Seema Kulkarni

Others

4  

Seema Kulkarni

Others

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

7 mins
454


वर्षा ऋतूचे आगमन म्हणजे तप्त झालेल्या धरणीला, थंडावा देणारा. तहानलेल्या ,भेगाळलेल्या मातीला आपल्या कवेत घेणारा. सगळी सृष्टी हिरवीगार करणारा. प्रेमीजणांच्या प्रेमाचा साक्षीदार असलेला हा ऋतू.


     "मुझे प्यार हुआ अल्लामियाॅं, भरी बरसात मे इकरार हुआ" असे म्हणत एकाच छत्रीत प्रेमाची कबुली देणारा. तर "या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती"असे म्हणत बहरलेल्या प्रेमाला अजूनच बहर आणणारा हा पाऊस. किंवा "लगी आज सावन की फिर वो झडी है" असे म्हणत, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवणारा हा पाऊस. तर कधी बरसणाऱ्या श्रावणधारां बरोबर, डोळ्यातील श्रावणधारा ही लपवणारा. अंगावर रोमांच, शहारे आणणाऱ्या या ओल्या आठवणी जागवणारा. या चांगल्या क्षणांचा साक्षीदार असतो हा पाऊस. तसा आमच्यासाठी काही दुःखद आठवणी देणारा ही ठरला .वर्षा ऋतूचे आगमन म्हणजे आमच्यासाठी परीक्षेची वेळ असते. हे दिवस म्हणजे "डोक्यावर टांगती तलवार" असेच काढावे लागतात. पाऊस सुरू झाला की कायमच धडकी भरते.

   

          गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही 2020 ची. आमच्याकडे म्हणजेच नाशिकला तुफान पाऊस झालेला. तसा सर्वच ठिकाणी झाला होता कोल्हापूर-सांगली, पुणे मुंबई. ओला दुष्काळ अशीच परिस्थिती झाली होती. मुंबईत दाखल झाला की आठ दिवसांनी नाशिकला ही हजर ‌. एकदा सुरू झाला की, थांबायचे नावच नाही. मागच्या वर्षी चारही बाजूने कठीण परीक्षा होती. 22 मार्च पासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होते. त्यामुळे आमचेही शॉप दोन महिने कम्प्लीट बंद होते. आमचे झेरॉक्स स्टेशनरीचे शॉप आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान, त्यानंतर सुरू झालेला पावसाळा, या ऋतूमध्ये आमच्या बिजनेस ला येणाऱ्या अडचणी यामुळे आठवणी अगदी लक्षात राहील अशाच आहेत. आता तुम्हाला वाटेल कि आर्थिक नुकसान तर सर्वांचेच झाले. त्यात काय विशेष? आणि पावसाळ्याचा काय संबंध? त्याचे कारण असे की, आमचे दुकान उंटवाडीरोडवर, अंडरग्राउंड, कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आहे. आणि दुकानाच्या मागच्या बाजूला, उथळ पात्र असलेली नंदिनी नदी वाहते. समोरच्या रस्त्यावरून, अगदी पाव टक्केच दुकान दिसते.

असं तर पाऊस जेव्हा मुसळधार पडतो, आणि थांबून जातो, तेव्हा मुळीच काळजी नसते. कारण थांबल्यावर पाणी ओसरून जाते. पण काळजी तेव्हा वाटते, जेव्हा सतत तीन ते चार दिवस संततधार सुरू राहते. कारण सर्वच ठिकाणच्या पाण्याचा साठा वाढतो. आणि पर्यायाने नदी पात्रात येऊन मिळतो. त्यामुळे नदीची लेव्हल वाढली की आमचे टेन्शन वाढते. कारण दुकान अंडरग्राउंड असल्यामुळे, पाणी यायला वेळ लागत नाही. मग सर्व चेंबर खोलणे , मागे जाऊन नदीची पातळी सतत चेक करणे, पाऊस नाही थांबला तर पुढचे पाऊल काय उचलायचे, यासंबंधी चर्चा सुरू होतात.


         मागच्या वर्षीची कटू आठवण म्हणजे चार ऑगस्टची. पाऊस जे आदल्या दिवशी सकाळपासून मुसळधार कोसळायला सुरुवात झाली होती, ते रात्र होत आली तरी जराही कमी झाला नव्हता. सर्वांचेच धाबे दणाणले. एकमेकांना सावध करणे ,सामान आवरून ठेवण्याविषयी सांगणे असे प्रकार सुरू झाले. आमचे दुकान पुढच्या साईडला, या लाईन मध्ये पंधरा दुकाने, आणि मागच्या साईडला तेवढीच दुकाने अंडरग्राउंड अशी. अशावेळी ना जेवण्यात ,खाण्यात ,ना झोपण्यात कशातच लक्ष लागत नाही. सतत फोन वरून हालचालींचा अंदाज सुरू राहतो. कोणत्या क्षणी पाण्याची पातळी वाढेल आणि दुकानात पाणी शिरेल, याचा भरवसाच नसतो. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाऊन हळूहळू सामान आवरायला सुरुवात केली होती. कारण भीतीने सगळेच सामान आवरून ठेवायचे, आणि नाही पाणी आले तर, परत तेवढाच त्रास, म्हणून अंदाज घेत घेतच, सामान आवरत होतो. पावसाचा जोर परत एकाएकी वाढला. त्यावेळेस साधारणपणे सकाळचे आठ वाजले होते. कॉम्प्लेक्समध्ये एकच गोंधळ सुरू झाला. आता मात्र सर्वांनी सिरिअसपणे सामान आवरायला सुरुवात केली. कोण कोणाला मदत करणार? ज्याला त्याला स्वतःची काळजी. माझी तर भीतीने गाळणच उडत होती. बरोबरीने रडायलाही येत होतं.कोणत्याही क्षणी पाणी यायला सुरुवात होणार होती. त्याच्या आत सर्व सामान हलवणे गरजेचे होते. एक झेरॉक्स मशीन उचलायला कमीत कमी चौघेजण तरी लागतात. मीच शेजारच्यांना विनंती केली, आणि तशा पावसात , मशीन, बाकीचे सामान शेजारच्या कॉम्प्लेक्स मधील पॅसेजमध्ये हलवले. मधेच पाण्याने पाय सरकत होते. प्रचंड टेन्शन , भीती याने वातावरण पूर्ण ढवळून निघाले होते. जसं जमेल तसं सामान पोत्यामध्ये पॅक केले. एक तासात बरेच सामान आवरले गेले. पुढचे जड काउंटर ,एक कंप्यूटर टेबल ,एक साधा टेबल एवढे सामान बाकी होते. काउंटर हलवणे शक्यच नव्हते. नदीने लेव्हल ओलांडली होती. हळूहळू पायर्‍यांवरुन पाणी यायला सुरुवात झाली होती. पाणी यायला सुरुवात झाली की, दुकानाच्या दोन्ही साईड ने, रस्त्यावरून, पाठीमागून अशा चारही बाजूने येते. दोन पायऱ्या बुडाल्या. अजूनही बारीक सारीक काही राहिले का म्हणून धावपळ सुरूच होती. सर्वानुमते शटर उघडे ठेवायचे ठरले. कारण पाण्यामध्ये ते पूर्णपणे पॅक होतात. रिपेयरिंग ला नंतर बराच खर्च येतो.


      पाणी साठायला सुरुवात झाली होती, अशा वेळेस पाण्यात करंट येईल या भीतीने उतरणे धोक्याचे होते. कंप्यूटर टेबल कसा तरी वरती आणला. आता मात्र सर्वजण थांबले. पाण्याचा प्रवाह वाढत होता. अंडरग्राउंड च्या नऊ पायऱ्या व त्या वरती नऊ पायऱ्यांचा वरचा भाग

होता. आम्ही वरती थांबून एक एक पायरी बुडताना पहात होतो. थोड्याच वेळात सर्व गाळे पाण्याने गच्च भरले. एक राहिलेला टेबल पाण्यामध्ये तरंगत वरती आला. रस्त्यावरूनही पाणी जोरात वहायला लागले होते. त्यात बघ्यांची गर्दी हटविण्यासाठी पोलिसांची व्हॅन फिरत होती. सतत अनाउन्समेंट सुरु होती. पावसाचा जोर किंचितही कमी होत नव्हता. भीती वाढतच होती. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी. एक भीषण शांतता पसरली होती. पावसाचा आवाज आणि वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, फक्त हेच चालू होते.


         वरच्या पहिल्या पायरी ला पाणी लागले. तसेच सर्वांनी आम्हाला मागे जायला सांगितले. खालून तर जाऊ शकत नव्हतो. मागचा ही पूर्ण पॅसेज पाण्याने ओसंडून वाहत होता. वरूनच कडेकडेने ,एकमेकांचा आधार बनत, जिथे सामान ठेवले होते ,तेथे जाऊन बसलो. पावसाचा जोर थोडा तरी कमी व्हावा म्हणून प्रार्थना करत होतो. सकाळपासून पावसात भिजत होतो, त्यात सामानाची हलवाहलव यामुळे आता प्रचंड थकवा आला होता. थंडी वाजत होती. भूकही लागली होती. संथपणे पावसाच्या वाढणाऱ्या पातळी कडे बघत होतो. सकाळची गडबड ,गोंधळ आता शांत झाली होती. फक्त पाण्याचा आवाज येत होता.साडेतीन वाजता, पावसाचा जोर थोडा कमी झाल्यासारखा वाटला. तोपर्यंत वरच्याही चार पायऱ्या बुडाल्या होत्या.


            रस्त्यावर ही जवळजवळ साडेचार फूट पाणी होते. जे होईल ते शांतपणे पाहत होतो. अजून जर पाणी वाढले तर पॅसेज मधले सामानही हलवावे लागणार होते. परंतु जुन्या लोकांच्या अंदाजानुसार, वरपर्यंत पाणी येणार नव्हते. पण म्हणून टेंशन मात्र कमी होत नव्हते. सर्व ऑफिसेसच्या सामानाची गर्दी झाली होती. जिथे जागा मिळेल तिथे सर्वांनी सामान ठेवले होते. त्या गर्दी मध्ये आपल्या सामानाकडे लक्ष ठेवणे, मोठे जिकिरीचे काम होते. कारण अशा वेळीच मोठ्या प्रमाणात चोर्‍या होतात. पावसाचा जोर अजून कमी झाला. जीवात जीव आला. लगेच रस्त्यावर बघ्यांची पूर पाहण्यासाठी गर्दी सुरू झाली. गर्दी कंट्रोल करण्यासाठी पोलिसांची गर्दी. आम्ही जिथे थांबलो होतो तेथून घरी जाण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यातून जाऊन रस्ता क्रॉस करावा लागणार होता. मला घरी जायचे होते. प्रचंड थकवा आला होता. दोघा तिघांच्या मदतीने, हाताला धरून त्या पाण्यातून बाहेर आले आणि घर गाठले.

   

              पाऊस थांबला तसा रस्त्यावरचे पाणी ही दोन तासात ओसरून गेले. रस्ता नेहमीप्रमाणे नॉर्मल झाला. पण सर्व अंडरग्राउंड मधील पाणी दोन दिवस तसेच होते. सगळी कडचा गाळ ,घाण साठून राहिली होती. ते काढल्याशिवाय निघणार नव्हते. पाणी काढण्यासाठी मोटारी लावाव्या लागल्या. दोन दिवसांनी परत साचलेला गाळ ,माती काढण्यासाठी माणसे लावावी लागली. सगळीकडे घाण आणि दलदलीचे साम्राज्य पसरले होते. नंतर ते स्वच्छ करण्यासाठी पाण्याचे टॅंकर बोलावले गेले. सर्वांची समस्या एक सारखीच होती. जवळजवळ आठ दिवस असेच गेले. दोन दिवस पूर्ण दुकान पाण्याखाली असल्यामुळे, भिंती प्रचंड गार, लाईटच्या बोर्डामध्ये गाळ घाण अडकलेली, खाली टाइल्स मधून पाणी झिरपायचे. दुकानाचे परत नव्याने रिपेरिंग करावे लागणार होते. सुरुवात लाईटच्या बोर्ड पासून झाली. फॅन कामातून गेले होते. एक तर दुकानाचा धंदा बंद होता, त्यात प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत होते. आणि तिहेरी नुकसान म्हणजे, झेरॉक्स साठी लागणारे पेपर पावसाळ्यामुळे पूर्णपणे सादळून गेलेले. पण रुटीन चालु ठेवणे गरजेचे होते. पहिल्यासारखे रुटीन चालू होण्यासाठी एक ते दीड महिना लागला. पण परीक्षा इथेच संपली नव्हती.


          परतीचा पाऊसही, गाजावाजा करीतच गेला. नवरात्रीचे दिवस सुरू होते. रोज पाऊस सुरूच होता. दुपारचे तीन-साडेतीन वाजले की, अंधारून यायचे आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची. चौथ्या का पाचवा माळेचा हा प्रसंग. मैत्रिणीकडे त्यादिवशी नवरात्रीची पूजा होती म्हणून मी तिच्याकडे गेले होते. पावसाच्या भीतीने लवकर निघाले, परंतु पावसाने गाठलेच. अगदी थोड्या वेळातच रस्त्यावर दोन अडीच फूट पाणी साठले. रिक्षावाल्याने त्यातूनही रिक्षा बाहेर काढली. कशीतरी मी घरापर्यंत आले. एवढ्यात त्यांचा फोन आला. आता ही दुकानात साडे तीन फुट पाणी आले होते. या वेळेस मागून नदीतून न येता डायरेक्ट रस्त्यावरून पाणी पुढच्या साईडने दुकानात शिरले होते. आम्ही कधीही याची कल्पनाही केली नव्हती की असेही होऊ शकते. पहिल्या पुराच्या वेळेस जागरूक होतो. त्यामुळे सामानाचे नुकसान झाले नाही. परंतु आता अचानक पाणी आल्यामुळे, आवरायला वेळ मिळालाच नाही. अचानक पाणी यायला सुरुवात झाल्यावर काय काय म्हणून आवरणार? बर्‍याच महत्त्वाच्या कागदपत्रांचे, पेपर रिमचे खूप नुकसान झाले.


           ते संपत नाही तोच दिवाळी आली. जराही सणाचा उत्साह म्हणून नव्हता. कारण पावसाळा सुरू झाल्यापासून फक्त संघर्ष सुरू होता. दिवाळीतही पाऊस होता. पण पूरसदृश्य स्थिती मात्र आली नाही. एवढा मोठा सण, पण असातसाच गेला. पूर अगदी जवळून अनुभवला होता. खरंच मागच्या वर्षी येरे येरे पावसा म्हणण्याऐवजी जारे जारे म्हणण्याची वेळ आली होती. जवळजवळ डिसेंबर मध्ये, विना टेन्शन रुटीन सुरू झाले. 

         अडचणी तर येतच राहतात, पण त्यातूनही भरारी घेऊन, पुढचं आयुष्य जगावे लागते.

"जीवन गाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे"


धन्यवाद.             


Rate this content
Log in