Seema Kulkarni

Abstract

4.0  

Seema Kulkarni

Abstract

श्रावण महिना, आठवणी

श्रावण महिना, आठवणी

3 mins
164


   श्रावण महिना सुरू झाला की खऱ्या अर्थाने सण वाराचे वेध लागतात. सात्विकतेचा ,पवित्रतेचा एक असा गंध पसरतो. आपोआपच मन भक्तिमार्गाकडे आकृष्ट होतं. इथून ते दिवाळी पर्यंतचे दिवस कसे भरकन निघून जातात. देवांचा देव महादेव यांचा हा आवडता महिना असल्यामुळे जेवढे जास्त जमेल तेवढी त्याची सेवा करण्याचा प्रयत्न असतो. अनेक प्रकारचे व्रतवैकल्य , नियम या महिन्यात साजरे केले जातात. या महिन्यातील विशेष दिवस म्हणजे , श्रावणी सोमवार, शुक्रवार, रक्षाबंधन ,नागपंचमी स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, गोकुळाष्टमी दहीहंडी हे होत. धार्मिक दृष्टीने याचे वेगळे महत्त्व असते. श्रावण महिन्यात घरोघरी सत्यनारायण पूजा ,रुद्र पूजा, वास्तुशांती यासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

        माहेरच्या श्रावणातल्या आठवणी म्हणजे, माझी आई श्रावणी व्रत करायची एक वेळेस जेवून, सकाळी किंवा संध्याकाळी. याला नक्त किंवा भुक्त व्रत असे म्हणतात. महिनाभर महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जायची. आमचे त्यावेळेस करमाळा या गावी वास्तव्य होते. आई बरोबर मंदिरात दर्शनाला गेलो की, अर्धी फेरी घालून परत यायचे व दुसर्‍या बाजूने परत अर्धी फेरी घालायची. महादेवाला आम्ही पूर्ण फेरी घालतो नसू. अर्धीच फेरी मारत असू. हे तेव्हा माहीत झाले. श्रावणातले सोमवार खाऊन का होईना आई कंपल्सरी करायला लावायची. बरोबरीने महादेवाची पुजा. ( लग्नानंतर महादेव चांगला मिळावा म्हणून 😊)


      श्रावणातल्या चारही शुक्रवारी आमच्याकडे, म्हणजे माहेरी पुरण आणि सवाष्ण जेवायला घालायची पद्धत आहे. आणि संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवाला बोलवायचे फुटाणे आणि दुध द्यायचे. आमच्या इकडे सोलापूर जिल्ह्यात, श्रावण सोमवार सोडताना मुळा खायची पद्धत आहे. मुळ्याच्या वासामुळे आम्हा भावंडांना मुळा बिलकूल आवडत नसे. मग आई त्या मुळ्याचे भजे करायची व त्या भज्याची आमटी करायची. मग आम्ही ती खायचो. कारण ओळखायला येत नव्हते. आजही मी श्रावणी सोमवार सोडताना मुळ्याचा आवर्जून उपयोग करते.

        श्रावणातील नागपंचमीचा सण सुद्धा खूप उत्साहात साजरा व्हायचा. अगदी छोट्या पिने पासून ते ड्रेस पर्यंत संपूर्ण नवीन खरेदी असायची. हमखास मेहंदी चे कार्यक्रम रंगायचे. कोणाची जास्त रंगली यावरून चर्चा असायची. कमी रंगली की वाईट वाटायचे.थोडेसे गावाच्या बाहेर नागदेवतेचे मंदिर होते. संपूर्ण गाव त्या दिवशी तिकडे दर्शनाला असायचे. टोपलीमध्ये नागाला घेऊन, कित्येक गारुडी तिथे हजर पुंगी वाजवली की, टोपलीतून नाग हळूच डोक्यावर काढायचा. भीती वाटायची पण मजा पण वाटायची.आमच्याकडे नागपंचमीला पतंग उडवायची पद्धत आहे. संपूर्ण आकाश पतंगांनी गच्च भरलेले असायचे. आणि "वावडी "पण उडवली जायची. वावडी म्हणजे पातळ लाकडापासून बनवलेली असते. चौकोनी आकार.त्याच्या एका टोकाला सुतळी बांधलेली असते. कशी उडवायचे, ते माहीत नाही पण आकाशात अगदी स्थिर राहते. ठीक ठिकाणी झाडांना झोका बांधलेला असायचा. त्या दिवशी आवर्जून झोका खेळायचाच.

         रक्षाबंधन म्हणजे किती कमाई होते याकडेच लक्ष असायचे. छान छान राख्या आणायच्या. भावाला बांधायच्या. ज्याच्या मनगटावर जास्त राख्या, तो खूप भाव खायचा. घरातील पुरुष मंडळी, आवर्जून त्या दिवशी गायत्री मंत्र म्हणून जानवे बदलत असत.

15 ऑगस्ट ची तयारी म्हणजे, आदल्या दिवशी स्कूल ड्रेस स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेवायचा. व सकाळी लवकर उठून झेंडावंदन करायला शाळेत जायचे. ते पण एक भारावलेले वातावरण असायचे.

         नवीन लग्न झालेल्या मुली, श्रावण महिन्यात पहिली पाच वर्षे मंगळागौर पूजतात. पाच वर्षांनी मंगळागौरीचे उद्यापन करतात.एक सासरी ,एक माहेरी अशी पद्धत असते. माझी पण लग्नानंतरची मंगळागौर खूप थाटात साजरी झालेली. मंगळागौर म्हणजे पार्वतीची चांदीची प्रतिमा असते. जी आईकडून मुलीला मिळते. त्यादिवशी जागरण ,मंगळागौरीचे विविध प्रकारचे खेळ, धमाल असे वातावरण असते. माझी आत्या मंगळागौरीचे खेळ खूप सुंदर खेळते. आता ही खेळ खेळले जातात पण, पैसे देऊन ग्रुपला बोलवावे लागते.

         सध्या आम्ही जिथे राहतो तिथेच श्रीकृष्णाचे मंदिर आहे. त्यामुळे जन्माष्टमी खूप खूप उत्साहात साजरी केली जाते. मला तर एक वेगळीच ओढ लागते कृष्ण कन्हैयाच्या जन्माची. दिवस भर एकादशीसारखा उपवास करायचा आणि रात्री दहा पासून मंदिरात जायचे. भजन कीर्तनात रमायचे, ते रात्री बारा वाजताचा जन्म करूनच घरी यायचे. एक गोकुळाष्टमीचा उपवास केल्याने बारा एकादशी केल्याचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम तर अवर्णनीय असाच असतो. छोटी छोटी मुले कृष्णाच्या आणि राधेच्या रूपात दिसतात. संध्याकाळी पाच पासून उत्साहाचे वातावरण असते, ते दहीहंडी फुटेपर्यंत. तो थरार ,ती फजिती पाहायला खूपच मज्जा येते.


असा हा मनभावन श्रावण. सणांची मांदियाळी असलेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract