शिकलो,नोकरीला लागलो आणि पहिल्या पगारापासून बचत करायला लागलो. हे एवढं मोठे घर घेतले.सोलापूरचा वडिलोपार्जित वाडा सांभाळून ठेवला.आणि तुमचे शिक्षण करून तुम्हाला चांगली नोकरी लागेपर्यंत मी पंच्चावंन वर्षांचा होईन.हे घर मी तुम्हाला तुमचे स्वतःचे घर होईपर्यंत राहायला देणार आहे .मग मी बँकेत reverse mortgage loan ह्या योजनेत हे घर देऊन टाकणार.मुलांच्या आणि बायकोच्या डोळ्यातले भाव बघून ते पुढे सांगू लागले ,

ह्यात मी ह्या जागेवर कर्ज घेणार बँकेतून, माझ्या निवृत्ती नंतर आणि माझ्या नंतर हे घर बँक परत घेणार ह्यात निता तुझेही नाव आहे त्यामुळे तुलाही मी वाऱ्यावर सोडणार नाही.मी माझे राज्य स्वतः उभे केले . तूम्हालाही ते शिकवले.त्यामुळे तुमची घरे होईपर्यंत इथेच रहा .पण आपले छोटेसे का होईना घर घ्या.तुम्हा दोघांच्या शिक्षण आणि लग्न ह्या साठी मी वेगळे पैसे साठवून ठेवले आहेत पण त्या ऊपर जर खर्च वाढणार असेल तर तो तुम्ही स्वतःच्या पैशाने करायचा .आता मी साठवलेले पैसे त्याचे काय केले आहे ते सांगतो..

मी सोलापूरच्या वाड्याचे वृद्धाश्रमात रूपांतर केले आहे .तिथे शाळेतले शिक्षक जे आता निवृत्त झाले आहेत ते सगळे काम बघतात .तिथे येणारे वृद्ध यांच्या कडून मी काही पैसे घेत नाही.पण त्यांना जी काम येतात ती त्यांना करायला लावून त्यातून त्यांना पैसे कसे मिळतील हे पाहतो.म्हणजे जोशी आजी आजोबा अतिशय हुशार आहेत त्यांना मी शाळेतील मुलांची शिकवणी घ्यायला लावली आहे.पवार आजोबा प्लंबर होते,त्यांना ज्या मुलांना अभ्यासात गती नाही त्यांना प्लंबिंग चे शिक्षण द्यायला सांगितले आहे.काही जण स्वयंपाकघरात काम करतात काही बागेत.गावात एक अनाथाश्रम आहे तिथे काही आजी आजोबा जाऊन फक्त त्या मुलांना जवळ कुशीत घेऊन मांडीवर घेऊन बसतात.अगदी एक तासासाठीच कारण परत मग ते भावनिक रीत्या गुंतणे नको.अभ्यास सांगतो की अनाथ मुलांना मायेचा स्पर्श झाला तर ती हुशार ,समजुतदार होतात.त्यांच्या त्यांच्या तब्येती प्रमाणे ते जे काही काम करतात त्याच त्यांना दर आठवड्याला मी काही थोडे पैसे देतो .त्यांचं काम खूप नसते पण आता आपण काम करू शकत नाही म्हणून मुलांनी आपल्याला बाहेर काढले हि जाणीव त्यांना पोखरून काढते.त्यामुळे ते खुश असतात.ज्यांना काहीच करायचे नसते त्यांना ऑफिस मध्ये कामाला लावतो.आणि जे आजारी आहेत त्यांची मायेने काळजी घेतो .

हे असे वृद्धाश्रम मी नानांच्या अनुभवावरून काढायचे ठरवले.

काळजी करू नका .सुरेश आणि सुलभाला ह्याची पूर्ण कल्पना आहे.सुरेश ची मुले त्यांच्यासारखी निघाली.बायको गेल्यावर तोही आता तिथेच येऊन राहिला आहे..आणि होतकरू मुलांना वकिली शिकवत आहे.सुलभा अधून मधून येऊन मदत करून जणू आपल्या पापाचे प्रायश्चित्त करत असते.तिचा नवराही मदत करत असतो.

हे मी तुम्हाला सांगितले नव्हते कारण मला हे कसे जमते आहे ते बघायचे होते.माझी स्वप्न खूप मोठी आणि वेगळी होती त्यात बाकी सगळे येतात का आणि आल्यावर रमतात का हे मला बघायचे होते.ते सगळे व्यवस्थित पार पडले.आज त्या आश्रमाला एक वर्ष पूर्ण झाले आहे .आणि आपण सगळे तिथे चालले आहोत.नुसती राहण्याची सोय करून प्रश्न सुटत नसतो,ह्या वयात मन सांभाळावे लागते आणि जगण्याची उमेद निर्माण करावी लागते.आपण अजूनही काही करू शकतो हे त्यांना एकदा कळले की ते परत नव्याने जगायला लागतात.

काही न बोलता मुलांनी त्यांना मिठी मारली आणि निता ताईंनी डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांची दृष्ट काढली.

आज सगळी मुलं आपल्या आईवडिलांना भेटायला येणार होती.आणि त्यांचे नवजीवन अनुभवणार होती.कसलाही समारंभ नाही भाषण नाही आज फक्त सगळ्यांच्या साथीने त्यांचे स्वप्न ते पूर्ण होताना पाहणार होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics