Seema Kulkarni

Others

3  

Seema Kulkarni

Others

स्वतःवर प्रेम करणे ,चांगली सवय

स्वतःवर प्रेम करणे ,चांगली सवय

3 mins
213


 "एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी"  या गाण्याचा अर्थ मला पाहिजे तसा घेतला बर का मी. हो मला नक्की आवडेल, परत परत स्वतःवर प्रेम करायला. अनवधानाने , नशिबाने, तर कधी चुकीने गमावलेले क्षण, मला परत जगायला आवडतील. याच जन्मात राहून, नकारात्मकतेचा, दुःखाचा, अडचणीचा काळ दूर लोटून, त्याठिकाणी फक्त आनंद पेरायला आवडेल. सर्व कटू आठवणी सोडून देऊन, फक्त प्रत्येक क्षण आनंदात घालवायला आवडेल. जे जे हातातून निसटून गेलं, त्याचा शोध मी परत घेईन. आणि त्यांना आनंदात परावर्तित करीन.


       आणि हो, स्वतःवर प्रेम केल्याशिवाय, माणूस दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही. असं माझं मत बर का. मी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगते. मग तो क्षण कसा का असेना, क्षण दुःखाचा असला तरी, त्यातच समरसून होउन रडते. त्या क्षणाचा ही आनंद घेते. म्हणजे त्यात दुःखाच्या क्षणाला, कदाचित न्याय देण्याचा प्रयत्न करत असेन. हसायच्या वेळी अगदी भरभरून हसते. अगदी निर्बंध होऊन. आणि दुसऱ्याला ही हसवते. हलके फुलके विनोद करते. समोर येईल तो क्षण, मग तो कुठल्याही वेळेचा असो किंवा कोणत्याही परिस्थितीत ला असतो, नक्कीच साजरा करण्याचा प्रयत्न करते. "आता संधी आली आहे ना, जाऊन बघू ,करून बघू, नाहीच जमलं तर सोडून देऊ" असा विचार करत प्रत्येक पाऊल टाकते. "मला जावस वाटतय, मी जाणार. मला गाणं म्हणावसं वाटतंय, मी म्हणणार, मला नाचावस वाटतय मी नाचणार, मला नवीन फॅशनचे कपडे घालायचे आहेत, मी घालणार असा पवित्रा घेत", स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही सामील करून घेते.  


       शेवटी स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय? स्वतःच्या अंतर्मनाचा कौल ओळखून, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणे , बस इतकेच. समोर मस्त डीजे च्या तालावर, सर्वजण नाचत आहेत, गाणं पण मस्त ठेक्याचे लागलं आहे ( उदा_ झिंग झिंग झिंगाट) खूप नाचावसं वाटतय, पण बंधन आड येतात. थोडा वेळ सगळं सोडून द्यायचं. आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची. इतरांच्या बोलण्यापेक्षा, स्वतःच्या आनंदाची किंमत करायची. अगदी परवाच उदाहरण. एक महिन्यापूर्वी माझ्या सासुबाई गेल्या. आणि त्याच दरम्यान तीन चार पाच तारखेला नाशिक मध्ये साहित्य संमेलन होतं. जाण्याची प्रचंड आणि तीव्र इच्छा होती. पण नुकताच असा प्रसंग घडलेला, बाहेर गेलो तर कोण काय म्हणेल, आणि साहित्य संमेलनात जायचे म्हणजे, व्यवस्थित च जावे लागणार ( म्हणजे हलकासा मेकअप, साडी चांगली हो) थोडा वेळ विचार केला, की काय करू? दुसऱ्याच क्षणी सगळे विचार झटकून टाकले. मीच स्वतःहून मैत्रिणीला फोन आणि आम्ही गेलो.परत परत थोडीच होणार आहे साहित्य संमेलन? हा विचार केला आणि मनाला फ्रेश वाटेल असेच वागले. माझा आनंद मी जपला होता. कोणी काही का म्हणेना?

  

      मनातली प्रत्येक चांगली गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. मग ती कोणतीही असो.हो कधी कधी अशक्य असतं हे. "ही वेळ परत येणार नाही" हे मनाला परत परत ठणकावून सांगते. "बघू नंतर, "परत कधीतरी, छे मला हे पटतच नाही.समोर आहे ना ती गोष्ट, त्यामुळे "पडत्या फळाची आज्ञा" असा आविर्भाव ठेवून जगते. तुम्ही स्वतःच्या मनाला समजावून घेतले तरच, तुम्ही दुसऱ्याच्या मनाला ही समजावून घेऊ शकाल. तुम्ही स्वतः आनंदी राहिला तरच, दुसऱ्या व्यक्तीला आनंदाचे महत्त्व पटवून देऊ शकाल. "मला असं असं करायला आवडतं" या सर्व गोष्टी स्वतःविषयी प्रेमच दाखवतात.

मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये येतो.


          मला आवडतं दुसऱ्याला मदत करायला, त्याच्या वेळेला धावून जायला. मला आवडतं दुसऱ्याला सांत्वना द्यायला, त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसायला. मला आवडते दुसऱ्याला समजून घ्यायला, त्याच्या भावना जाणून घ्यायला. मला आवडतं सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायला, आणि वेळेला पाठीशी उभं रहायला. मला आवडतं मनात कटुता न ठेवता, फक्त प्रेमाने वागायला, दुसऱ्याला माफ करायला. मला आवडतं, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगायला. मला आवडते सर्वांशी प्रेमाने बोलायला. 

    आणि हो मला आवडतं खरं बोलायला, कारण प्रेम तर मी माझ्यावरच केले ना.


Rate this content
Log in