Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

3 mins
315


सतत ज्यांची प्रेरणा घ्यावी, अशी माझ्या आयुष्यातील व्यक्ती म्हणजे, आमच्या सौ रोहिणी काकू. आज त्यांचे वय जवळजवळ 70 च्या पुढे असेल, पण उत्साह म्हणाल तर, आम्हालाही लाजवण्यासारखा. यावरून एक जुनी टीव्हीवरची ॲड आठवली. बहुतेक चवनप्राश ची असावी. "सौ साल के बुढे, या सौ साल के जवान" जिना चढताना वयस्कर व्यक्ती व्यवस्थित जिना चढून जाते, तरुण व्यक्ती दम लागल्यामुळे मागे राहते. अशी ती जाहिरात होती. आमच्या काकू अगदी तशाच बर का. म्हणजे चवनप्राश खाऊन त्यांनी ब्रह्मगिरी ची फेरी केली असे म्हणायचे नाही मला.यावरून एक प्रसंग सागते. आमच्या नाशिकमध्ये, श्रावण महिन्यात ब्रह्मगिरीची फेरी करायची पद्धत आहे. तर आमचा ग्रुप पण निघाला. पावसाळ्याचे दिवस असतात. रस्ता दुर्गम असतो (आता अलीकडे चांगले रस्ते झाले आहेत) दगड, चिखल आणि त्यातून चढावरचा रस्ता, असे बरेच अंतर चालावे लागते. आणि ट्रेकिंग सारखी काठी घ्यावी लागते. म्हणजे पाय निसटायची भीती राहत नाही आणि आधारही होतो. तर आमच्या या काकू, चालताना सगळ्यात पुढे. दोन पावले चालले की मला दम लागायचा, पाय भरून यायचे. काकूंकडे पाहून एकच उद्गार यायचा तोंडामध्ये, 'बापरे' आणि चालताना काहीही खात नसत. फक्त एनर्जी साठी म्हणून सरबताची मोठी बाटली भरून घेतलेली. अधून मधून तेच घेत असत. 


       मनात असेपर्यंत एलआयसीची सर्विस केली. त्यानंतर मुदतपूर्व रिटायरमेंट घेतली. आणि सतत काहीतरी चांगले करण्याचा ध्यास, त्यातूनच वेळेचा सदुपयोग म्हणून, पौरोहित्याचे क्लास सुरू केले. पहिल्यापासूनच संस्कृतवर गाढ वर्चस्व आणि घरात शाखेचे संस्कार, (आर एस एस). आज जवळजवळ तीस वर्षापासून, क्लास अव्याहत सुरू आहेत. एकाही नया पैशाची फी नाही. अगदी छोट्या श्लोका पासून सुरुवात ते सप्तशती पर्यंत.प्रत्येकाला उत्तम मार्गदर्शन करणार अगदी समजेपर्यंत. कधीही कुणावर, चिडणार नाहीत. आता संस्कृत भाषा म्हणजे संथा घेतल्याशिवाय, बोलता किंवा वाचता येतच नाही. पण अगदी शब्दांची फोड करून, त्याचा अर्थ अगदी विस्तृतपणे सांगणार. ऐकणारा ही तल्लीन होऊन जाई. आत्तापर्यंत कितीतरी अध्यात्मिक विद्यार्थिनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. त्यांच्या क्लासला एकदा जोडलो गेलो की, आपली अध्यात्मिक उन्नती झालीच म्हणून समजा. मग त्या वातावरणात राहून, वेगवेगळ्या परीक्षा, जसे की गीता, दासबोध, मनोबोध अध्यात्मिक प्रवचन , सत्संग, अध्यात्मिक यात्रा-सहल, सहज घडले जायचे प्रत्येकाकडून. त्यांचा अजून एक गुण घेण्यासारखा म्हणजे, कधीही कोणत्याही गोष्टीला आणि कोणालाही त्यांना 'नाही' म्हणणे जमले नाही. मग गोष्ट कितीही खाजगी का असेना. स्वतःच्या बाजूने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारच. अगदी कोणीही त्यांच्यापाशी आपल्या मनातील बिनदिक्कत बोलावं असं दिलखुलास व्यक्तिमत्त्व. अगदी मनापासून सगळ्यांना आपलं मानणार. सतत समोरच्या व्यक्तीला चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा, प्रोत्साहन, उत्साह देणार. स्वार्थाचा लवलेश तर कधीच दिसला नाही त्यांच्यामध्ये. सदैव तृप्त , शांत आणि समाधानी. 


          आणि या सततच्या उत्साहामुळे, अगदी छोट्या यात्रे पासून ते मोठी मानस सरोवरापर्यंतच्या त्यांच्या अध्यात्मिक यात्रा पूर्ण झालेल्या. याही वयात रोजचे फिरणे, प्राणायाम, योगा नित्यनियमाने करतात. आणि अतिशय निर्भीड. कधीच कोणत्या आजारपणाला घाबरणार नाहीत की कोणत्याही संकटांना. प्रचंड आत्मविश्वास. आत्ता कोविडच्या काळात, आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या. पण इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बऱ्या होऊन घरी आल्या. आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य, सततचे देवाचे म्हणणे यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज. एवढे सर्व असूनही, पाककला अतिशय उत्तम. प्रत्येक पदार्थ असा वेगळ्या चवीचा बनवणार. स्वतः खाणार आणि दुसऱ्यालाही खाऊ घालणार. आत्ता ऑनलाइनच्या जमान्यात, त्या ही पण पद्धत शिकल्या. गीतेचे क्लास त्यांनी ऑनलाईन घेतले. नवरात्रामध्ये नऊ दिवस अजूनही फक्त फळे खाऊन उपवास करतात. 


         आणि नवरा बायकोचं नातं म्हणजे काका काकूंचं,आपल्यासारखं नाही. त्यांच्या गप्पांमध्ये कधीही संसाराच्या गप्पा नसतात. कायम एखाद्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतील, किंवा इतर गोष्टींवर. कोणत्याही एका गोष्टीचे बंधन असे त्यांनी ठेवून घेतले नाही. जसं असेल तसं, जसे जमतं तसं, याच तत्वानुसार आचरण केले. मी एकदा त्यांना विचारले, काकू, तुमचे गुरु कोण? तर म्हणतात कशा, मला अजून कोणी तसा गुरु भेटलाच नाही. एकदा त्यांच्या बरोबर अष्टविनायकची तीन दिवसांची यात्रा करण्याचा योग आला. तेव्हा तर, मला त्यांचे रूप अजूनच वेगळे वाटले. गाण्याच्या भेंड्या, एकमेकांची काळजी, विनोदी स्वभाव यामध्येही त्या अग्रेसरच होत्या. 

   

 असं आमच्या काकूंचं बहुआयामी व्यक्तिमत्व, सतत प्रेरणादायी असं.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract