Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

टिळकांची स्वराज्याची परिभाषा

टिळकांची स्वराज्याची परिभाषा

2 mins
172


   स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही टिळकांची सिंहगर्जना, स्वातंत्र्य किंवा स्वराज्यासाठी मूलमंत्र देऊन गेली. स्वराज्य अर्थातच स्वतःचे राज्य या एकाच घोषणेने संपूर्ण हिंदुस्तान ब्रिटिशांविरुद्ध जागा होऊन स्वराज्याचा हक्क मागू लागला. लोकमान्यांनी ब्रिटिश सरकार घालवण्यासाठी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार,आणि राष्ट्रीय शिक्षण या चार पद्धतीचा अवलंब केला. संपूर्ण हिंदुस्तानी जनतेला या बाबत जागृत केले. स्वतःच्या देशातील वस्तूंची खरेदी, स्वतःच्या राज्यात स्वतःचे नियम, परदेशी वस्तूंवर बहिष्कार, आणि यासाठी लागणारे शिक्षण यावर लोकांचे लक्ष वेधले. आणि स्वातंत्र्याचे नवीन पर्व नवीन विचारांसहित जागृत होऊ लागले.


        टिळकांना लहानपणापासूनच इतिहासाची आवड होती. त्यामुळे ते स्वातंत्र्याबद्दल अधिक संवेदनशील होते. चालू असलेल्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना कुठेही एकोपा दिसत नव्हता. अनेक जण ब्रिटिशांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. त्यामुळे स्वातंत्र्याविषयीची भावना जागृत नव्हती. एक प्रकारे मरगळ आलेली होती. ती घालवण्यासाठी टिळकांना त्या चारही पद्धतीचा अवलंब गरजेचा वाटला. आणि त्यातूनच त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात केली. आणि त्या दृष्टीने पावले उचलली. याच विचारांनी प्रेरित अनेक जहाल देशभक्त तयार होऊ लागले. शैक्षणिक धोरणाबाबत कायमच ते अग्रेसर असत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा शाळा काढण्याचा मानस, त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करून पूर्ण केला. शालेय शिक्षण स्वस्त केले. आणि याच हेतूने पुढे एज्युकेशन सोसायटी नावाची सार्वजनिक संस्था उदयास आली. आणि याच संस्थेने 2 जानेवारी 1885 रोजी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.


        1890 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून पत्रकारिता सुरू केली. ब्रिटिशांच्या काळात अनेक हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होत होता. यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला. त्याचबरोबर राष्ट्रभावना वाढीस लागावी म्हणून रायगडावर 1896 साली शिवजयंती साजरी केली. आणि त्याला सार्वजनिक रूप दिले. त्याच साली भयंकर दुष्काळ पडला. त्यामुळे कोणीही कर देण्याची आवश्यकता नाही, आणि जमा झालेला निधी दुष्काळग्रस्त लोकांना मिळावा यासाठी जनजागृती केली. धनिकांना अन्नधान्य व पैसे दान करण्याचे आवाहन केले.


        ब्रिटिशांची आर्थिक कोंडी व्हावी व स्वराज्याचे महत्त्व लोकांना पटावे म्हणून परदेशी मालाची होळी, परदेशी मालावर बहिष्कार असे कार्यक्रम योजले. टिळकांच्या मार्गदर्शनाखाली सावरकरांनी जेव्हा कपड्यांची होळी केली, ही धग ब्रिटिशांना जोरात पोहोचली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, हे जळजळीत अग्रलेख प्रसिद्ध झाले. आणि ब्रिटिशांविरुद्धचा संताप अजूनच बळावला. वर्तमानपत्रातून सरकार विरोधी टीकेचे अस्त्र उठले. सरकारच्या हे लक्षात येताच, देशद्रोहाचा खटला भरून टिळकांची रवानगी ब्रम्हदेशाच्या मंडाले तुरुंगात झाली. सहा वर्षानंतर परत राजकारणात सक्रिय होऊन भारतातील हक्क आणि अधिकारात वाढ झाली पाहिजे इत्यादी मागण्या घेऊन त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली. त्यालाच पुढे स्वराज्य हे नाव देण्यात आले. आणि भाषेचा प्रसार वाढवण्यात आला. त्यानंतरही अनेक चळवळी आणि तुरुंगवास, यातूनच त्यांनी स्वातंत्र्याची जनजागृती केली. आणि एक ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी देह ठेवला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract